तो एकटाच निघाला. त्याला शेतकर्‍याची स्थितीही स्वत:च्या डोळयांनी पाहायची होती. ती पाहा एक मुलगी, पोटाशी कोंबडे धरून जात आहे. तिने ओळखले की, हेच ते जमीनदार नवीन मालक. तिने त्याला नमस्कार केला. ती पटकन् पळून गेली. त्याला गंमत वाटली. आपली यांना भीती वाटते असे मनात येऊन त्याला जरा विषाद वाटला. आपल्या या झकपक पोषाखामुळे ही गरीब माणसे जवळ येत नसावीत, असे त्याला वाटले. ती एक अशक्त बाई दोन बादल्या घेऊन येत होती. वाटेत तिने त्या टेकल्या. तिने त्या धन्याला नमस्कार केला. तो आता गावांत शिरला. जिकडे तिकडे शेणाचा, मुताचा वास येत होता. ठायी ठायी खतांचे ढीग होते. शेतकरी कामावरून परत येत होते. पुष्कळ अनवाणीच होते. त्यांचे कपडे शेणामातीने मळलेले होते. रेशमी कपडे घातलेला हा कोण साहेब, असे त्यांना वाटले. अजूनही कोणी खताने भरलेल्या गाडया शेतांकडे नेत होते. घरांतून, झोपडयांतून बायका बाहेर येऊन पाहात होत्या. एका माणसाने धीर करुन पुढे येऊन विचारले,

‘त्या बायांचे आपण भाचे ना?’

‘होय. कसे काय तुमचे चालले आहे?’

‘आमची स्थिती पाहायला आलात वाटते?’ दुसर्‍या एकाने विचारले.

‘बघायचे काय धनी? माझ्या घरात लहानमोठी बारा माणसे आहेत. दर महिन्याला दीड-दोन मण धान्य विकत घ्यावे लागते. कोठून आणायचे पैसे?’

प्रतापने त्या घरात पाहिले. फाटक्या चिंध्या अंगावर असलेली मुले, बायामाणसे त्याने पाहिली. त्यांच्या डोळयांत तेज नव्हते. त्याने विचारले,

‘पुरेसे धान्य तुम्ही का नाही पिकवीत?’

‘अधिक जमीन करायला मिळते कोठे? तिघांना धान्य पुरेल इतकीच जमीन मला मिळाली आहे.’

‘मग कसा चालवता संसार?’

‘कर्ज काढतो. एकजण शहरात गेला आहे; चाकरी-धंदा, काही रोजगार मिळाला तर करायला.’

‘तुम्ही खंड किती भरता?’

‘एकावन्न रूपये रोख ठरला आहे. परंतु भाव नाही. खंड कमी नको होता का करायला?’

असे म्हणून तो शेतकरी घरात गेला. तो बायकोला म्हणाला, ‘धनी आले आहेत. कांबळ घाल बसायला.’ त्याच्या बायकोने घोंगडी घातली. तो बसला. त्या शेतकर्‍याची म्हातारी आई बाहेर आली.

‘बरे आहात धनी?’ म्हातारबाईने विचारले.

‘होय आजी. तुमची स्थिती बघायला आलो आहे.’

‘कसे तरी जगतो. हे घर, ही खोपटीसुध्दा कोसळायच्या बेतात आली आहे. एक दिवस आम्ही तिच्या खालीच गाडली जाऊ. परंतु हा म्हणतो की जातील अजून चार महिने. राहिलो आहोत राजाप्रमाणे. कधी चटणी-भाकरी, कधी भाकर-चटणी, गंमत आहे गरिबांची. धनी, काय सांगावी आमची दशा. न बोलणे बरे!’

‘मला द्या थोडी चटणी-भाकर.’
त्याने थोडी चटणी-भाकर खाल्ली.
‘साधी कोरडी भाकर. चटणीही मसालेदार नाही धनी.’

येथे अंगणांत आता बरीच लहानमोठी माणसे जमली. प्रताप उठला.

‘बसा हां. येतो मी.’

‘मेहेरबानी झाली. तुमचे पाय घराला लागले.’

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel