सर्वमान्य सत्य असलें म्हणून काय झाले? माझ्या सदसद्विवेकबुध्दीस पटत नसेल तर? म्हणून महात्माजींसारखा सत्याग्रही सर्वांना मान्य अशा सत्यांतहि चूक आहे असें सांगायला कधीं कमी करीत नाहीं. भीति, संकोच या वस्तूच त्यांच्याजवळ नसतात. महात्माजींचा नि व्हाइसरॉय लिनलिथगो यांचा पत्रव्यवहार आता प्रसिध्द झाला आहे. त्या पत्रांतून महात्माजींनी सर्वमान्य सत्यांतीलहि चुका दाखविल्या आहेत. ते व्हाइसरॉयला लिहितात,''मी चुकलों अशी माझी अजूनहि खात्री पटवा. मी हें युध्द, सत्याग्रही बंड थांबवीन.'' महात्माजींचा पत्रव्यवहार वाचून काहींना संशय आला कीं, महात्माजी तडजोड करतील. वस्तुतः त्यांनीं कधींहि अशी तडजोड केली नाही. १९३१ मध्यें गोलमेज परिषदेला ते गेले. सर्वांना वाटत होतें कीं, ते कांही तरी तडजोड करून येतील. परंतु तसें कांही एक झालें नाही. सामोपचारानें प्रश्न सुटावे, तडजोड व्हावी अशी त्यांना इच्छा असे. सत्याग्रही हा उगीचच्या उगीच आगींत उडी घेत नसतो; परंतु तत्त्वाशीं तो कधींहि अप्रामाणिक नसतो. तडजोडींसाठी तो तत्त्वच्युति कधीं होऊं देत नाहीं. आज २०/२५ वर्षे ते आपल्यासमोर आहेत. त्यांनी तशी तडजोड कधींहि केली नाहीं. ते व्हॉइसरॉयांना जेव्हां म्हणतात कीं, मला पटवा, तेव्हां ते सत्याच्या दृष्टीनें म्हणत असतात; तडजोडीसाठीं म्हणून नव्हे. व्हाइसरॉयांच्या बोलण्यांत त्यांना सत्य दिसलें तर ते तडजोड करतील. परंतु ब्रिटिशांना माहीत आहे कीं, इतर लोक एखादे वेळेस तडजोड करतील, तत्त्वें गुंडाळून ठेवतील, तात्पुरत्या गोष्टी बघतील; परंतु हा पुरुष तसा नाहीं. मूलभूत सत्याच्या बाबतींत गांधीजी कांहींहि तडजोड करणार नाहींत. चूक दिसली तर स्वतःच्या म्हणण्याचा ते कधींहि आग्रह धरणार नाहींत, हेंहि तितकेंच खरें. सत्याग्रही सत्याचा चिरंतन उपासक असतो. मताचा आग्रह सोडायला तयार असणें ही एक सत्याग्रहीच्या जीवनांतील, तत्वज्ञानांतील आवश्यक गोष्ट आहे. सत्याग्रही नि मताग्रही या दोन अत्यन्त भिन्न वस्तु आहेत. मत क्षणिक असतें; मतामतांतून सत्याच्या प्रकाशाकडे जायचें असतें. तो सत्याचा प्रकाश हें सत्याग्रहींचे गंतव्य नि प्राप्तव्य असतें, आणि त्या प्रकाशांत त्याला प्राणिमात्राचें कल्याण दिसत असतें. स्वतःचा उध्दार, स्वजनांचा उध्दार, स्वतःच्या शत्रूंचाहि उध्दार, त्याला त्यांत दिसत असतो. शत्रु शब्द लौकिक अर्थानें वापरला. वास्तविक सत्याग्रहीला शत्रूच नसतो. तो सर्वांना आपले मानतो. म्हणून तर सर्वांच्या हिताचा तो विचार करतो.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel