विंध्य पर्वतातील युद्ध संपले होते. नक्की राजा कोण ह्याची पर्वा आता कुणालाच नव्हती. सामान्य माणूस पोटाची खळगी भरण्यात मग्न होता. हयग्रीवाचे घर कड्याकपाऱ्यांत असल्याने त्याला लोक कमीच भेटत. विंध्यकन्या नदीतून कधी कधी छोट्या नावा जात. हयग्रीवाने नदीच्या एका बाजूला लहानसा लाकडी धक्का बांधला होता. छोट्या नावा कधी कधी तिथे थांबत आणि हयग्रीव त्यांना अन्न पुरवी. दोन्ही मुले होईल तशी वडिलांची मदत करत. कुणी कधी जुने कपडे, इतर साधने देत. युद्ध संपले असले तरी असंख्य जनावरं युद्धाच्या झळीने जंगलांत पळाली होती. मालक नसलेले घोडे, युद्धग्रस्त भागातून पळून आलेले गायी बैल इत्यादी. अनेक वेळा ही जनावरे जखमी अवस्थेत असत. त्यातून काही जनावरे गोळा करून हयग्रीव ने एक आपला गोठा निर्माण केला होता.

दोन्ही मुलांना सोडून कधीही मोठ्या बाजारपेठेंत जावे असे हयग्रीवला कधीच वाटले नाही. कारण त्याला बाहेरील जगाचा थोडा तिटकारा किंवा भीतीच वाटत होती. पण दोन्ही मुले जहाजाने जाणाऱ्या लोकांच्या अतिरंजित कथा ऐकत आणि त्यांना बाहेरील जगाची ओढ लागली होती.

"बाबा कधीतरी मला बाजारांत घेऊन जा ना. ते पेढा कि काय म्हणतात ते मला खायचे आहे." लहानगी हयग्रीवकडे हट्ट धरत असे.

आज नाही उद्या हा तर्क दररोज चालणार नाही हे हयग्रीवला ठाऊक होतेच.

शेवटी एक दिवस हयग्रीवने हिम्मत केलीच. गोविंदा हा त्याचा एक घोडा वयस्क असला तरी तगडा होता. त्याला घेऊन हयग्रीवने स्वतः बनवलेल्या एका खटार्यातून शेजारच्या अलकापुरी नगरांत जायचे असे त्याने ठरवले. दोन्ही मुले प्रचंड आनंदली होती. हयग्रीवला दारूचे अड्डे सोडून बाजारपेठेचा जास्त अनुभव नव्हता तरी त्याने काही रक्कम जमा केली होती. विंधकन्या नदी पार करायची तर सर्वांत जवळचा पूल साधारण ३ कोस दूर होता. तिथून पुढे ३ कोसांवर अलकापुरी नगरी होती. हयग्रीवच्या आठवणी प्रमाणे तिथे मोठे दारूचे गुत्ते एक दोन वेश्यागृहे होती आणि त्याहून आत कपड्यांची एक मोठी बाजारपेठ. त्याच्या मागे शहराचे नगराधिपती शोण घराणे ह्याचा मोठा वाडा होता आणि त्यांचा बगीचा नेहमीच लोकांसाठी खुला असायचा आणि तिथे अन्नदानसुद्धा चालू असायचे. शहराच्या मध्यभागी महावराहाचे मोठे मंदिर आणि त्याला लागून मोठी धर्मशाळा.

युद्धाच्या काळांत हे शहर थोडेसे बकाल झाले होते तरी आता ह्या शहरात पुन्हा तारुण्य आले आहे अशी बातमी हयग्रीवने एका प्रवाश्या कडून ऐकली होती. मंदिर, बगीचा ह्या गोष्टी कदाचित मुलांना आवडतील आणि शक्य झाले तर एखादी पाठशाळा सुद्धा पाहून नंतर मुलाला तरी तिथे शिकवायला पाठवू शकू असा हयग्रीवचा विचार होता.

सूर्योदय होण्याच्या आधीच हयग्रीवची दोन्ही मुले उठून बसली होती. धाकटीने तर अख्खा पाण्याचा माठ घेतला होता. मोठा भाऊ तिला "पाणी सगळीकडे मिळते, माठ घेण्याची गरज नाही" म्हणून चिडवत होता.

हयग्रीव आत गेला आणि त्याने आपली जुनी पेटी उघडली. त्याच्या सर्वांत खाली त्याची जुनी कट्यार होती. त्याने ती बरोबर घेतली कारण युद्ध संपले तरी चोरी मारीच्या गोष्टी ऐकू येत होत्याच. पण ती चालवता येईल का ह्याची खात्री त्याला नव्हती. गायीचे काही दूध, काही फळे आणि भाजीपाला सुद्धा त्याने घेतला. कारण नगरात चांगला भाव मिळू शकला असता. शक्य झाल्यास एक चांगला खटारा विकत घ्यायची हयग्रीवची मनीषा होती. सूर्याची पहिली किरणे विंध्यकन्या नदीच्या पात्रांत पडली तेव्हाच म्हातारा गोविंदा त्यांचा खटारा ओढत चालू लागला.

एकच घोडा असल्याने वेग कमीच होता त्यामुळे कधी कधी हयग्रीव आणि पोरे दोन्ही त्यातून उतरून बाजूला चालत. कुठे काही रानटी फळें, काही ठिकाणी रस्त्याच्या बाजूला असलेल्या छोट्या देवळी  अश्या विविध गोष्टींचा आस्वाद घेत ते चालले होते. गाडी चढाव काढत होती. इथे नदीच्या दोन्ही बाजूना छोट्या टेकड्या होत्या आणि त्यामुळे लाकडी पूल बांधणे  सोपे झाले होते. इतक्यांत दुरून एक तरुण पळत येताना दिसला.

धापा टाकत तो हयग्रीव च्या गाडीच्या जवळ पोचला. त्याच्या चेहेऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. शरीर त्याचे कृश होते, चेहरा थोडा बावळट आणि कपडे जुने. अंगमेहनत त्याला मानवत नव्हती हे स्पष्ट होते.

"अहो पुढे अस्वल आहे" त्याने हयग्रीवला म्हटले.

"बाबा मला पाहायचे आहे अस्वल." दोन्ही  पोरे ओरडली.

हयग्रीवने त्या तरुणाशी बात केली. अस्वलांना मनुष्याचा सहवास आवडत नाही. त्यामुळे गाडी पाहून ती पळून जातील. असे त्याने त्याला सांगितले. भीती वाटते तर आमच्या बरोबर ये हयग्रीवने त्याला म्हटले. पाहून तरी तो तरुण चोर चिलट वाटत नव्हता.

घाबरत का होईना तो त्यांच्या गाडीच्या सोबत चालू लागला. काही वेळातच त्यांना ते अस्वल दिसले. ते बरेच दूर होते आणि गाडीचा आवाज पाहून तर ते आणखीन दूर पळून गेले.

इथे त्या तरुणाची आणि हयग्रीवच्या मुलांची चांगलीच मैत्री झाली. मुले त्याला हे अमुक झाड, तमुक झाड विषारी असली माहिती देत होते आणि त्याला काहीच ठाऊक नव्हते.

"तुम्ही ह्या भागांत काय करता पाहुणे ? तुम्हाला ह्या भागांत कधी पहिले नाही" हयग्रीवने प्रश्न केला. माणूस बावळट वाटला तरी हयग्रीव कुणावरही विश्वास ठेवणार्यापैकी नव्हता. त्याने माणुसकीतील वाईट तत्व फारच जवळून पहिले होते.

तो तरुण थोडा गांगरला. "हो मी थोडा नवीन आहे ह्या बाजूला."

"तुम्ही चांगले सभ्य मुले-बाळे असलेले शेतकरी दिसता"  त्याने थोडा केविलवाणा चेहेरा करत म्हटले.

"माझे वडील कमलपूर नगरीतील जहागीरदार होते. मी खूप श्रीमंत घरात जन्माला आलो. " त्याने आवंढा गिळत म्हटले.

हयग्रीवने किंचित डोळे बारीक करून त्याच्याकडे पहिले.

"हे जे राजे महाराजे ह्यांचे युद्ध झाले त्यांत आमचा परिवार नष्ट झाला. काहीच वर्षांची गोष्ट आहे. दोन्ही राजे आमच्याकडून खंडणी मागत. वडिलांनी शक्य असेल तितके धान्य आणि पैसे दोघांनाही दिले. शेवटी एका महाभयानक राक्षसाने आमच्यावर हल्ला केला. माझ्या वडिलांना मारले. त्या एकाच राक्षसाने किमान २०-२५ आमच्या सैनिकांना कापून काढले माझी आई घाबरून मला आणि काही मोजके दागिने घेऊन पळाली. तिच्या वडिलांचे एक मोठे शेत इथे होते आणि एक विश्वासू सेवक. शेत जंगलात होते तिथे आम्ही गुपचूप राहिलो. तो सेवक खूपच वृद्ध होता तो वारला. त्यानंतर माझी आई वारली. मला शेतकाम येत नव्हते. त्यामुळे तिचे दागिने आणि इतर वस्तू शक्य असेल तसे विकून मी पोट भरत आलो. आता हे दोन शेवटचे दागिने राहिले आहेत. ते विकून तेच पैसे घेऊन कुठे तरी आईनं म्हणतो पण मला असे एकटे जायला भीती वाटते. तुम्ही चांगले निष्पाप सबाह्य माणूस दिसता म्हणून सांगतो. "

हयग्रीवच्या डोळ्यापुढे कमलापूरच्या जहागीरदारांचा वाडा आला. त्या भयानक रात्री त्याला १० सुवर्णमुद्रा त्याच्या सेनापतीने दिल्या होत्या. शत्रुसैन्याला अन्न आणि पैसे देत होता म्हणून कमलापूरच्या जहागीरदाराच्या वाड्याला आग लावून नेस्तनाबूत करायला त्याला सांगितले होते त्यानेच फक्त ५-६ सैनिकांना घेऊन तिथे काळ बनून आगमन केले होते. त्या आगीत आणि नरसंहारात कुणीच वाचणार नाही असे त्याच्या सैनिकांनी त्याला सांगितले होते पण स्पष्ट होते की किमान दोघे जण वाचले होते.

"पण आता तर युद्ध संपले आहे ना. कमलापूर मध्ये लावून आपला हक्क का सांगत नाही ?" हयग्रीवने विचारले.

"हक्क सांगण्यासारखे तिथे काहीही राहिले नाही. नवीन राजांनी ती जहागीर आणखीन कुणाला दिली. तो माणूस मला पाहताक्षणी मारून टाकेल. त्या शिवाय आता ह्या प्रदेशांत राजाचा न्याय राहिला नाही. युद्धांत अनेक नराधम निर्माण झाले ते राजाच्या नावावर इथे भरपूर लुटालूट करतात. वाट्टेल त्या वस्तू आणि कधी कधी स्त्रिया सुद्धा उचलून नेतात. त्यामुळे माझा हक्क मला मिळेल ह्याची शाश्वती नाही. त्या एका नराधमाने आमचे जीवन उध्वस्त केले. आता तो कुठे तरी मरून पडला असेल स्वतः" त्या माणसाने म्हटले.

हयग्रीव चालता चालता विचार करू लागला. त्याच्या पुर्वाश्रमाने त्याला मागे सोडले होते असे त्याला वाटत होते पण कदाचित प्रारब्ध काही तरी वेगळे सांगत होते.

क्रमशः 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel