गेल्या आठ-दहा महिन्यातला हा कोरोना काल जवळ जवळ प्रत्येकाच्या दृष्टीने आयुष्यभरात कधीही विसरता न येणारा ऐतेहासिक कालखंड असेल. हा अनुभव घेतलेली पिढी अगदी आपल्या नातवांना सुद्धा या भयाण कालखंडाचे किस्से कहाण्या नक्कीच सांगत राहतील. अनेकांनी स्वतः या कोरोनाचा अनुभव घेतलाय, काहींनी आपल्या जवळच्या, ओळखीतल्या, नात्यातल्या लोकांना हे जग सोडून जातानाचे दुःख अनुभवलंय. डोळ्यादेखत जग सोडून जाताने पाहिलंय असंही म्हणता येत नाही, कारण जे गेले ते अक्षरश: बेवारशासारखं एकटेच आपलं जगणं सोडून अनंतात विलीन झालेत. पण माणूस मोठा विलक्षण प्राणी आहे. आलेल्या संकटावर मात करत पुन्हा उभं राहायची जबरदस्त ताकद मानव जातीला जन्मजात मिळालीय. अजूनही या कोरोनाने आपला पाठलाग सोडलेला नाही. पण माणसांनी मात्र आता या कोरोनाला आपलं मानून टाकलय असं वाटतंय. अर्थात गाफील न राहता योग्य ती काळजी घ्यायलाच हवी यात काहीच शंका नाही............असो.

आमच्या बीएआय चे लोकही असेच वैतागलेले होते. व्यवसाय बंद, उत्पन्न बंद, कामगार पैसे मागताहेत, पैसे देणारा कोरोनाचं कारण सांगतोय, पण घेणारा मात्र पुन्हा पुन्हा फोन करून आर्जवं करतोय. घरात बसून बसून टीव्ही, बघून बघून किती बघणार, दिवसेंदिवस पोटाचा घेर मात्र चंद्रकलेसारखा कलेकलेने वाढतोच आहे. मनावर एक विषन्नतेचं सावट कायम रेंगाळत असतंय...... आताशा हळूहळू सरकारनेही अनेक निर्बंध मागे घेतलेत. घरात अडकलेले लोकही बाहेर पडू लागलेत. जमेल तेवढी काळजी घेत, मनात घाबरत व्यवसायही सुरु झालेत. त्यामुळे गेले अनेक महिने कुठेही जायला न मिळाल्याने वैतागलेले अनेकजण जमेल त्या पर्यटनस्थळांना भेटी देऊ लागलेत. याचं समर्थन नक्कीच करायचं नाही, पण मनातली मरगळ झटकून टाकायचा दुसरा पर्यायही नाही. अशीच मग आमच्या टीम बीएआयची टूम निघाली कि गोव्याला जाऊ. यावर्षी ना पावसाळी ट्रिप झालीय, ना परदेशवारी झालीय, मग गोव्याला तरी जाऊया. हे ऐकून काहींच्या भुवया उंचावल्या, काहींनी विरोधाचा सूर लावला तर अनेकांनी मात्र कल्पना उचलून धरली. काहींना तर उत्साहाचं अगदी उधाण आलं. मला खरंतर जायची इच्छा असूनही `आपण जावे' हे बुद्धीला पटत नव्हते. पण अखेर मित्रांनी केलेल्या आग्रहाने कोरोनाच्या भीतीवर मात केली, आणि अगदी शेवटी शेवटी माझे नाव यादीत सामील झाले. मनाशी मात्र ठरवले होतेच कि जेवढी जास्तीत जास्त काळजी घेता येईल तेवढी घेऊ. त्यात महाराष्ट्र सरकारने जाहीर केले कि दिल्ली, गुजरात आणि गोवा राज्यातून येणाऱ्या लोकांना ७२ तास अगोदर RTPCR टेस्ट करूनच येता येईल. तशी टेस्ट करून घेण्याची सर्वांनी मानसिक तयारी ठेवत एका लॅबशी संपर्कही केला होता. पण सरकारी घोषणा या बऱ्याचदा घोषणाच ठरतात हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. ऑर्डर काढणारेही अजब आहेत. सर्व वाहतुकीला परवानगी दिलीय, मिनिटाला एक वाहन हायवेने पास होतंय, कोणा कोणाची आणि किती तपासणी करणार? गोवा बॉर्डरवर होणारी तपासणी म्हणजे अशीच कामचलाऊ आहे, हे लवकरच सिद्ध झाले. अनेकांच्या संपर्कातले बरेच जण गोव्यावरून येत होते, आणि त्यांच्याकडून येणाऱ्या बातम्यांमधून बॉर्डरवर चेकिंग नावाच्या भातुकलीच्या खेळाबद्दल माहिती मिळत होती. आणि मग आपण काही RTPCR करायची गरज नाही असे सर्वानुमते ठरले. मुळात प्रत्येकाला आपल्या जीवाची काळजी होतीच, त्यामुळे एखाद्याला बारीकसा जरी त्रास वाटत असता तर त्याने यायचे नाव काढलेच नसते. नियोजन कमेटीनेही अगोदर तसे आवाहन केले होते. त्यामुळे होकार भरणारे सगळेच जण फिट अँड फाईन या कॅटेगरीत मोडणारेच होते.

ठरल्याप्रमाणे ट्रिपचा दिवस उजाडला आणि सकाळी सकाळी सर्व जनता नियोजीत ठिकाणी हजर होऊ लागली. सर्वांचा उत्साह अगदी ओसंडून वाहत होता. अनेकांच्या मनात गोव्यात गेल्यानंतर काय काय करायचे याचे प्लॅन्सही ठरत होते. नियोजित वेळेपेक्षा तासभर उशिरा का होईना पण सर्वांचे प्रस्थान झाले. गाडीतही मास्क काढायचा नाही असे ठरले होते, पण त्यातला फोलपणा थोड्याच वेळात कळून आला. दरवाजा उघडा नि मोरीला बोळा असेच घडणार होते. मग चेहऱ्यावरचे मास्क हळूच हनुवटीवर येत येत कधी खिशात जाऊन स्थिरावले हे कळलेही नाही. सगळे बरोबरच दोन तीन दिवस राहणार असल्याने किमान आपापसात मास्क आणि सोशल डिस्टंसिंग पाळता येणे शक्यच नाही हे सर्वानाच कळून चुकले होते. कोल्हापूरच्या `साई इंटरनॅशनल' या भव्य, छान, स्वच्छ रेस्टोरंन्टला मनसोक्त नाश्ता केल्यावर मात्र मनात लपलेल्या कोरोनाच्या भीतीने कधीच काढता पाय घेतला होता आणि सर्वजण पूर्णपणे ट्रीपच्या मूडमध्ये उतरले होते.

यावर्षी सगळीकडेच पावसाळा अतिशय चांगला झाला आहे. त्यामुळे सगळॆकडेच हिरवा निसर्ग आपल्या विविधरंगी छटांची उधळण करत मनमोहून टाकणारे नजारे उभारून आपलं स्वागत करत आहे. NH -४, सोडून बहिरेवाडी-आजरा मार्गे आत जाताने अगदीच भरगच्च जंगल नसले तरीपण इतरवेळी जाणवणारा रखरखीतपणा अजून तेवढा जाणवत नाही. त्यामुळे प्रवास कंटाळवाणा होत नाही. पुढे हिरवी झाडी वाढत गेली आणि आंबोली घाटाची चाहूल लागली कि प्रवासाचा खुमार कसा कणाकणाने वाढत जातो. त्याबरोबर काही उत्साहवर्धक पोटात गेलं कि मग काय उत्साहाची परिसीमाच गाठली जाते. आतापर्यंत असंख्य वेळा गोव्याला जाणं झालंय, इतर मार्गांनीही गेलो असलो तरीही बहुतांशी वेळा आंबोली घाटातूनच जाणे होते. सातारकरांना गोव्यात जायला हाच सर्वात जवळचा, सोयीचा आणि सुंदर मार्ग आहे. पावसाळा संपून गेल्यामुळे आंबोली च्या धबधब्याला अगदीच किरकोळ पाणी आहे. पण अनेकजण तिथेही गर्दी करून आनंद घेत होते. खरंतर गर्दी टाळायला हवीय, हे अनेकांना कळत असूनही वळत मात्र नाही. त्या धबधब्यात गर्दी करून आपला आणि इतरांचाही जीव धोक्यात घालणं सध्याच्या काळात तरी ठीक नाही. आम्ही तरी कोणी त्या ठिकाणी जाताने किंवा येतानेही थांबलो नाही. धबधबा सोडला तरी मुळात आंबोली घाट इतका सुंदर आहे कि या घाटातून होणारा प्रवास नेहमीच मनाला भुरळ घालत असतो. दूरपर्यंत पसरलेले हिरवे गर्द घनदाट जंगल, दिवसाही अगदी स्पष्ट ऐकू येणारा रातकिड्यांचा किर्रर्र आवाज, निरनिराळ्या पक्षांचे आवाज, रस्त्याच्या कडेला, कट्टयावर बसलेली, झाडांवर लोम्बकळणारी असंख्य माकडं, नशीबवान असाल तर पटकन रस्ता क्रॉस करून पळणारा एखादा ससा, भेकर, मूंगूस, भरारी घेणारा भारद्वाज, क्वचित शेकरू, मोरांचा थवा असंही काहीबाही नजरेला पडून जातं. या घाटात कुठेतरी थांबून कट्टयावर उभे राहत दूरवर पसरलेल्या जंगलावरून नजर टाकणे, तिथला भरारनारा स्वच्छ, शुद्ध वारा आपल्या फुफुस्सात भरून घेणे हेही या घाटातल्या प्रवासातील एक न टाळता येणारं आकर्षण आहे. मलातर हाच काय इतर कुठलाही घाट, कुठलेही जंगल, किंवा अगदी साधेसे माळरानावर वाढलेली चार सहा काटेरी बाभळीची झाडंही तेवढाच आनंद देऊन जातात.

असा हा घाटातला सुंदर, मनप्रसन्न करणारा प्रवास संपतो तो कोकणाची चाहूल देणाऱ्या सावंतवाडीत. इथल्या भालेकरांच्या खानावळीत विविध प्रकारच्या मच्छीवर ताव मारणे हाही गोवा प्रवासातला नेहमीचा प्रघात. यावेळी मात्र चव जरा घसरल्यासारखी वाटली. इथे गर्दी कायमच असते. आम्ही शक्यतो आमच्या आमच्याच ग्रुपशी संपर्क येईल हे कटाक्षाने पाहत होतो. भरपेट जेवण करून सावंतवाडीच्या तळ्याला वळसा घालून गोव्याकडे निघालो. हायवे येईपर्यंतचा रस्ताही असाच छान वळणावळणाचा, गर्द झाडीतून जाणारा. नंतर हायवेला लागला कि मात्र भन्नाट वेग. शेवटी प्रत्येक रस्त्याची आपआपली एक खासियत असते. मुंबई गोवा हायवे चांगलाच आकार घेतोय. पूर्वीच्या खाणाखुणा आता कुठे दिसत नाहीत. गेल्या चार ट्रीपपासून रेंगाळणारं हे काम अजूनही पूर्णत्वाची वाट पाहत आहे. त्यामुळे कुठे मध्येच चकचकीत रस्ता आला कि `वा मस्त' असं म्हणत रस्त्याची तारीफ करावी, आणि थोड्याच वेळात येणाऱ्या डायव्हर्जन वरून गचके खात `च्यायची रे ह्याच्या........' असं म्हणत काँट्रॅक्टरच्या, सरकारच्या नावाने शेलकी शब्दसुमनं उधळीत हुळहुळणाऱ्या भागाला दिलासा द्यावा, हीही प्रवासातील एक गम्मत असते.

बास, यावेळीही असाच प्रवास एन्जॉय करत म्हापस्या जवळ पोहचलो. गूगल मॅप अर्थात GPRS आता मला वाटत अत्यावश्यक सेवे मध्ये टाकायला पाहिजे. या `मड्डम' च्या भरोशावर विश्वास टाकून अगदी जग भ्रमंतीला जायला हरकत नाही. बास तेवढं इंटरनेट मात्र मिळालं पाहिजे, ते मध्येच गायब झालं तर मात्र अगदी आंधळ्या माणसासारखी अवस्था होऊन जाते. आजही पूर्णपणे याच्याच साहाय्याने गोव्याच्या उत्तरेकडील मोरजीम बीचवरच्या `ला कबाना, स्पा अँड रिसॉर्ट' या छानशा हॉटेलवर पोहोचलो. हॉटेल ट्रॅडिशनल पद्धतीचं वूडन बांधकामात केलेले आहे. काही व्हिलाज आणि कॉटेजेस. परिसर मात्र मात्र अतिशय सुरेख. अतिशय सुबक लँडस्केपिंग, एका ओळीत उभारलेले असूनही प्रत्येकाचे खाजगीपण सांभाळत उभारलेले व्हिलाज, कॉटेजेस, त्यातील सुबकता, बाहेरचे व्हरांडे, वरच्या बाल्कनी एकंदरीत सर्वच छान. या रूम्सपेक्षाही मोहक आहे तो हॉटेलचा संपूर्ण परिसर. पुढे स्विमिंग पूल, रेस्टोरेंट, हिरवंगार मऊशार लॉन, त्याला लागून समुद्राकडे तोंड करून असलेला लाकडी डेक आणि त्यापुढचा सुंदर बीच. हे `ला कबाना' तसं जरा लांब आहे. याच्या जवळपास म्हणावे असे मार्केटही नाही. कलंगुटला जायचे म्हणजे १९ किमी, पणजी तर ३५ किलोमीटर. त्यामुळे `निवांत पडे रहो' या उद्देशाने गेलात तर मन अगदी प्रसन्न होईल. इथला बीच अतिशय क्लीन आहे. मुळात तिथे फारसे कोणी येत नाही. जवळपासच्या हॉटेलातून येणारे पर्यटक त्यांच्या त्यांच्या भागातच असतात. त्यामुळं बीच वर विनाकारण गर्दी नाही. त्यापेक्षाही महत्वाचे म्हणजे कचरा बिलकुल नाही, वाळू अगदी चाळून घेतल्यासारखी एकसारखी, स्वच्छ, तिच्यात शंख शिंपले सुद्धा नाहीत. शिवाय अंगाला चिकटणार नाही. इथे मच्छीमारीच्या बोटी नाहीत. त्यामुळे समुद्र किनाऱ्यांवर जाणवणारा तो ओशट, उग्र वास नाही, समुद्रातून वाहून आलेले ऑईलचे तवंग नाहीत. खाऱ्या पाण्याचा अमर्याद स्विमिंग पूल. परदेशातले समुद्रकिनारे जाऊदे पण आपल्याच देशाच्या अंदमानात मात्र असे स्वच्छ सुंदर बीच आहेत. ते किंबहुना यापेक्षाही सरस आहेत. समुद्राकडे बघताने नेहमी मला तर आपल्या खुजेपणाची जाणीव होते. त्या अमर्याद दर्यापुढे आपण म्हणजे एवढासा धूलिकण. तो मात्र अनंत, अनादी, मानवाच्या अवाक्यापलीकडचा भव्य.

आमचे इथे दोन मुक्काम होते पण तसा नियोजित कार्यक्रम काहीही नव्हता. ज्याला जसे वाट्टेल तसे त्याने एन्जॉय करावे. बहुतांशी लोक हॉटेलच्या अँबियन्स वरच एवढे खुश होते कि बाहेर जावेसेही वाटत नव्हते. आमच्या ४५ जणांच्या ग्रुप व्यतिरिक्त तिथे अजून एक मुला-मुलींचा ग्रुपही होता. त्यांचा तर तिथे फॅशन शो होता. त्यामुळे त्यांनी डीजे, कॅमेरे, लायटिंग सगळंच केलेले होते. हॉटेल तसे ऐसपैस असल्याने दोनीही ग्रुप साठी वेगवेगळ्या ठिकाणी जेवणाची व्यवस्था ठेवली होती. त्यांच्या डीजेच्या ठेक्यावर आमची मंडळीही मनसोक्त नाचली हे ओघाने आलेच.

प्रत्येकाचे प्रोग्रॅम ऐच्छिक असल्याने आम्ही काहीजण कॅसिनोला गेलो. काहीजण इतर काही ठिकाणी आपल्या आवडीनुसार गेले. दुसऱ्या दिवशीही कोणी पणजीला गेले, कोणी कलंगुट, बाघा, अंजुना या बीचवर फेरी मारून आले. ज्याला हवे त्याने शॉपिंग केले. डेकेथलॉनचा एक भव्य मॉल २५ किलोमीटरवर होता, तिथेही काहीजण फेरफटका मारून आले. कोणी `स्पा' चा आनंद घेतला. समुद्र स्नानाचा आनंद दोन्ही दिवशी घ्यावासा वाटला तो केवळ तिथल्या स्वच्छ बीचमुळे. या हॉटेलचे विशेष म्हणजे दोन दिवस हा फॅशन शो होता, एकेदिवशी सकाळी एका म्युझिक अल्बमचे शुटिंगही होते आणि आम्ही परत फिरलो त्या संध्याकाळी अजून एका लग्नाची तयारीही चालू होती. हॉटेलचा स्टाफ बऱ्याच प्रमाणात मास्क वापरत होता, आणि स्वीमीन्ग पूल बंद होता एवढ्या दोन गोष्टी सोडल्या तर कोरोनाचा कुठलाही परिणाम इथे जाणवत नव्हता. रस्त्यानेही खूप कमी लोक मास्क लावलेले दिसत होते. कॅसिनोत, मॉल मध्ये मात्र मास्क कम्पलसरी ठेवावा लागत होता.

दोन दिवस एन्जॉय करून तिसऱ्या दिवशी सकाळी निघायचे असे ठरले होते, पण इथूनच जेवण करून जायचं आहे म्हटल्यावर सर्वच निवांत होत आपापपल्या ऍक्टिव्हिटीमध्ये व्यस्त होते. आदल्या दिवशी दुपारी नारळांच्या झाडांच्या सावलीत लॉन वर छान पैकी बैठक झाली. पेयपानाबरॊबरच रंगलेल्या गप्पा आणि महत्वाचे म्हणजे अनेक नवीन चेहरे असल्याने सर्वांची ओळख परेड अतिशय रंगली. एकमेकांच्या मनातल्या अनोळखीपणाच्या, लहान मोठेपणाच्या, गरीब-श्रीमंतीच्या अदृश्य भिंती गळून पडल्या आणि सर्व ग्रुप अजूनच एकवटला गेला. अशा सगळ्या आनंदात दोन अडीच दिवस तिथे व्यतीत करून दुपारचे जेवण करून सर्वजण परत निघालो. येताने मात्र सगळेच विस्कळीत होते. त्यामुळे कोण पुढे कोण मागे, असे होत होत सगळेजण सुरक्षित साताऱ्यात पोहोचलो.

या ट्रिपचा मूळ उद्देश हा साईट सीईन्ग असा काही नव्हताच. सात-आठ महिने सगळ्यांच्याच मनाला कुरतडणारी कोरोनाची भीती आणि त्यामुळे मनावर साठलेले उदासीनतेचे मळभ एकदाचे दूर भिरकावून द्यावेत, काही क्षण आपल्या मित्रमंडळींबरोबर मनसोक्त आनंद मिळवावा, व्यवसायात आलेल्या मंदीमुळे स्वतःलाही आलेली मरगळ झटकून टाकावी आणि फ्रेश उल्हसित पॉझिटिव्ह ऍटिट्यूडने पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करावी असा होता. भेटूच पुन्हा अशाच एखाद्या दौऱ्यानंतर............

अनिल दातीर

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel