'आम्ही स्वराज्यात नीट वागू. आम्ही तुमचेच आहोत.' असे काळाबाजार करणा-या व्यापा-यांनी व जमीनदारांनी सांगितले. त्यांनाही मुक्त करण्यात आले. जमीनदारांना २५ एकर जमीन ठेवून बाकीची काढून घेऊन वाटण्यात आली होती.

एक नवीन प्रयोग सुरा झाला.

परंतु असे प्रयोग करायला हिंदुस्थानातील तीन हजार तालुके एकदम उठले नाहीत. कोठे कोठे नुसती तुरूंगभरतीची चळवळ सुरू झाली. ही तुरूंगभरतीची चळवळ नाही असे महात्माजींनी पुन्हापुन्हा बजावले होते. ते सांगणे फोल गेले. सरकार बळावले; आणि ठायी ठायी लष्कर जाऊ लागले. स्वातंत्र्याचे प्रयोग नष्ट करण्यात येऊ लागले. बिहारमध्ये, संयुक्त प्रांतातील बालिया जिल्ह्यात, बंगालमधील मिदनापूर जिल्ह्यात लष्करी सत्तेच्या जोरावर पुन्हा परसत्ता येऊन बसली. हजारो लोक पकडले गेले. किती गोळीबारात मेले. काहींना फाशीची सजा झाली. क्रांतीचा महान प्रयोग झाला. परंतु संपूर्णपणे यश आले नाही.

शिवापूर तालुक्यात काय होणार? लष्कर आले, वर विमाने फिरू लागली. घोडेस्वार दौडू लागले. गरीब जनतेला वेताच्या छडयांनी बेदम मारू लागले. सर्वत्र नाकेबंदी झाली. लष्करी कायद्याचा धिंगाणा तालुकाभर सुरू झाला. ठायी ठायी जनतेच्या व लष्कराच्या चकमकी झाल्या. स्वतंत्र तालुका लढू लागला. परंतु किती दिवस लढणार?

रात्रीच्या वेळी जंगलात गोप्या, दौल्या, हरबा, तुळशीराम, अप्पा, सय्यद, वसंत, अण्णा, दादा, सारे वीर जमले आहेत.

'आपण आता पांगले पाहिजे. अज्ञातवासात गेले पाहिजे. रानावनात जाऊ, कंदमुळे खाऊ, मधूनमधून जनतेत जाऊ. त्यांना गावराज्ये स्थापा असे सांगू. त्यांना स्फूर्ती देऊ. आपण आता वनवासी राम झाले पाहिजे.'

'पुन्हा आपण एकमेकांना केव्हा भेटू त्याचा नेम नाही.'

'कोणी पकडले जातील, फाशी दिले जातील.'

'ते हुतात्मे होतील, कृतार्थ होतील.'

'तळहाती शिर घेऊन आपण बाहेर पडलो आहोत. मरेपर्यंत लढू; झगडू.'

'ठरले तर आता. आपण पांगायचे. आपली क्रांती आज यशस्वी नाही झाली तरी उद्या होईल. शंभर-दीडशे वर्षे आपण गुलामगिरीत खितपत पडलो होतो. ९ ऑगस्टने थोडी तरी स्वातंत्र्याची हवा दिली. कोठे दोन महिने, कोठे चार महिने, कोठे दोन आठवडे, कोठे एक दिवस या प्रकारे आपण स्वराज्ये स्थापली. एक महान अनुभव आपणास मिळाला. हा अनुभव मोलाचा आहे. हा उद्या उपयोगी येईल. राष्ट्रपुरूषाच्या फुफ्फुसांत इतक्या वर्षांनी ही जी स्वतंत्र हवा गेली आहे ती आता त्याला स्वस्थ बसू देणार नाही. येत्या दोन-चार वर्षांत आपण स्वतंत्र झाल्याशिवाय राहणार नाही. जगलो तर आपण ते स्वातंत्र्य पाहू. ते स्वातंत्र्य आणण्यासाठी मेलो तर कृतार्थ होऊ. आपल्या या मातीचे सोने होईल.

'चला तर. फार वेळ येथे बसण्यात अर्थ नाही.'

'ते पाहा बंदुकांचे आवाज ऐकू येत आहेत. बॅट-यांचा उजेड दिला की काय?'

'आपणावर छापा का घालणार? आपण येथे आहोत हे शत्रूला कसे कळले?'

'आपल्या देशाला फितुरीचा शाप आहे.'

'चला, उठा. आवाज जवळ येत आहेत.'

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel