रामा गोवारी उभा राहिला व म्हणाला, 'मिळाला ना न्याय? बाटलीत शिरलेला त्रिंबकभट म्हणजे भूत होते. भुतांना लहान मोठे होता येते. हे भूत त्रिंबकभट म्हणून इतकी वर्षे वावरत होते आणि हा खरा त्रिंबकभट येथे उभा आहे.'

हजारो लोकांनी टाळया वाजविल्या. राजा, त्याचे प्रधान व इतर अधिकारी चकित झाले. राजा उभा रामा गोवार्‍यास म्हणाला, 'शाबास तुझी. मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. काय वाटेल ते माग, मी देतो. 'रामा गोवारी म्हणाला, 'मला जहागीर नको, इनाम गाव नको. गाईगुरांना गायराने मोफत असू देत. गाईंच्या कासा भरदार असू देत. दुधाचा सुकाळ होऊ दे. लोक धष्टपुष्ट होऊ देत. राजा, गुराख्याची दुसरी इच्छा काय असणार?'

राजा गोवारी व त्याचे मित्र रानात खेळायला निघून गेले. लोक घरोघर गेले. त्रिंबकभटजी आपल्या घरी आला. मुलेंबाळे त्याला भेटली. बायकोचे डोळे भरून आले. सारी सुखी झाली. ती सुखी झाली तशी तुम्ही सारी व्हा.'

'गोष्ट झाली अशी

संगा आहे कशी

सारी राजीखुशी. '

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel