१८९३
"महाराज ! आपण समर्थ आहात,
या व्यसनापासून मला आता सोडवा."
गोंदवल्यास राहायला आल्यापासून श्रींना भेटायला सतत कोणी ना कोणी येत असत. त्यावेळी बापूसाहेब साठये यांची मुनसफ म्हणून दहिवडीला बदली झाली. रोजसंध्याकाळी ते लांब फिरायला. जात. त्यांना पोटदुखीचा जुनाट विकार होता. शनिवारी कोर्ट सुटल्यावर ते फिरायला निघाले, त्यावेळी दहिवडीचे दोन वकीट श्रींच्या दर्शनासाठी गोंदवल्यास निघाले होते. रस्यामध्ये गाठ पडल्यावर त्यांनी बापूसाहेबांना गोंदवल्यास चलण्याची विनंती केली व वाटेत श्रींची सर्व माहिती सांगितली. गंमत म्हणजे त्यावेळी श्री जवळ्च्या एका गावी जाण्याच्या तयारीत होते. गाडया जुंपून दाराशी उभ्या होत्या. श्रींनी एकाला सांगितले, "अरे, दहिवडीहून कोणी येत आहे का बघा." संध्याकाळी ५॥ वाजता बापूसाहेब व दोघे वकिल गोंदवल्यास येऊन पोहोचले. वकिलांनी बापूसाहेबांची श्रींशी ओळख करून दिली. श्रींनी बापूसाहेबांचा रावसाहेब, रावसाहेब म्हणून इतका आदर केला की, ते संकोचाने अर्धे झाले. श्रींनी त्यांना प्रसाद देण्यास सांगितले. एकाने त्यांना द्रोण भरून साबुदाण्याची खिचडी आणून दिली. श्रींचा प्रसाद म्हणून बापूसाहेबांनी एक घास खाल्ला. त्याबरोबर त्यांचे तोंड भाजून डोळ्यांना पाणी आले. हे पाहून श्री मोठयाने म्हणाले, "अरे, रावसाहेबांना थोडी साखर आणून द्या, काय करावे, शिंच्यांना मोठया माणसांशी कसे वागावे हे काही कळत नाही." त्यानंतर सुमोर एक महिन्यानी दासनवमीला सर्वांना दहिवडीला जेवणाचे आमंत्रण होते. शेवटच्या पंक्तीला श्री जेवायला बसताना बापूसाहेबांची चौकशी केली, ते कोर्टाचे काम संपवून आपल्या खोलीत बसले होते. इतक्यात श्री त्यांच्यासमोर जाऊन उभे राहिले व प्रेमळपणाने म्हणाले, "रावसाहेब जेवायला चलायचे, शेवटची पंगत आहे." बापूसाहेब मनात म्हणाले, ’हा एवढ मोठा पुरुष, लोक यांना साधू मानतात, हे आपण होऊन आमंत्रण करायला आले, आता न जावे तर पंचाईत,’ म्हणून नाइलाजास्तव जेवायला गेले. त्यावेळी बापूसाहेब आधीच्या भितीने बेताने जेवण जेवले. त्रास झाला नाही. पुढे बापूसाहेबांनी श्रींना आपल्या घरी जेवावयास बोलावले. झुणका-भाकर श्रींना आवडते म्हणून तोच बेत केला होता. रामाला नैवेद्य दाखविल्यावर नैवेद्याच्या ताटातली चतकोर भाकरी व पिठल्याचा गोळा श्रींनी बापूसाहेबांना खायला सांगितला. त्यांनी तो भीतभीत खाल्ला. तेव्हापासून बापूसाहेबांची पोटदुखी कायमची थांबली. बापूसाहेबांनी श्रींचे मनापासून आभार मानले व पुढे त्यांचे खरे भक्त बनले. बाळंभट जोशी हे दत्तमंदिराचे पुजारी होते. वडिलांकडून वेदपठण व भिक्षुकी शिकून घेतली. श्रींची त्यांच्यावर मर्जी होती. श्रींना त्यांना सांगून ठेवले होते, "आपण भिक्षुकीबरोबर नामस्मरण करावे त्यामुळे जन्माचे कल्याण होते." बाळंभट म्हणाले, "मला रोजथोडा तरी गांजा लागतो, हे माझे व्यसन पुरवण्याचे आपण वचन देत असाल तर मी आपली वाटेल ती आज्ञा पाळीन व सांगाल तितके नामस्मरण करीन, कधीही खोटे बोलणार नाही." श्रींनी त्यांना रोजचा जप नेमून दिला व एक आण्याचा गांजा रोजदेण्याची व्यवस्था केली. एक दिवस काही ना काही कारणांनी गांजा आणण्याचा राहून गेला. वाट पाहून ते रागाने श्रींकडे आले. त्यावेळी श्री दर्शनाला आलेल्या मंडळींची सुखदुःखे ऐकून त्यांचे समाधान करण्यात रंगून गेले होते. श्रींचे कळकळीचे व प्रेमाने ओथंबलेले बोलणे ऐकून बाळंभट आपण श्रींकडे कशाकरिता आलो हेही विसरून गेले. काही वेळाने श्रींचे लक्ष त्यांच्याकडे गेले व म्हणाले. "बाळंभट, आजमंडळींच्या गडबडीत मला गांजा आणण्याचा विसर पडला. राग मानू नका, हा पहा मी लगेच निघालो." आपल्यासारख्या क्षुद्र माणसाचे व्यसन पुरवण्यासाठी श्री स्वतःनिघालेले पाहून "महाराज " अशी हाक मारून श्रींचे दोन्ही पाय घट्ट धरले. श्री म्हणाले, "हे काय बाळंभट उठ " त्यावर बाळंभट कळवळून म्हणाले, "महाराज, आपण समर्थ आहात, या व्यसनापासून मला आता सोडवा." त्यावर श्री लगेच म्हणाले, "रामाच्या पायावर हात ठेवून मी गांजाला शिवणार नाही अशी शपथ घ्या, नामस्मरण सोडू नका, राम तुमच्या मागे उभा राहील हा माझा आशीर्वाद आहे." बाळंभटांनी रामाच्या पायावर हात ठेवून शपथ घेतली. त्या दिवसापासून ते या व्यसनापासून कायमचे मुक्त झाले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel