इंग्रजाच्या दृष्टीने आपण किती क्षुद्र आहोत ही गोष्ट आपण विसरू नये. तो किती उंचीवरून आपणांकडे बघतो हे ध्यानात घ्यावे. इंग्रज मनुष्य अफाट राजकीय रंगणाच्या एका  कोप-यातून आपणांवर राज्य करतो. युरोप व निरनिराळ्या वसाहती यांच्या प्रक्षुब्ध सागरांतून आपली साम्राज्यनौका सुरक्षितपणे कशी हाकलून न्यावयाची यांतच त्याचे सारे लक्ष असते. हिंदी जनतेचे फूत्कार व बुभूःकार, हिंदी जनतेचे टामटोम, यांचा त्याच्यावर काडी इतकाहि परिणाम होत नाही. पार्लमेंटात ज्या ज्या वेळेस हिंदुस्थानासंबंधीचा वादविवाद निघतो, तेव्हा सभासद झोपी जातात वा उठून जातात ; नाहीतर हजरच राहत नाहीत.

इंग्रज येथे येतो तो हिंदुस्थानावर प्रेम करण्यासाठी नाही. हिंदुस्थानांतून तो जेव्हा परत जातो, तेव्हा या देशाबद्दलच्या प्रेमाच्या व कृतज्ञतेच्या भावना बरोबर घेऊन तो जाणार नाही. त्याला येथील आठवणहि पुन्हा होणार नाही. येथे असे पर्येंत कसे तरी तो काम करतो. फलो रजा केव्हा मिळेल इकडे त्याचे सारे लक्ष असते. त्याला येथे करमणुक हवी असली तरी तो येथील गो-यांकडेच पाहील. त्याचे येथील भाषांवर प्रेम नसते. गव्हर्मेंट गॅझेट मधून दशी भाषांतील ज्या उता-यांचे भाषांवर येते तेवढाच आपल्या वाङमयातील विचारांशी व आकांक्षांशी त्याचा परिचय. त्याच्या हृदयांत आपणाला किती अल्प जागा आहे हे पाहिले म्हणजे त्याने दाखवलेल्या दुष्टपणाबद्दल, केलेल्या अन्यायांबद्दल, आपणांस सखेद आश्चर्य वाटणार नाही. आडांतच नाही तर पोह-यांत कोठून येणार ? हृदयांतच नाही ते बाहेर कृतीत कसे दिसणार ? जेव्हा आपण त्यांच्यावर रागावतो, आपले दुःख त्याच्यासमोर ओकतो, तेव्हा त्याला अतिशयोक्ती वाटते. तो चिडतो व “तुमच्यासाठी आणखी काय करायचे बुवा” असे विचारतो व सारे हंसण्यावारी नेतो.

मला इंग्रजाविरुद्ध दोषांची यादी करावयाची आहे असे नाही. फक्त वस्तुस्थिती काय आहे व कशी असणारच हे मी सांगून राहिलो आहे. अगदी क्षुद्र असे जे दुबळे लोक, त्या क्षुद्रांची दुःखे कितीही हृदय पिळवटणारी असली, त्या क्षुद्रांचे कितीही नुकसान होत असले, त्यांच्या किंकळ्या कितीही करुणाजनक असल्या तरी त्या दुःखाची कल्पना सुखाच्या व सत्तेच्या स्वर्गात राहणा-याला कशी येणार ? इंग्रज मनुष्य किती मोठा, आपण कोठले कोण. कोण्या झाडाचा पाला ! इंग्रजाची ही अशी दृष्टी असल्यामुळे आपणांस जे फार महत्त्वाचे वाटते ते त्याला विचारांतहि घ्यावे असे वाटत नाही. वंगभंग होऊ नये म्हणून आपण कितीही ओरडलो, डोळे लाल केले, तरी इंग्रजास त्याचे काय होय ? प्रश्न कोणताहि असो. आपण ज्या मानाने आरडाओरड करतो त्या मानाने फळ मिळत नाही. म्हणून आपण चकित होतो. परन्तु इंग्रज हा परका आहे. त्याचे सुखदुःख व आपले सुखःदुख ही निराळी आहते. ही आपण गोष्ट विसरतो. ज्या उंच आसनावर इंग्रज बसला आहे तेथे जर क्षणभर आपणास जाता आले तर आपण किती खाली दूर दरीत पडलो आहोत ते दिसून येईल. त्याला त्या ठिकाणाहून आपण कीडमुंगीप्रमाणे दिसत असू.

लॉर्ड कर्झन किती उंच बसलेला ! त्याला तेथून आपण हिंदी लोक असेच अगदी लहान दिसतो. ३३ कोटी लोकांना आमच्या साम्राज्यात बुडून जावे असे का वाटत नाही, असा त्याने एकदा आश्चर्याने प्रश्न केला होता. ३३ कोटी लोक म्हणजे एक क्षुद्र बिंदु, एक बारीकसा जणु ठिपका. ब्रि. साम्राज्यात मिळून जाणे म्हणजे केवढी मोठी गोष्ट ! परन्तु हिंदी लोक तयार होत नाहीत. हिंदी लोकांस अक्कलच नाही ! कर्झनच्या कुर्रेबाजीचा विचार तरी कसा. वसाहतीचा दर्जा हिंदुस्थानास द्यावयाचा. ज्या वसाहतीचे साम्राज्यरूप आलिंगन मिळावे म्हणून ब्रिटिश मनुष्य झुरत असतो, ज्या वसाहतींच्या दारात जाऊन त्यांची हृदये वश करून घेण्यासाठी गोड गाणी गातो, त्यांची मर्जी खप्पा होऊ नये म्हणून इंग्लंडमधील भाकरीही महांग करावयास तयार होतो, त्या वसाहतीचा दर्जा हिंदुस्थानास मिळेल का ? कर्झनसाहेब सत्यार्थाने बोलत होते का ?

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel