अगदी अचानक ठरले आणि आम्ही तिघे कोकणात जायला निघालो. साताऱ्यातून मेढामार्गे महाबळेश्वरला जाणे म्हणजे सध्या एक अग्नी दिव्य आहे. रस्त्याची अगदी चाळण झालीय. खरेतर महाबळेश्वरला पोहोचायलाच दोन तास लागल्याने कोकण ट्रिप कॅन्सल करून महाबळेश्वर फिरून परत जावे असे वाटत होते. अति पावसामुळे सगळेच रस्ते खराब झालेत. त्यामुळे पुढचा आंबेनळी घाट आणि कोकणातला रस्ता सुद्धा खराब असेल तर प्रवास खडतर होईल आणि ट्रीपच्या एन्जॉयमेंट ऐवजी त्रासच व्हायचा. पण तरीही पुढे निघालो. नास्ता करायला प्रतापगडच्या पायथ्याशी असलेल्या `कोल्ड स्पॉटला' आवर्जून गेलो. पण त्याची पार रया गेलीय. अतिशय भिकार नास्ता मिळाला. तसे मी त्या मॅनेजरला बोलूनही दाखवले. पुढे सातारा जिल्ह्याची हद्द सोडून रत्नागिरी जिल्ह्याची हद्द लागल्यावर अनपेक्षितपणे रस्ता चांगला लागला. घाटात प्रचंड पावसाने खराब झालेला भाग रत्नागिरी पीडब्ल्यूडी ने तत्परतेने दुरुस्तही केलाय. ते बघून आपल्या पीडब्ल्यूडीला शिव्यांची लाखोली वाहावी असे वाटत होते. पुढे पोलादपूर वरून खेडला जाताने मुंबई-गोवा हायवे लागला. त्याचे काम चालू आहे. पण कशेडी घाटातला रस्ता आणि काम चालू असूनही जो काही हायवे तयार आहे तो चांगलाच आहे. मध्ये मधे थोडेसे बॅड पॅचेस आहेत. पुढे खेड-दापोली-मुरुड हाही रस्ता चांगला टिकून आहे. आपल्यापेक्षा जास्त पाऊस पडूनही ते रस्ते चांगले मेंटेन ठेवलेत. वेळच्यावेळी रस्त्याची काळजी घेतली तर सार्वजनिक बांधकाम खात्याला पावसाच्या आड दडायची आणि लोकांच्या शिव्या खायची वेळ येणार नाही.

जेवणाच्या वेळेपर्यंत मुरुडला पोहोचलो. खरेतर अनेकदा जाऊन आपल्याकडच्या लोकांना मुरुड बीचची सवय झालीय. पण अजून बरेच हॉटेल्स हर्णे रोडला सुद्धा झालेत. मुरुड एवढ्या वर्षांनीही आहे तसेच आहे. गावच्या एकुलत्या एक चौकात असलेली ३-४ किराणा मालाची दुकाने सोडली तर नवीन कुठलेही मार्केट नाही. साधे मेडिकल सुद्धा नाही, त्यासाठीही २ किलोमीटरवरील आसूद फाट्यावर जावे लागते. इतके पर्यटक येऊनही गावात सुधारणा का नाही हे कळले नाही. कदाचित `आम्ही आपले असेच साधे सुधे बरे' असा टिपिकल कोकणी विचार या गावाने अंगिकारला असावा. नाही म्हणायला गावातील अनेक घरांच्या बाहेर `येथे घरगुती जेवण्याची आणि राहण्याची सोय आहे' असे बोर्ड भरपूर आहेत. कमी पैशात राहायचे असेल तर असे अनेक पर्याय आहेत. हॉटेल सिल्व्हर सॅन्डला गेलो. बुकिंग काही केले नव्हते. पण तिथे ४५०० रेट सांगितला. त्यापुढेही दोन-तीन हॉटेल बघितले तर सर्वांनीच भरमसाठ रेट वाढवलेत. मग डावीकडील रस्त्याने जात `हॉटेल ड्रिमलँड' गाठले. तिथे मात्र २५०० ला रुम मिळाली. बीच अगदी समोरच आहे. रूम साध्य कौलारू असल्या तरीही वाईट नक्कीच नाहीत. आणि तसेही सिमेंट काँक्रीटच्या पेक्षा या साध्या कॉटेजेस राहायला बऱ्या. मी २२-२३ वर्षांपूर्वी पहिल्यांदा मुरुडला गेलो असेल. त्यानंतरही अनेकदा जाणे होतच. पूर्वी इथे मोजकी हॉटेल्स होती पण आता एकट्या मुरुड ग्रामपंचायतीच्या कक्षेतच ४८ हॉटेल्स झालेत. त्यामुळे चॉईस भरपूर उपलब्ध झालेत. पर्यटक वाढल्याने हॉटेलमध्ये सर्व प्रकारचे मासे मिळतात. त्यामुळे खवैय्यांना पर्वणीच आहे.

कर्दे बीच आता चांगला आकार घेतोय. शनिवार रविवार व इतर सुट्ट्यांच्या दिवशी इथे बऱ्यापैकी गर्दी असते. संध्याकाळी बीचवर जेटस्की, मोटारबोटिंग, स्लीपर, बम्पर, बनाना राइड्स असे अनेक वॉटरगेम्स सुरु झालेत. बलून राईड आहे पण आम्ही गेलो त्यावेळी मात्र बंद होती. बीचवर चौपाटी सारखे वातावरण झालेय. अनेक छोटे मोठे खाद्य पदार्थांचे स्टॊल उभे आहेत. घोडागाडी, उंट, आणि इतर गाड्यांच्या राइड्स आहेत. एकंदरीत दोन-तीस तास आरामात वेळ जाईल अशा सुविधा झाल्यात. पूर्वी बीच सोडून काही नव्हते. त्यामुळे अनेकजण बोअर होऊन जायचे. सकाळी सकाळी लवकर उठून बाहेर पडलात तर बोटवाले खोल समुद्रात घेऊन जातात आणि `डॉल्फिन दर्शन' घडवून आणतात. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे गोव्याच्या मानाने इथले सर्व वॉटरगेम्स अतिशय स्वस्त आहेत. अगदी प्रत्येकी २०० रुपयात या राइड्स होतात. गोव्यात याचसाठी ७०० ते १००० रुपये मोजावे लागतात. संध्याकाळ अगदी मस्त गेली. जेवणही उत्तम होते. मासे तर छान होतेच पण कोकणातील स्पेशल मोदकही मस्त. दोन दिवस सुद्धा राहायला आता काही हरकत नसावी एवढ्या गोष्टी आहेत.

सकाळी नाश्ता उरकून हर्णे बंदराला गेलो. पूर्वी इकडे काही फार हॉटेल्स नव्हते पण आता हाच रोड महत्वाचा ठरणार असे वाटायला लागलाय. इकडे भरपूर हॉटेल्स झालेत. अगदी गोव्याच्या धर्तीवर उंच डोंगरावरसुद्धा अनेक मोठमोठ्या रिसॉर्टची बांधकामे चालू आहेत. हर्णे गाव सुद्धा चांगलेच सुधारले आहे. अनेक दुकाने उभी राहिलीत. गावातला सर्व रस्ता काँक्रीट पेव्हर्सचा झालाय.पर्यटकांच्या सोयीच्या अनेक वस्तू इथे मिळू लागल्यात. काही दिवसांनी हे हर्णे गाव गोव्याच्या कलंगुट च्या रस्त्यांसारखे झगमगून जाणार हे नक्की. त्यामानाने मुरुड गाव काही बदलायला तयार नाही. हर्णे बंदरला खरेतर नांगरून पडलेल्या अनेक मच्छीमारी बोटी सोडून बघायला काही नाही. काही बोट वाले शेजारच्या हर्णे किल्य्याला घेऊन जातात. एवढ्या वेळा हर्णेला जाऊन या किल्ल्याला भेट द्यायचा योग्य काही आला नवहता तो यावेळी जुळून आला. योगायोगाने एक बोट ७ जणांना घेऊन हर्णे किल्यावर जाणार होती. वेळ जुळून आली म्हणून आम्हीही गेलो. सगळ्या बाजूंनी पाण्याने वेढलेला हा किल्ला शिवाजी महाराजांच्या काळातील आहे. या किल्ल्याला `सुवर्णदुर्ग' असे नाव आहे. महाराजांच्या आरमारी सामर्थ्याच्या पाऊलखुणा म्हणून ओळखला जाणारा हा जलदुर्ग तसा अभेद्य होता. याचा मुख्य महादरवाजा हा पूर्वेकडून आहे. पण आता समोर वाळू साठल्याने बोटीने तिथे उतरता येत नाही. त्यामुळे शेजारच्या खडकाळ भागावर उतरून या किल्ल्यात जाता येते. समुद्रातून आत तटबंदीत प्रवेश केल्याबरोबरच दोन तोफा आहेत. त्यांची अवस्था खूपच वाईट आहे. अशा गंजून जाण्यापेक्षा एखाद्या संग्रहालयाला दिल्या तर हा ऐतेहासिक ठेवा टिकून तरी राहील. मुरुड जंजिरा, सिंधदुर्ग त्यांच्यासारखाच संपूर्ण खऱ्या पाण्याने वेढलेल्या या सुवर्णदुर्गातही एक गोड्या पाण्याची विहीर आहे. पश्चिम बाजूच्या तटबंदीतून बाहेर समुद्रात जाण्याचा एक गुप्त दरवाजा आहे. आणीबाणीच्या परिस्थिती याचा वापर होत असावा. आवारात अनेक जुन्या वाड्यांचे जे अवशेष दिसतात त्यावरून आणि बाजूच्या भक्कम तटबंदीवरुन पूर्वीच्या काळी या किल्ल्याचे महत्व आणि वैभव दिसून येते. आता मात्र बाहेरील तटबंदी आणि महादरवाजा सोडला तर आत काहीही शिल्लक नाही. असे किल्ले बघितले कि मन खरंच विषन्न होते. पण त्याचवेळी शिवाजी राज्यांच्या सामर्थ्याची आणि दूरदृष्टीचीही कल्पना येऊन उर अगदी अभिमानाने भरून येतो. असो.

हा जलदुर्ग बघून आम्ही परत फिरलो. पुढे खरेतर `आंजर्ले' या गावी जायचा विचार अगोदर होता पण वेळेअभावी गेलो नाही. हर्णे वरून पुढे ५-६ किलोमीटरवर हे आंजर्ले आहे. कोकणातील एक टुमदार स्वच्छ गाव. अर्थात मध्ये खाडी आहे त्यामुळे बोटीने जावे लागते. आता पूलही झालाय पण बराच मोठा वळसा घालून जावे लागते. या अंजर्लेला एक गणेश मंदिर आहे आणि अतिशय स्वच्छ बीच आहे. उशीर झाला म्हणून यावेळी तिकडे न जात परत हॉटेलवर जाऊन बॅग आवरली आणि रस्त्यात कुठेतरी जेवण करूया म्हणत बाहेर पडलो. एकाने सुचवले म्हणून दापोलीजवळील `सरबराई' या नवीन झालेल्या हॉटेलमध्ये जेवण खूप छान मिळाले पण रेट मात्र भरमसाठ होते. पुन्हा महाबळेश्वरला पोहोचलो तेंव्हा रात्र झाली होती. मार्केटमध्ये एक चक्कर टाकून टोल गेलेला परवडला पण मेढा रोड नकोच असे म्हणत पाचगणी मार्गे सातारा गाठले. आणि अशी आमची हि दोन दिवसांची कोकण ट्रिप मस्त पूर्ण झाली............

अनिल दातीर

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel