'तुला कोणी शिकविले ?'

'शेजारच्या मुलींना त्यांची आई शिकविते, पण मला कोण शिकविणार ? परंतु ती जंमत कुठे आहे ? द्या ना.'

कृपारामने आपले खिशातून काही तरी काढले. काय होते ते ?'

'अय्या ! माऊचे पिलू. हे काय आणलेत ? कसे आहे छान !'

'घे तुला, त्याला कुशीत निजव. तुला ऊब मिळेल.'

'परंतु आत्याबाई मारील त्याला.'

'त्याला लपवून ठेव.'

'कोठे लपवू ? ते लपून का राहील ? आणि त्याला दूध कोठले घालू ? असू दे, पण मला आवडले आहे हे माऊचे पिलू. कसे छान आहे ! घुरघूर करते आहे बघा. नेऊ मी ?'

'ने, उद्या भेटशील ना ?'

'हो. मी तर तुम्हांला रोज बघत असते. तुमचेच माझ्याकडे लक्ष नसते. तुमचे आपले दिवे लावण्याकडे लक्ष.'

'आता तुझ्याकडेही माझे लक्ष राहील.'

तो दिवे लावणारा गेला. माऊचे पिल्लू हातात घेऊन मिरी गुपचूप वर गेली. तिने आपल्या अंथरुणात ते ठेवले. खानावळ गजबजली, कोणी पानात भात टाकला होता. मिरीने पान उचलताना तो भात पटकन् एका वाटीत घातला. तो दहीभात होता. तिने वरती माऊच्या पिलाला तो नेऊन दिला. पुन्हा ती खाली आली. तिने सारे काम केले. माऊची वाटीही तिने विसळली. सारे काम झाल्यावर जेवून ती खिडकीजवळच्या आपल्या अंथरुणात येऊन बसली. पिलू तिने जवळ घेतले.

'कुठे आहे तुझी आई ? माझी आई नाही. तुझी आई नाही. आपण सारखी आहोत. नीज हो माझ्याजवळ.' त्या पिल्लाला जवळ घेऊन ती निजली.

दुसर्‍या दिवशी ते पिलू घरात हिंडू लागले. आत्याबाई ओरडली. 'कोठून आले हे पिलू ?' तिने विचारले. मिरी बोलली नाही. परंतु सायंकाळी निराळाच प्रकार झाला. मिरीने लवकर दूध आणले होते. ते पिलू कोठे तरी 'म्यांव' करीत होते. आत्याबाईच्या पायात ते आले नि आत्याबाई पडल्या. त्या संतापल्या. त्यांनी ते पिलू संतापाने उचलले !

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel