एक होता राजा. त्याला होत्या दोन बायका. पहिल्या बायकोला दोन मुले होती. एक मुलगा एक मुलगी. दुसऱ्या बायकोला मूलबाळ काही नव्हतें बऱ्याच वर्षांनी राजाची पहिली बायको मेली. तेव्हां तिची दोन्ही भुले अगदी पोरकी झाली. सावत्र आई त्यांचे अतिशय हाल करूं लागली. त्यांना पुरेसे खायला द्यायची नाही, प्यायला द्यायची नाही. अनेक कष्टाची कामें सांगायची.

अशा रीतीने त्रासांत दिवस काढता काढतां ती मुलें खंगत चालली. त्यांच्या अंगांत बिलकूल त्राण उरले नाही. त्यांची सावत्र आई तर त्यांचा जास्त जास्तच द्वेष करूं लागली. अशा तऱ्हेने दिवस चालले असतां एके दिवशी त्या दृष्ट राणीच्या मनांत आले कीया दोन्ही पोरांना मारून टाकावे. तेव्हां तिनं बाजारांतून जलाल विष आणले व त्याचे दोन लाडू तयार केले. आणि ते त्या बहिण-भावंडांनां खावयास दिले.

इकडे लाडू मिळाल्यामुळे त्या दोन मुलांना फार आनंद झाला. मुलाने आपला लाडू खाल्ला पण फार दिवस पोटांत कांहीं नसल्यामुळे त्याची भूक काही भागली नाही तेव्हां तो बहिणीला काय म्हणतो, 'ताई, ताई, तुझा लाडू मला देग. मला अतोनात भूक लागली बघ.'

भावाचे ते शब्द ऐकून बहिणीला अतिशय वाईट वाटले व तिने स्वतःची मुळीच फिकीर न करता आपला लाडू त्यालाच खावयाला दिला. तो दुसरा लाडू खाल्ल्याबरोबर मुलाच्या अंगांत विष चांगलेच भिनले. एकाएकी त्याच्या पोटांत भडभडून आले व त्याने तात्काळ प्राण सोडला.

इकडे राणी मनांत मांडे खात होती की विषाचे लाडू खाऊन दोन्ही मुले मरून जातील. पण तिला जेव्हां मुलगा मेल्याचे वृत्त कळले तेव्हां तिचा आनंद मावळला. मुलगी मेली नाही म्हणून तिला फार दुःख झाले. तेव्हां मुलीची ब्याद कशी नाहीशी करावी अशी तिला काळजी पडली व तिने पुन्हां मुलीचे हाल करण्यास प्रारंभ केला. जेवायला घालायचे नाही, मरेमरेतों काम सांगायचे, असे पूर्ववत् करूं लागली.

इकडे भाऊ मेला त्याला बहिणीचा हा छळ पाहून फार दुःख झाले व तो बहिणीच्या स्वप्नांत येऊन तिला म्हणतो, 'ताई, काय ग तुझे हाल होताहेत हे ? मी आतां खडकावर कोथिंबीर होतो ती खाऊन तूं रहा.' बहीण म्हणाली बरें. व तेव्हांपासून ती खडकावर रुजलेली कोथिंबीर खाऊन राहू लागली.

पुनः ती पूर्वीसारखी सुंदर दिसू लागली. राणी मनांत म्हणते, मी हिला खावयाला देत नाही, प्यावयाला देत नाही, हाल करत्ये. तरी ही पूर्वीप्रमाणे सुंदर दिसते आहे. तेव्हां ही चोरून काही तरी खात असावी. म्हणून तिने गुप्तपणे तिच्यावर नजर ठोवली. ती जाते कुठे व करते काय ? तेव्हां तिला कळले की, ती खडका-वरची कोथिंबीर खाऊन राहाते. तेव्हां त्या दुष्ट राणीने राजाचे मन वळवून ती सर्व कोथिंबीर उपटून टाकविली व पुन्हा त्या मुलीचे हाल करूं लागली.

तें पाहून पुनः त्या मुलीचा मेलेला भाऊ तिच्या स्वप्नांत आला व कळवळून तिला म्हणतो, 'ताई ग, आतां मी राजाच्या तळ्यांत सोन्याचा मासा होतो. मोठमोठे लोक मला तांदूळ घालतील ते  मी तुला देईन. व तो राजाच्या तळ्यांत मासा होऊन राहिला.

सोन्याचा मासा पाहून सर्व लोकांस मोठा चमत्कार वाटला. सर्व लोक हौसेने त्याला तांदूळ घालीत. ते जमवून तो आपल्या बहिणीला देई. अशा तऱ्हेने तांदूळ मिळू लागले, तेव्हां पुन्हा बहीण आनंदाने राहूं लागली. इकडे मुलगी पूर्ववत् दिसू लागलेली पाहून राणीला शंका आली व तिने बारकाईने चौकशी केली तेव्हां तिला कळले की ती सोन्याच्या माशाचे तांदूळ खाऊन राहाते, म्हणून तिने दुष्टपणाने राजाकडून ते तळेच आटवून टाकले व सावत्र मुलीचे हाल आरंभिले.

इकडे तो मुलगा बहिणीची कीव येऊन पुनः तिच्या स्वप्नांत आला व म्हणतो, 'ताई, आतां मी आंब्यावर कीर होतो. मी आंबे खाईन व तुला टाकीन.' बहीण म्हणाली बरें. तेव्हांपासून पुनः तिचे दिवस आनंदांत जाऊ लागले. राणी साहेबांना जेव्हां कळले की राज- कन्या पोपटाने टाकलेले आंबे खाऊन राहाते तेव्हा तिने राजाकडून ते झाडच तोडविलें. बिचाऱ्या मुलीच्या दैन्यावस्थेस पारावारच राहिला नाही.

तेव्हां चौथ्यांदा तिचा भाऊ तिच्या स्वप्नांत आला व म्हणाला, ' ताई आतां मी देवा दारी मोर होतो. देवापुढे लोक तांदूळ ठेवतील ते खाऊन आपण राहूं.'

बहीण हर्षित होऊन म्हणाली 'बरें भाऊ.'

त्या दिवसापासून तो मुलगा देवा- दारी मोर झाला व ती बहीण भावंडे देवापुढचे तांदूळ खाऊन राहूं लागली.

ते पाहून राणी द्वेषानी भडकली व तिने मोरालाच मारून टाकिलें व मुलीची छळणा आरंभिली. इकडे असें चालले असतां राजाची बायको गर्भार राहिली. राजाला फार आनंद झाला व तो तिचे सर्व लाड पुरवू लागला.

आपल्या बहिणीचे हाल कळसाला गेलेले पाहून पुन्हा  भाऊ तिच्या स्वप्नांत आला व म्हणतो 'ताई सावत्र आईने तुला फार छळले व हा छळ कमी व्हायचेही मला काही चिन्ह दिसत नाही. आतां मला एक युक्ति सुचते आहे ती करितों. मी या सावत्र आईच्याच पोटी येतो. बारशाच्या दिवशी एकाएकी मी रडून रडून आकांत करीन. तेव्हां तूं मला घेऊन

खडका कोथिंबिरी

जळामध्ये मासा

आंब्यावरी कीर

देवादारी मोर

राजाघरी थोर

भाई माझा

 

अशी ओवी म्हण. म्हणजे मी उगा राहीन.' बहिणीने तें कबूल केले.

 

पुढे नऊ महिने लोटल्या- वर राणीला एक अत्यंत सुंदर पुत्र झाला. राजाला अती आ नंद झाला. पुढे आठ दहा दिवस आनंदांत गेल्यावर बारसें आलें. पण बारशाच्या दिवशी मुलाने असा आकांत मांडला की सगळ्यांच्या तोंडचे पाणी पळाले. काही केल्या तो उगाच राहीना. तेव्हां बहीण म्हणाली, 'मी घेऊन बघतें' म्हणून तिने त्याला मांडीवर घेतले व

खडका कोथिंबिरी

जळामध्ये मासा

आंब्यावरी कीर

देवादारी मोर

राजाघरी थोर

भाई माझा

अशी ओवी म्हटली. त्याबरोबर तो मुलगा एकदम रडावयाचा थांबला. ते पाहून राजाला फार आश्चर्य वाटले. त्याला त्या गाण्याचा अर्थच कळेना. म्हणून त्याने मुलीला विचारले की या गाण्याचा अर्थ काय ? तेव्हां मुलीने राजाला पहिल्यापासून सगळी हकीकत सांगितली.

ती ऐकून राजाला इतका क्रोध आला की त्याने ताबडतोब राणीचे नाक कापवून, त्यांत तिखट मीठ भरलें व गाढवावरून धिंड काढून तिला राज्याबाहेर घालवून दिले.  

इटकुली मिटकुली गोष्ट सरो तुमचे आमचे पोट भरो.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel