मध्यरात्र उलटून गेलेली असते.
वातावरणात खूप थंडी असते.
एक बैलगाडी गावाबाहेरच्या निर्मनुष्य मैदानातून चंद्राच्या उजेडात गावाकडे जात असते.
अचानक दोन्ही बैलाच्या मधोमध एक भयप्रद कुत्रा येतो आणि गाडीच्या खाली सरकतो आणि दोन्ही चाकांच्या मधोमध चालायला लागतो.
बरोबर बैलांच्या वेगात वेग मिसळून तो चालतो.
बैलगाडी हाकणारा (नंदू) बैलगाडीवर बसलेल्या दुसर्या माणसाला (हरी) म्हणतो,
"या गाडीखाली एक कुत्रा चालत आहे. त्या कुत्र्याला हाकलू नकोस आणि त्याचेकडे बघू नकोस गावची वेस (बाॅर्डर) येईपर्यंत! एकदा गावात शिरलो की हा कुत्रा नाहीसा होईल"
हरी म्हणतो, "मी हे मानत नाही. कुत्र्याकडे समजा मी पाहिले किंवा हाकलले तर काय होईल?"
"सांगता येत नाही काय होईल पण त्यानंतर तू गावापर्यंत पोहोचणार नाही हे नक्की! या रस्त्यावर अनेक प्रकारच्या शिकारी सैतानांचा वावर आहे. हा कुत्रा नाहीसा होईपर्यंत मी सुद्धा बैलगाडी मुळीच थांबवणार नाही. थांबलो तर आपण संपलो."
"हॅट. नाही मानत मी. खोटे आहे ते"
"तुझे ते विचार तुझ्या मनात ठेव. फक्त काही विपरीत कृती करू नको. नाहीतर आपण संकटात सापडू"
"हट! मी नाही मानत रे! चल तू! गाडी चालव!" असे म्हणून तो आकाशाकडे पाहत बसून राहतो.
"अन काय रे. त्या कुत्र्याला पाहून बैल बिथरत नाही का?
तो कुत्रा खरा कुत्रा आहे की कुणी सैतान कुत्र्याचे रूप घेऊन आलाय?"
"गप बस. पडून राहा. फालतू प्रश्न विचारू नको. शांत. एकदम!"
"आणि हे कुत्रं अजून एकदाही भुंकलं कसं नाही? किती हुशार कुत्रं आहे रे!"
"गप बस ना. गुमान पडून राहा. या सगळ्या अडथळ्यांकडे लक्ष देऊ नको. हे मैदान संपलं की जंगल लागेल. त्याला पार केले की नदी, पूल आणि मग गावची वेस येणार. मग हे अडथळे संपतील आणि आपण श्रीमंत होणार. विसरलास? "
"हा कुत्रा? आणि अडथळा? कायपन! आता त्याला उचलतो आणि फेकतो आकाशात. उतरू का? फेकू?"
"आरे, आता गप्प बैस! नाहीतर मीच तुला उचलून झाडाला लटकवेल! मग एखादा विक्रम येईपर्यंत वाट पहा. तुला पाठीवर घेऊन जाईल आणि छान छान गोष्टी सांगेल तो!"
"अरे मुर्खा. वेताळ सांगतो गोष्टी विक्रमाला! विक्रम नाही!"
"हो, माहितेय. मी पण ऐकल्या आहेत बिरबलाच्या गोष्टी लहानपणी!"
"आता बिरबलाच्या गोष्टीत वेताळ कोठून आला?"
"आला असेल एखाद्या रात्री बिरबलाच्या घराच्या खिडकीतून! विक्रमाला कंटाळून! तुला काय करायचं? आता गप्प बर ना! त्या थैली कडे लक्ष दे आणि! तीच आपल्याला श्रीमंत करणार आहे! विसरलास का?"
बैलगाडीवर बाजूला एक काहीतरी भरलेली एक थैली असते आणि एक काठी सारखे काहीतरी त्या थैलीजवळ ठेवलेले दिसते. हरी थैली व्यवस्थित आहे की नाही त्याची खात्री करतो. चंद्राच्या उजेडात ती बैलगाडी पुढे जात राहते. पंधरा मिनिटे बैल, कुत्रा आणि गाडी या व्यतिरिक्त कुणीच हालचाल करत नाही.....
त्यावेळेस जंगलातल्या झाडांनी सुद्धा पाने हलविणे थांबवलेले असते. मात्र झाडांवरचे काही अभद्र, पाशवी पक्षी आणि प्राणी अस्वस्थ झालेले असतात. दूरवरच्या त्या बैलगाडीच्या आवाजाने ते खिन्न होतात. त्याना अंगात एक प्रकारची खुन्नस जागृत होते आणि त्यांचे मन त्याना शिकार करण्यासाठी प्रेरणा देऊ लागते. इतर झाडांवरचे अभद्र काळे आत्मे सुद्धा त्या थैली मधल्या वासाने अस्वस्थ होतात. त्या सगळ्या अभद्र प्राणी, पक्षी आणि आत्म्यांची नजरानजर होते आणि ते निराश होऊन खिन्नपणे हसतात. एक भुरकट काळा आत्मा न रहावून त्या थैलीकडे झेपावतो....
बैलगाडी वरचे "ते" दोघे अंगावर काळी चादर घेऊन निश्चल पडून असतात. त्या थैलीत अचानक हालचाल जाणवायला लागते. ती पिशवी हाताशी धरून बसलेला हरी दचकतो.
"अरे नंदू, थैली हालतेय! झाडावरच्या आत्म्यांना दुरून वास येतो वाटते?"
"काय सांगतो? गप बस! लय गंमत करायची लहर येते तुला? "
"अरे खरंच सांगतोय! थैली हालतेय! डान्स करतेय!"
"आता गप बसतोस का थांबवू बैलगाडी?"
"आरे. ते हलतंय! थैलीमधून!"
"च्या मारी! आता आणू का कुत्र्याला पकडून आणि टाकू तुझ्या डोक्यावर? तूच तर गोळी घातली होती ना त्या थैली मधल्या प्राण्याला? तेही स्वतःच्या हाताने, त्या बंदुकीने, बरोबर ना?"
"होय! मीच मारलं होतं त्याला!"
"तूच केली ना शिकार त्याची! मग पुन्यांदा कसा जिवंत होईल तो थैली मधला प्राणी ? एकदा म्हणतो माझा या सैतानी गोष्टींवर विश्वास नाय आणि एकदा म्हणतो मेलेला प्राणी जिवंत झाला?"
हरी काही म्हणणार तेवढ्यात त्या थैलीतून एक विचित्र काळा प्राणी बाहेर निघतो आणि खाली उडी मारतो. हरी त्याला पकडण्याचा प्रयत्न करतो पण तो त्याच्या हातातून सटकतो. कुत्र्याच्या मागोमाग बैलगाडी खाली तो काळा प्राणी सुद्धा चालू लागतो.
नंदू हरी वर संतापतो,
"एक तर शिकार नीट करता येत नाय अनं एक थैली बी नीट सांभाळता येत नाय? गमावलं ना सगळं. कसे मिळणार पैसे आता त्याला विकून?"
"अरे थांबव की गाडी! मी उतरतो आनं आणतो त्याला पुन्हा पकडून. मी नाय घाबरत त्या कुत्र्याकडं बघायला! "
"खबरदार. मी गाडी थांबवणार नाही. आता गेलं ते गेलं! त्या कुत्र्याकडे जाऊ नको बाबा! नको!"
"अरे थांबव की मूर्खा! " असे म्हणून हरी बैलांचा दोर नंदू कडून हिस्कावीन हातात घेऊन गाडी थांबवण्याचा प्रयत्न करतो पण नंदू त्याला संतापाच्या भरात बैलगाडीच्या खाली फेकतो........
"जा त्या कुत्र्याकडे! आणि पळ चार पायांवर त्याचेमागे. मुर्खा!!"