श्रावणाचे दिवस होते. आकाशात आपले अस्तित्व टिकवून ठेवू पाहणाऱ्या सूर्याने ढगांचा काळा तंबू फाडून आपली किरणं पृथ्वीच्या पृष्ठभागावर टॉर्च मारल्यासारखी मारली होती आणि डोकावून खाली काय सुरु आहे हे पाहण्याचा तो प्रयत्न करत होता. अशा मन उदास करणाऱ्या वातावरणात रेल्वे स्थानकावर तो एक विचित्र अपघात कसा काय घडून आला हे मला आजही न उमगलेले कोडे आहे.

त्या दिवशी शहरातली बहुतेक ऑफिसेस अनपेक्षितपणे बंद होती. मळभट वातावरणात बेडूक रस्त्याच्या कडेला घुटमळत होते आणि एकसारखे डराव डराव करत होते बहुधा वातावरण त्यांच्या आवडीनुसार थोडे आणखी मळभट होण्याची वाट पाहत होते. परंतु सूर्य आणि ढगांच्या चालू असलेल्या लपंडावामुळे ते हैराण झाले होते. अधून मधून सूर्याची किरणे प्रखर होताच त्यांना नाईलाजास्तव लपून बसावे लागत होते.ढगाळ हवामानाचा पुरेपूर फायदा करून घेण्याच्या आशेने कुत्र्यांनी रस्त्याच्या कडेला त्यांच्या प्रेयसीला मस्का मारायला सुरुवात केली होती  परंतु जेव्हा निसर्गाने विरुद्ध खेळ केला, तेव्हा त्यांनी त्यांची प्रणयक्रीडा थांबवली आणि पळ काढला, असे झाले तरी  त्यांची वासना अजूनही शमली नव्हती हे नक्की.

अशा अनेक कोड्यांनी घातलेल्या गोंधळाने भरलेल्या एका विक्षिप्त दिवशी शेंद्री आमच्या आयुष्यात आला होता. खरं सांगू, शेंद्री आमच्या आयुष्यात आला नाही तर त्याला हेतू पुरस्सर आणण्यात आले होते. मला अगदी स्पष्टपणे आठवते कारण या एपिसोडचा फारच कमी भाग मी विसरु शकलो आहे.

त्या दिवशी मळभ आल्यामुळे सगळ्यांनाच आळस भरला होता म्हणून दुपारच्या जेवणासाठी मिसळ आणि बटाटावडा खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडलो होतो. मी माझ्या आवडत्या नेहमीच्या सप्रे मामांच्या क्षुधा शांती गृहातून २ मिसळ, ४ बटाटेवडे आणि थोडा एक्स्ट्रा रस्सा असा जिन्नस घेऊन निघालो. वाटेत मॉडर्न बेकरीतून ४ पावाच्या लाद्या घेतल्या आणि जोडीला काहीतरी गोड हवं म्हणून २ बनपावाची पाकिटे नि मस्का पण घेतला. एकूण काय आज रेडीमेड लंच करायचा बेत होता.

मी घराच्या दिशेने चालायला लागलो, तेव्हा मला हा मुलगा फूटपाथवर उभा असल्याचे दिसले, अगदी लहानसा २ अडीच फुट उंची असेल. तशी मला रस्त्यांवरील लोकांकडे पाहण्याची सवय नाही आणि लहान मुलं तर नाहीच नाही, परंतु शेंद्री मध्ये काहीतरी असे होते ज्यामुळे माझे मन  पहिल्या दृष्टीक्षेपातच अस्वस्थ झाले होते ज्यामुळे माझे लक्ष त्याच्याकडे वेधले गेले.

त्याने एक पांढरा हाफ शर्ट घातला होता आणि वरपर्यंत सगळी बटणे लावलेली होती. खाली, त्याने निळ्या रंगाची हाफचड्डी घातली होती जी त्याच्या गुडघ्यापर्यंत होती. त्याच्या पायात काहीच नव्हते आणि त्यामुळे माझे लक्ष विशेष वेधून घेतले गेले. कोणते क्रूर पालक आपल्या  मुलाला चपला घातल्या शिवाय बाहेर पाठवतील? आणि तेही या वातावरणात?

मग मी वर त्याच्या चेहऱ्याकडे पाहिले आणि पाहताक्षणीच माझ्या मनात निरनिराळ्या विचारांचे मंथन सुरु झाले. त्याचा चेहरा बदामाच्या आकाराचा आणि रेखीव होता, त्याच्या अरुंद हनुवटीपर्यंतची चेहऱ्याची ठेवण पाहता त्यात कमालीची सममिती दिसत होती. नाक काहीसे व वरच्या बाजूला फेंदारलेले होते आणि मी त्याचे जबडे एकदम घट्ट बसवले होते असे वाटत होते जणू काही तो गुपित लपवून ठेवत आहे. पण, सर्वात ठळक वैशिष्ठ्य म्हणजे त्याचे डोळे - त्यांच्यामध्ये  विशेष चमक होती. डोळ्याच्या काळ्याभोर भावल्या पूर्णपणे गोलाकार होत्या आणि त्यांच्या मागे पंढरी शुभ्र बुबुळे होती. त्या काळ्याभोर डोळ्यांच्या वर फक्त एक सेमी वर काळे कुळकुळीत सरळ साधना कट सारखे केस आले होते जे डोळ्यात येत होते पण त्याने त्याला काहीच फरक पडत नव्हता. असा हा पोरगा!

मला पाहून त्याने हाक मारली आणि मी जागच्या जागी थबकलो. मग  जेव्हा त्या मुलाला कळले की त्याच्याकडे माझ्याकडे लक्ष आहे, तेव्हा तो माझ्याशी बोलू लागला.

"साहेब, मी शांतपणे झोपू शकेन अशी जागा तुम्हाला माहीत आहे का?"

त्याचा हा प्रश्न ऐकून माझे मन अस्वस्थ झाले. सायन हॉस्पिटलचा तो रस्ता, अनेक बेवारस, भटक्या आणि उनाड पोरासोरांचे आश्रयस्थान म्हणून ओळखला जातो. समजा त्या क्षणी रस्त्याच्या कडेला एखादा बेघर भिकारी भसाड्या आवाजात गाणं गात असता आणि हार्मोनियम वाजवत असता तरी एकवेळ मी एक ५-१० रुपयाचे नाणे त्याच्या समोर पसरलेल्या रुमालावर टाकले असते आणि त्याने त्याचे समाधान झाले असते. पण एक छोटासा मुलगा झोपायला जागा नाही म्हणून रडवेला झालेला पाहून माझे मन विषण्ण झाले कारण त्यावेळेस त्याला काय उत्तर द्यावे हे मला कळलेच नाही.

"तुझे आई बाबा कुठे आहेत?" मी विचारले.

"माझे कोणीच नाही," तो म्हणाला.

"मग तू कुठून आलास?"

"मला माहित नाही. मी झोपलो होतो. मला जाग आली तेव्हा मी इथेच होतो.”

मला ती कथा खोटी वाटली नाही. लहान मुलांचे अपहरण करून त्यांना भीक मागण्यासाठी आमच्या परिसरात आणण्यासाठी अनेक समाज कंटक आमच्या भागात सोकावले होते. तो त्यांचाच एक बळी असल्यासारखे वाटत होते.

"तुझं नाव काय आहे?" मी विचारले.

"मला आठवत नाही."

इतक्यात ढगांचा प्रचंड गडगडाट झाला आणि अचानक आभाळ फुटले कि काय असे वाटले , आणि उन्मत्त झालेला पाउस खाली जमिनीवर झेप घेऊ लागला. मी रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानाच्या पॅरापेटच्या खाली आसरा घेतला, पण तो मुलगा जागेवरच एखाद्या अविचल झाडाप्रमाणे उभा राहिला.

"अरे पोरा, इकडे ये!" मी ओरडलो. "इकडे छपराखाली ये."

त्याने माझ्याकडे पाहिलं, थोडा वेळ काढला आणि मग त्याने मनाशी काहीतरी विचार केला. मग सावकाश पावलं टाकत तो माझ्या शेजारी आला.

“हे बघ, माझे घर इथेच आहे, या बिल्डिंगमध्ये. मी आता निघणार आहे, ठीक आहे?" मी जवळपास  ओरडतच होतो कारण ढगांचा गडगडाट आणि जोरदार पाऊस यामध्ये माझा आवाज त्याला ऐकू यायला मला हवा होता. “पण मी माझ्या घरी जाऊन पोलिसांना फोन करतो. ते येऊन तुला घेऊन जातील आणि तुझे घर शोधतील.”

"नाही!" तो माझ्यापेक्षा मोठ्या आवाजात ओरडला, त्याचा आवाज त्रासलेल्या उंदराच्या किंकाळीसारखा वाटत होता. “पोलिस नाही! मी पळून जाईन. ”

“पण का? ते तुला मदत करतील.”

“नाही! ती वाईट माणसे आहेत. ते लोकांना घेऊन जातात आणि आपण त्यांना पुन्हा कधीही पाहू शकत नाही. ते मला माझ्या जवळ नको आहेत. मी खरच पळून जाईन; मी खोटं बोलत नाहीये.”

त्याने कदाचित त्या क्षणी त्याचे म्हणणे खरे केले असते, पण मी चटकन त्याचा खांदा पकडला.

“ठीक आहे, ठीक आहे,” मी म्हणालो. "पळू नकोस, ठीक आहे? पण लहान मुलांसाठी हे ठिकाण चांगले नाही. माझ्या घरी ये. हा पाऊस कमी होईपर्यंत मी माझ्या बायकोला तुला घरी राहू द्यायला सांगेन. मग आपण काय करायचं याचा विचार करू."

"तुम्ही खरच असं कराल?" तो म्हणाला, आणि आपल्या आजूबाजूला पावसाचे थेंब असूनही, मला वाटले की मी त्याच्या डोळ्यांत अश्रू पाहिले होते. "तुम्ही खूप छान आहात, सर."

“मला सुदेश म्हण,” मी म्हणालो.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel