कालव्यामुळे न्यूयॉर्क बंदराचे महत्व अतोनात वाढले. सर्व उत्तर-मध्य अमेरिकेचा व्यापार येथून होऊ लागला. खुद्द बफेलो शहराची वस्ती २० वर्षात २०० वरून १८००० वर गेली.मूळ कालव्यातून वर्षाला १५ लाख टन मालवाहतूक अपेक्षित होती ती गति केव्हाच गाठली गेली. त्यामुळे १८३४ सालींच कालव्याच्या दुरुस्ती व वाढीचे मोठ्या खर्चाचे काम हातात घेतले गेले. यामध्ये कालव्याची रुंदी ४० फुटांवरून ७० फुटांपर्यंत वाढवली गेली. आणि खोलीहि ४ फुटांवरून ७ फूट झाली. बर्याच ठिकाणी नवीन Locks आणि अॅक्विडक्ट (नद्यांवरचे पूल) बांधले गेले. बांधकामाचे शिक्षण घेतलेलीं तज्ञ माणसे व उच्च दर्जाचे सिमेंट मिळूं लागल्यामुले हे शक्य झाले. कित्येक ठिकाणी कालव्याची लाइनच बदलून लांबी कमी करतां आली. मूळ कालव्यांतील काही छोटे तुकडे वापरण्याची गरज राहिली नाही व त्यांचा करमणुकीसाठी उपयोग होऊ लागला. १८६२ साली हे काम पुरे झाले. नंतरहि वेळोवेळी काही सुधारणा होतच राहिल्या. मुख्य कालव्याला येऊन मिळणारे काही उपकालवेहि बांधले गेले. १९०५ ते १९१८ या काळात कालव्याची पुन्हा वाढ व सुधारणा झाली. दहा कोटि डॉलर खर्च झाले. मालवाहतूक ५२ लाख टनावर पोचली. रस्ते आणि रेल्वे यांची भराभर वाढ होत गेली तसे कालांतराने हे आकडे कमी होत गेले. एरी कालव्यामुळे न्यूयॉर्क राज्य व बंदराची प्रचंड भरभराट झाली. सरोवरांच्या प्रदेशात लोकवस्ती झपाट्याने वाढली. आयरिश लोकांनी कालव्यावर फार काम केले होते त्यांची वस्ती मार्गावरील अनेक गावा-शहरांत झाली. कालव्यातून प्रवासी वाहतूकहि मोठ्या प्रमाणावर होत असे. वापरातून जवळपास गेलेल्या या कालव्यातून गेली काही वर्षे पुन्हा काही खास मालाची - मुख्यत्वे अवजड व मोठ्या आकाराच्या वस्तू - वाहतूक होऊं लागलेली आहे. कालव्याचा अजूनहि अनेक प्रकारे हौशी प्रवाशांसाठी उपयोग कल्पकतेने केला जातो. उदा. बोटी चालवणे, बाजूच्या पायवाटेने सायकली चालवणे, वाटेवर जागजागी हॉटेल्स - मॉटेल्स काढून प्रवाशांना सुखसोयी देणे वगैरे. अशा या भारतीयाना पूर्णपणे अपरिचित अशा प्रकल्पाची माहिती सांगितली ती तुम्हाला मनोरंजक वाटली असेल अशी आशा करतों.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel