प्रकरण १५
पुन्हा कोर्ट सुरु झालं तेव्हा खांडेकर न्यायाधीशांना म्हणाले, “ मला असा साक्षीदार तपासायचा आहे आता, की ज्याने आरोपीला विशिष्ट ठिकाणी गडद रंगाचा गॉगल घातला असतांना पहिलय. आता त्याने तिला ओळखावं म्हणून मी कोर्टाला विनंती करतो की आरोपीला तसाच गॉगल घालायला सांगावं.”
“ ही जरा विचित्रच विनंती आहे तुमची. मास्क लावून दरोडा टाकणाऱ्याला ओळखण्यासाठी साक्षीदाराला सुद्धा मास्क लावायला सांगितल्यासारखं आहे हे.” न्या.फडणीस म्हणाले.
“ मला नाही वाटत तसं. ओळख पटवण्यासाठी अनेक गोष्टी असतात, आवाज, शरीराची ठेवण , डोक्याचा आकार, डोळे, वगैरे. गॉगल हा त्यातलाच एक भाग आहे.” खांडेकर म्हणाले.
फडणीस मान हलवून नाही म्हणणार होते,तेवढ्यात त्यांची नजर पाणिनीकडे गेली.
“ आमची हरकत नाही हे करायला, फक्त माझं म्हणणं आहे की फक्त आरोपीला गॉगल लावायला न सांगता इथे कोर्टात जमलेल्या सगळ्याच साक्षीदारांना गॉगल लावायला सांगावा, त्या सगळ्यातून या साक्षीदाराने योग्य माणूस निवडावा.” पाणिनी म्हणाला.
 खांडेकरांना आश्चर्य वाटले पाणिनी पटवर्धन ने हरकत घेतली नाही या गोष्टीचे.“ अरे वा ! तुम्हाला चालेल अशी टेस्ट घेतली तर?”  पाणिनी कडे पाहून ते अविश्वासाने उद्गारले.
“ मला अॅडव्होकेट पटवर्धन यांचं आश्चर्य वाटतंय. माझी अपेक्षा होती की ते आक्षेप घेतील.तसा घेतला असता तर मी तो मान्य केला असता.कारण अशा प्रकारे ओळख पटवणे म्हणजे आपल्या अशिलाला धोक्यात टाकण्यासारखे आहे.” न्या.फडणीस म्हणाले.
“ मला चालेल.”  पाणिनी म्हणाला. “ सगळ्या साक्षीदारांना गॉगल घालायला सांगा.”
“ सगळ्या साक्षीदारांनी गॉगल घाला.ज्यांचेकडे नसेल अत्ता गॉगल, त्या साक्षीदारांनी बाहेर जावे.थोडक्यात जे  या कोर्टात साक्ष द्यायला म्हणून आलेत, त्या सर्वांनी गॉगल घालावा.ज्यांच्याकडे गॉगल नसेल त्यांनी कोर्टाच्या बाहेर जावे तात्पुरते.म्हणजे या साक्षीदाराची साक्ष होई पर्यंत. ” न्या.फडणीसांनी ऑर्डर दिली .
“ सर्वांनी गॉगल घाला.” ते म्हणाले. “ खांडेकर तुमच्या साक्षीदाराला बोलवा.”
“ रती, गॉगल घाल.” पाणिनी रतीला म्हणाला.
“ माझी साक्षीदार सूज्ञा पालकर यायला जरा वेळ लागतोय, ती येई पर्यंत कोर्टाचा वेळ वाया जावू नये म्हणून मी तो पर्यंत दुसरा साक्षीदार तपासू इच्छितो.”
“ मला चालेल.”  पाणिनी म्हणाला. “ फक्त माझी एक अट आहे, ज्या क्षणी सूज्ञा कोर्टात येईल त्या क्षणी तुमचा हा साक्षीदार साक्ष थांबवून बाहेर जाईल. ”
“ मान्य आहे मला.” खांडेकर म्हणाले.
न्यायाधीशांनी संमती दिली आणि  खांडेकरांनी नाव पुकारलं,“ परिग्रह संवत्सर.”
 खूप वेगळंच नाव असलेला , साधारण पस्तीशीचा एका देखणा माणूस पुढे आला आणि त्याने शपथ घेतली.
“ सोमवारी चार तारखेला आरोपी बरोबर तू चैत्रापूर ते विलासपूर हा प्रवास विमानाने केलास? ”-खांडेकर.
“ हो.”
“ आणि परत येतांना पण तुम्ही त्याच विमानात  एकत्र होतात?”
“ नाही.”
“ नाही?” खांडेकर आश्चर्याने उद्गारले.  “ तू जेव्हा प्रथम आम्हाला साक्षीदार म्हणून भेटलास त्यावेळी तू असं म्हणालास की  चैत्रापूर ते विलासपूर आणि विलासपूर ते चैत्रापूर या दोन्ही प्रवासात तुम्ही एकत्र होतात म्हणून!”
“ बरोबर म्हणालो मी.” संवत्सर म्हणाला.
“ अरे मग आता तू नाही का म्हणतो आहेस? ”
“ आम्ही परत येताना एका विमानात एकत्र होतो पण जातानाचे आणि येतानाचे विमान वेगळे होते. ” संवत्सर म्हणाला आणि खांडेकरांनी कपाळाला हात लावला.
“ जातांना आणि येतांना अनेक प्रवासी विमानात असतील तरी तू आरोपीला कसं ओळखलंस?”-खांडेकर.
“  याचं कारण म्हणजे दोन्ही प्रवासात तिने खूप डार्क रंगाचा,गॉगल लावला होता. सहसा विमानात बसल्यावर प्रवासी गॉगल लावत नाहीत,आणि लावला तर एवढा डार्क रंगाचा नाही.त्यामुळे ती बाई लक्षात राहिली.कदाचित दोन्ही वेळेला ती आणि मी एकत्र नसतो तर माझ्या लक्षात हे राहिलं नसतं.”
“ तुमचं विमान सुटायची वेळ काय होती?”
“ ५.३० ला संध्याकाळी.”
“ तू स्वत: एकाच दिवसात परत का आलास? आणि विलासपूरला पोचल्यावर पुन्हा विमानात बसलास यात किती वेळ गेला?”
“ माझा हिऱ्याचा व्यवसाय आहे. दोन्ही ठिकाणी माझी दुकानं आहेत. मी दर दोन दिवसांनी चैत्रापूर ते विलासपूर ला जातो आणि साधारण एक तासानंतरचे विमान विलासपूरवरून  पुन्हा पकडतो आणि चैत्रापूर ला परततो.  गेले अनेक वर्षे मी असा प्रवास करतोय.”
“ आणि या दोन्ही प्रवासाचे वेळी आरोपी तुझ्या विमानात होती?”
“ हो.”
“ आणि दोन्ही वेळी तिने डोळ्याला डार्क गॉगल लावला होता?”
“ हो.” संवत्सर म्हणाला.
“ या थोड्याश्या खटकणाऱ्या गोष्टीमुळे ती तुझ्या लक्षात राहिली?”
“ हो.”
“ अशा प्रकारे ओळख पटवण्याच्या प्रकाराला माझा आक्षेप आहे.”  पाणिनी म्हणाला.  “ ओळख परेड घेऊन आणि  रांगेतल्या इतर व्यक्तींनी सुद्धा डार्क गॉगल लावलेले असतांना ओळख पटवली गेली पाहिजे. ”
न्यायाधीशांनी मान हलवली. “ पुराव्याचा भक्कमपणा म्हणून तुम्ही म्हणता तो मुद्दा बरोबर आहे,पटवर्धन, पण ओळख परेड न घेता पटवलेली ओळख ही अमान्यच करायची असा अर्थ होतं नाही.” न्या.फडणीस म्हणाले. “ तुमची हरकत फेटाळत आहे मी.”
यावर पाणिनी काही बोलणार तेवढ्यात कोर्टाच्या दारात गलबला झाला.पाणिनी ने पाहिलं तर सूज्ञा पालकर आत येत होती.
“ मिस्टर खांडेकर, सूज्ञा पालकर येईपर्यंतच तुम्ही या साक्षीदाराची साक्ष घ्यायची असं ठरलं होतं.ती आत आल्ये.परिग्रह संवत्सर ची साक्ष थांबवून तुम्ही  सूज्ञा पालकर ला प्रश्न विचारायला सुरुवात करा.”  पाणिनी म्हणाला.
सूज्ञा पालकर ने पिंजऱ्यात येऊन शपथ घेतली.
“ तुमचं नाव सूज्ञा पालकर आहे आणि तुम्ही अॅडव्होकेट भोपटकर यांची सेक्रेटरी आहात?” खांडेकरांनी सुरुवात केली.
“ बरोबर.”
“ किती वर्षं नोकरी करताय भोपटकर यांचेकडे?”
“ सात वर्ष”
“ मी तुला एका विल ची प्रत दाखवतो, ती बघून तू सांग की यावरच्या सह्या रायबागी याने केल्या आहेत? आणि साक्षीदार म्हणून तू आणि भोपटकर यांच्या सह्या आहेत?”
“ हो.”
“ या सह्या करतेवेळी तुम्ही तिघेही समक्ष हजर होतात?”—खांडेकर.
“ होय.”
“ घ्या उलटतपासणी.” खांडेकर पाणिनी ला म्हणाले.
“ माझ्याकडे अत्ता एक डार्क रंगाचा गॉगल आहे.तू जरा तो घालशील का?” पाणिनीने विचारलं
“ का म्हणून?”- सूज्ञा पालकर ने उलट प्रश्न केला.
“ इथल्या सगळ्या साक्षीदारांनी गॉगल घालावा असं ठरलंय कोर्टा समोर.”  पाणिनी म्हणाला.
“ तुमचं ठरलं असेल.मी काही तेव्हा हजर नव्हते आणि माझी संमती पण नव्हती.”
“ मला समजत नाहीये खांडेकर, तुमच्या या साक्षीदाराला गॉगल घालण्यात काय अडचण आहे?” न्यायाधीशांनी विचारलं.
“ नाही,नाही. साक्षीदार गॉगल घालायला तयार आहे नक्कीच.पाणिनी पटवर्धन या आधीच्या साक्षीदाराला गोंधळून टाकण्यासाठी हिला गॉगल घालायला लावताहेत.”-खांडेकर म्हणाले.
“सूज्ञा पालकर, तुम्ही पटवर्धन सांगताहेत तसा गॉगल घाला. ” न्या.फडणीस खांडेकरांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत म्हणाले.नाईलाज होवून सूज्ञा पालकर ने गॉगल घातला.
“ छान,”  पाणिनी म्हणाला.  “ आता जरा माझ्याकडे पहा.”
साक्षीदाराने पाणिनीकडे पाहिलं. “ आता मला सांग, की तू खरोखर त्या विल ला साक्षीदार होतीस?”
“ हो.”
“ तुला हे प्रश्न विचारले जात असताना गॉगल डोळ्यावर ठेवायला हरकत नाही ना तुझी?” पाणिनीने विचारलं
“ माझी हरकत गॉगल लावायला नाही पण गॉगल लाव म्हणून मला जी आज्ञा दिली तुम्ही,त्यासाठी आहे.मी काही कुत्र नाहीये कोणीही मला हे कर, ते कर म्हणून सांगावं.” सूज्ञा पालकर म्हणाली.
“ तसं असेल तर तू गॉगल काढून ठेव आणि माझ्या रिसेप्शनिस्ट कडे देऊन ठेव.” पाणिनी म्हणाला आणि  तिच्याकडे पाठ फिरवून वकिलांसाठी ठेवलेल्या खुर्चीवर जाऊन बसला.
सूज्ञा पालकर ने डोळ्यावरचा गॉगल खेचून काढला आणि तो कोर्टात पुढेच बसलेल्या पाणिनीच्या रिसेप्शनिस्ट, गती कडे नेऊन दिला. नंतर कोर्टात अगदी मागच्या बाजूला दाराजवळच्या बाकावर जाऊन बसली.
“ मिस्टर संवत्सर पुन्हा पिंजऱ्यात या.” खांडेकर म्हणाले.
“ युअर ऑनर, सूज्ञा पालकर येण्यापूर्वी मी संवत्सर यांना प्रश्न विचारत होतो, आणि ओळख परेड शिवाय आरोपीला ओळखण्याच्या पद्धतीला अॅडव्होकेट पटवर्धन यांनी हरकत घेतली होती, अर्थात,तुम्ही ही हरकत अमान्य केली होती.  त्यामुळे आता मी..... ” खांडेकर म्हणाले.
“ ओह, मी आता माझा आक्षेप मागेच घेतो.या साक्षीदाराला उत्तर देऊ दे.”  पाणिनी म्हणाला.
“ माझ्या बरोबर विमानात असलेली स्त्री आणि आरोपीच्या पिंजऱ्यात बसलेली स्त्री यात प्रचंड साम्य होतं.” आपले शब्द अत्यंत काळजीपूर्वक निवडत संवत्सर म्हणाला.
“ घ्या उलट तपासणी.”-खांडेकर म्हणाले.
“ विमानात तुझ्या बरोबर प्रवास केलेली स्त्री ही आरोपी रती रायबागी होती की तुझ्या आधी साक्ष देऊन गेलेली सूज्ञा पालकर होती?”  पाणिनीने विचारलं
“ मी खात्रीपूर्वक नाही सांगू शकत.” संवत्सर म्हणाला.
“ अरे, मला एक प्रश्न सूज्ञा पालकर ला विचारायचा राहून गेला,” पाणिनी स्वत:शी बोलल्यासारखा पुटपुटला पण फडणीस आणि खांडेकरांना ते ऐकू जाईल याची दक्षता त्याने घेतली.नंतर बेलीफ ला उद्देशून म्हणाला,
“ जरा बघा ना,पटकन ती आहे का कोर्टात, की बाहेर गेली ती? गेली असेल तरी फार लांब नसेल गेली.” बेलीफ ने न्यायाधीश फडणीस यांची संमती घेतली आणि सूज्ञा ला बोलावून आणायला बाहेर पडला.तेवढ्यात पाणिनी रतीच्या कानात काहीतरी कुजबुजला आणि पुन्हा साक्षीदार संवत्सर याच्याकडे वळला.
“ संपूर्ण विमान प्रवासात त्या प्रवासी स्त्रीने डोळ्याला गॉगल लावला होता?”  पाणिनीने विचारलं
“ हो. पूर्ण वेळ.”
“ येत जाता दोन्ही प्रवासात?”
“ होय.” संवत्सर म्हणाला.
“ त्यामुळे तिचे डोळे तुला अजिबातच दिसले नाहीत?”
“ नाही दिसले.”
“ तुझ्या आधी इथे जी साक्ष देऊन गेली तिला तू गॉगल लावलेल्या स्थितीत पाहिलंस?”
“ हो.”
“ ती तुझ्या बरोबरच्या सहप्रवासी मुलीसारखी होती?”  पाणिनीने विचारलं
“ खरंच अवघड आहे  सारख्याच देहयष्टीच्या, अंगकांतीच्या आणि गॉगल लावलेल्या सगळ्याच स्त्रिया सारख्याच दिसतात हे मला माझ्या आधीच्या साक्षीदाराकडे पाहून जाणवलं... आणि मला वाटत सूज्ञा पालकरचा आवाज सुद्धा खूपसा माझ्या बरोबरच्या सहप्रवाशासारखा होता, मला तिचा आवाज परत ऐकता येईल? म्हणजे मला जरा खात्री करता येईल. ” संवत्सर म्हणाला.
“ याचा अर्थ अत्ता खात्री नाहीये तुला?”
“ खरं तर माझी खात्री झाली होती. जेव्हा मला आरोपीला दाखवलं गेलं होतं, तेव्हा तिने गॉगल घातला नव्हता. मी म्हणालो की तिने गॉगल घातलेला असतांना  मी पाहिलं तर मला जास्त खात्रीपूर्वक  सांगता येईल.नंतर मला तिने गॉगल घातलेला असताना दाखवण्यात आलं तेव्हा मी जास्त खात्री दिली.पण आता जेव्हा सूज्ञा ला गॉगल घातलेलं पाहिलं तेव्हा  .. आणि विशेषतः ..तिचा आवाज ऐकला तेव्हा .... मी.... मला वाटू लागलं की तिनेच माझ्या बरोबर प्रवास  केलाय...नाही... मी नाही खात्री देऊ शकणार. ”
तेवढ्यात बेलीफ धापा टाकत आत आला. “ मला नाही पकडता आलं तिला.मला येतांना पाहिलं तिनं आणि ती  एखाद्या पुरुषाला लाजवेल अशा चपळतेने जिन्या वरून खाली उतरली आणि गर्दीत मिसळली.माझ्याहून ती तरुण आहे आणि मला तिच्या एवढं जोरात पळता नाही आलं, आणि ती सटकली.”
“ मी कोर्ट कामकाज थांबवतोय आता. मला या घटनेच्या मुळाशी जायचंय आता. उद्या सकाळी  दहा वाजता पुन्हा कोर्ट चालू होईल.” न्यायाधीश म्हणाले आणि उठून आपल्या केबिन मधे गेले.
( प्रकरण १५ समाप्त.)

 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel