“गरीबांची, दादा, थट्टा नये करूं. बटाटी, रताळी तुम्हांला. डाळतांदूळ तुम्हाला. ती तुमची खाणीं, आम्हाला कुठलीं ? आणि आम्हांला तो सोसतींल तरी का ? जंगलच्या लोकांना जंगलचा पाला, जंगलचे कंद.”
“तुम्हांला हे कडूं नाहीं लागत ?”

“हे कंद रात्रभर उकडून तसेच मडक्यांत ठेवतों. त्याचा राप सकाळला कमी होतो. कडूपणा कमी होतो. मग ते आम्ही खातों. एकदां सवय झाली म्हणजे सारें चालतें.”

मी त्या श्रमजीवी लोकांना प्रणाम करून निघालों. ही आदिवासी जनता. हे मूळचे मालक, त्यांच्या जमिनी त्यांना केव्हां मिळतील ?  केव्हां नीट राहतील, धष्टपुष्ट होतील ?  केव्हां त्यांची मुलेंबाळें गुबगुबीत होतील ? घरदार, ज्ञानविज्ञान, कला, आनंद, विश्रांति, सारें त्यांना कधीं बरें मिळेल ? पिढ्या न् पिढ्या हीं माणसें अर्धपोंटी जगत आहेत. उपाशी लोकांना सद्‍गुणांची संथा नका देत बसूं. आधीं जमिनी द्या; मग दारू पिऊ नका म्हणून सांगा. नुसत्या नैतिक गोष्टी निरुपयोगी आहेत. भगवान बुद्ध म्हणत, उपाशी माणसाला अन्न देणें म्हणजे त्याला धर्म शिकविणें. उपाशीं माणसाचीं धर्मज्ञानाची भाषा अन्न ही असते. आमच्या हें कधीं लक्षांत येणार ? ही लक्षावधि जीवनें कधी हंसणार, फुलणार ?

“आपण परत जाऊं. दोन दृश्ये जन्मभर पुरतील. स्वराज्यांत काय करायचें त्यांचे ज्ञान येथें येऊन झालें चला. आपण परत जाऊं.” मी म्हटलें.

आणि विचार करीत आम्ही दोघे माघारे गेलो.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel