शनिवारी सकाळीच माझा मित्र तृप्तेश कदम चा फोन आला. `कोयनानगरला येतोस का? अर्जेंटिना-फ्रांस' फुटबॉल मॅच चिंटूच्या हॉटेलवर बसून बघू.' मॅच बघण्यात इंटरेस्ट नसला तरी कोयनानगरला फिरण्यात नक्कीच इंटरेस्ट होता. ऑफिसचे काम सम्पुन दुपारी ३.३० ला आम्ही दोघे बाहेर पडलो. त्यावेळी साताऱ्यात बऱ्यापैकी पाऊस पडत होता. कोयनेला जायचे म्हणजे उंब्रज-मल्हार पेठ-पाटण-कोयनानगर हा नेहमीचा मार्ग. पण मी म्हटले `आज जरा वेगळ्या रस्त्याने जाऊ या'. म्हणून मग ठोसेघर मार्गे निघालो. सज्जनगड-ठोसेघर घाट पास केला. ठोसेघर च्या धबधब्याला सध्या चांगले पाणी असल्याने भरपूर पर्यटक दिसत होते. आम्ही तिथे न थांबता पुढे चाळकेवाडी कडे निघालो. इथपर्यंतचा रस्ता आणि परिसर वस्ती आणि वाहतूक असलेला आहे. पण चाळकेवाडी पठाराच्या पुढे मात्र टोटल निर्मनुष्य म्हणावा असा भाग. चाळकेवाडीपर्यंत पवनचक्क्या दिसतात त्याच आपण खूप आहेत असे म्हणतो पण पवनचक्क्यांचे खरे जंगल `विंड-फार्म' तर पुढेच आहे. चाळकेवाडी ते वन कुसवडे हे पठार सुझलॉन कंपनीच्या हजारो पवनचक्क्यांनी भरून गेलेले आहे. इथे आसपास एकही वस्ती नाही. सुजलॉनचे कर्मचारी क्वचित कुठे दिसले तरच. बाकी २०-२५ चौरस किलोमीटरचा हा परिसर फक्त पवनचक्क्यांचे नंदनवन. सुझलॉन ने इथे जाण्यायेण्यासाठी रस्ता केलाय. पूर्वी तो फारच भयानक होता पण आता मात्र तो बराचसा डांबरी झालाय. ७-८ किलोमीटर अजून कच्चा आहे पण खड्डे नसलेला खडीचा रस्ता आहे.

या पठारावर वारा अतिशय वेगाने वाहतो. त्यामुळेच इथे एवढ्या पवनचक्क्या झाल्यात. आम्ही गेलो तेंव्हा प्रचंड धुके होते. पाऊस पडत होता. १०-१२ फुटाच्या पुढे काही दिसत नव्हते. मस्त थ्रिलिंग अनुभव. गाडीची लाईट चालू आहे कि नाही हे कळत नव्हते. हॉरर सिनेमात दाखवतात तसा अचानक एक ट्रक धुक्यातुनच उगवल्यासारखा समोर आला. अगदी १५ फुटावर आल्यावर आम्हाला दिसला. कचकन ब्रेक दाबत मी गाडी थांबवली, त्यानेही ट्रक थांबवला आणि मग हळूच आम्ही पास झालो. यानंतर पुढे काही दिसत नव्हते पण मी २-३ महिन्यापूर्वी याच रस्त्याने `काठिटेक' या गावाला एका मित्राच्या फार्म हाऊसवर गेलो होतो, त्यामुळे रस्ता माहित होता पण धुक्यात काही दिसत नव्हते. आणि एका ठिकाणी रस्ता चुकलाच. डावीकडे जाणारे वळण धुक्यात न दिसल्याने मी पुढेच गेलो. रस्ता अगदीच खराब झाला. दगड-धोंड्यांमधून गाडी चालवणे मुश्किल होते. रस्ता चुकल्याची खात्री झाली. तृप्तेशने गुगल सुरु केले. त्यावर तर तोच रस्ता दाखवत होते. तेवढ्यात धुक्यात दोन गायी रस्ता क्रॉस करताने दिसल्या. मी गाडी थांबवून कोणी दिसतंय का बघितलं. धुक्यात कोणी दिसत नव्हते पण काही वेळाने दूर एक गुराखी दिसला. त्याने मुख्य रस्ता मागे राहिल्याचे सांगितले पण याही रस्त्याने पुढे जाऊन डावीकडे गेले कि परत तो रस्ता मिळेल असे सांगितल्याने पुढे जात राहिलो. आणि गुगल वाल्या बाईंनी फसवले हो. मुख्य रस्त्याला लागल्यावर उजवीकडे वळायचे होते पण गुगल वाल्या मॅडमने डावीकडे रस्ता दाखवला. काही तरी चुकतंय हे वाटत होतं पण गुगल वर भरोसा. इतक्यात पुन्हा धुक्यातून एक महिंद्रा जीप उगवली. त्यातील सुझलॉन मध्ये काम करणाऱ्या काकांनी आम्हाला चुकीच्या दिशेला चालल्याचे सांगितले आणि मग परत गाडी वळवून घेत आम्ही पाटण कडे निघालो. हे `गुगल मॅप' जोपर्यंत नेट कनेक्शन चांगलं असतंय तोवर चांगलं काम करतंय पण रेंज गेली कि मग मात्र गंडवतंय राव.

रस्ता खडबडीत असला तरी खूपच मोहक होता. आजूबाजूची हिरवळ, खुरटी जंगली झाडे, बुजगावण्यासारख्या उभ्या असलेल्या पवनचक्क्या आणि त्यांचा `घु...घु....घु.... असा धडकी भरवणारा आवाज. अविस्मरणीय अनुभव. हे पठार पवनचक्क्यांबरोबरच फुलांसाठी पण प्रसिद्ध आहे. कास सारखीच फुले इथेही बहरतात. पुढे आम्हाला चांगला रस्ता लागला आणि दूरवर घळीत दिसणाऱ्या पाटणकडे आम्ही निघालो. पण हा घाट इतका घुमाँवदार आहे कि प्रवास समापता संपेना. निसर्ग मात्र खूप सुंदर. कॅलिफोर्नियाच. सातारा ते पाटण उंब्रज मार्गे ५५ किलोमीटर पण ठोसेघर वरून मात्र ते ७५ किलोमीटर भरले. अंतर जास्त असले तरी आमचा अनुभव नक्कीच प्रसन्नदायी होता. त्यामुळे चेंज म्हणून या रस्त्याने जायला हरकत नाही. तीन तासानंतर आम्ही कोयनानगरला पोहोचलो. या कोयनानगरला मी खूप वेळा गेलोय. पण हे स्थिर चित्रासारखं कायमच सेम दिसतं. गेल्या अनेक वर्षात इथे काहीही बदल झालेला नाही. मुळात हे काही गाव नव्हे, हि खरीतर `कोयना-वसाहत'. धरणाचे कामासाठी वसवलेली हि वसाहत. त्यामुळे सर्व जागा, कॉलनीज शासकीय आहेत. त्यामुळे त्यात काही बदल करता येत नाहीत. त्यात आता कोयना हे अभयारण्य आणि व्याघ्र प्रकल्पात मोडत असल्याने पूर्ण संरक्षित क्षेत्र. नवीन बांधकामांना परवानगी नाही. त्यामुळे काही बदल करता येत नाही. पण आपल्या कास सारखेच विना परवाना हॉटेल्स मात्र भरपूर झालेत. आमचा मित्र विक्रम घड्याळे उर्फ चिंटू याने ओझर्डे धबधबयाच्या रस्त्यावर छान फार्म हाऊस (हॉटेल) बांधलंय. एका बाजूला कोयनेचा जलाशय, दुसऱ्या बाजूला उंच हिरवे डोंगर आणि त्यातून वहाणारे असंख्य छोटे मोठे धबधबे, आजूबाजूला गर्द हिरवाई, पशु पक्षांचा सहवास. एक-दोन दिवस शान्तपणे एन्जॉय करण्यासाठी अगदी आयडियल ठिकाण. (वृन्दावन हॉलिडे होम्स-विक्रम घड्याळे -९५४५१११५११).

आम्ही हॉटेलवर पोहोचलो त्यावेळी अगदी शांतता होती. पक्षांचे आणि वाहणाऱ्या पाण्याचे आवाज येत होते. दुर्दैवाने कुठे तरी पोल पडल्याने लाईट गेलेली होती. अजून एक १२ जणांचा ग्रुप आलेला होता. आम्ही गेलो होतो फुटबॉल मॅच बघायला, पण लाईट नसल्याने टी,व्ही, बंद होता. लाईट आली तेंव्हा २-२ अशी बरोबरी होती, पण थोड्याच वेळात फ्रान्सने तिसरा आणि काही वेळाने चवथा गोल करत तृप्तेश सपोर्ट करत असलेल्या अर्जेंटिनाची वाट लावली होती. दुसऱ्या ग्रुपचा दंगा खूप वेळ चालू होता. त्या गोंधळात कधी झोप लागून गेली ते कळले नाही.

सकाळी जाग आली ती पक्षांच्या किलबिलाटाने. मी उठून त्या सुंदर वातावरणात मस्त अर्धा तास चालून आला. इथे पाऊस नव्हता. फक्त ढगाळ हवा होती. नंतर आवरून बाहेर पडलो आणि ओझर्डे धबधब्याला गेलो. परत साताऱ्याला यायचे असल्याने भिजलो नाही. लांबूनच बघत पुन्हा गाडीत आलो. येताने रस्त्यातही अनेक धबधबे होते. सकाळी अकरापर्यंत साताऱ्यात पोहचलो. अजेंटिनाच्या नावे आमची हि मस्त ट्रिप जमा झाली.

अनिल दातीर

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel