रात्रीचे जवळपास पावणे एक वाजले होते. पाऊस रिमझिमपणे अलगद पडत होता. आणि मी माझ्या घराकडे चहा पिऊन निघालो होतो. तुम्ही म्हणालं, मी नेमका इतक्या रात्री बाहेर गावाहून वगैरे आलो होतो का? तर तसं नाही. केवळ चहाची तलप. म्हणून एवढ्या रात्री जवळपास एक किलो मिटर अंतर असलेल्या कॉर्नरवर यावं लागलं तसा मी घरी चहा बनवून पीत असतो पण आज चहा बनवण्याचा मूड उरला नव्हता. आणि त्यात आज घरी मी एकटाच होतो. माझी ओळख म्हणजे माझं नाव अंकित. पण आईने आजवर अंक्याशिवाय कधीच हाक मारली नाही. तर मी होतो घराकडे परतायच्या रस्त्यावर. मी आता बंद असलेल्या टपरी जवळ येऊन पोहोचलो. पुलावरच्या लाईट्स मला त्यांच्याकडे पाहण्यास आकर्षित करीत होत्या पण तेवढ्यातच समोरून अचानक सात-आठ मुलींचा घोळका येताना दिसला. बहुतेक त्या कंपनीतून आल्या असतील असा अंदाज वर्तवत मी पुढे चालल्या गेलो. पण एका आवाजाने माझे पाय जागीच थबकले. आणि माझी मान मागे वळल्या गेली. तो आवाज त्या मुलींपैकी एकीची किंचाळी होती. अचानक घडलेला तो प्रसंग पुढे माझ्या आयुष्यात नक्की काय घेऊन येणार होता...? याची मला कल्पनाच नव्हती. त्या मुलींना गडीवाल्याने अडवल्याचं मला दिसलं. आजूबाजूला जवळपास मी सोडून इतर कोणीच नव्हतं. मी धावत धावत त्या ठिकाणी गेलो. तो कारवाला त्या मुलींना जबरदस्तीने गाडीत बसायला सांगत होता. मी त्याच्या जवळ जाऊन मुलींना तिथून जायला सांगितलं आणि अचानक....
"अरे अंक्या जरा तरी डोळे उघडं रे", माझ्या आईचे हे शब्द माझ्या कानांवर पडले आणि डोळेही त्याच क्षणी उघडले गेले. काय घडलं? याची किंचितही कल्पना मला यायला वावच नव्हता. आईने विचारलं, "बरं वाटतंय ना रे आता ?" मी म्हणालो, हो आई. मी शुद्धीवर आलो असल्याची वार्ता घेऊन माझी आई डॉक्टरांकडे गेली. मी अगदी डोक्याला फार ताण देऊन काही आठवतंय का? याचा प्रयत्न करत होतो. पण छे! कसलं काय? एकदा शुद्ध हरवलेल्या माणसाला थोडी काय आठवणार....? तीन-चार दिवस अगदी सहज निघून गेले. त्या तीन-चार दिवसांमध्येच गल्लीतल्या काही भन्नाट किंवा अवचट म्हणा हवं तर पण अशाच मुलांमुळे मला माझ्यासोबत घडलेल्या घटनेचा विसर पडला होता. गल्लीतली ही वात्रट पोरं त्याच्या लग्न ठरवलं तर त्याचा शर्टही फाडायला कमी करायची नाहीत. कारणं अंक्या (म्हणजे मीच) यांना काही बोलणारच नाही. मग भले त्यांनी मला कित्येकदा चेष्टेत अपमानितचं का केलेलं असेना. पण जाऊ द्या. कारण मनाने खूप सोज्वळ आहेत बिचारी. माझी चहाची आवड आणि तलप तर मी तुम्हाला मगाशी सांगितलीच. पण आणखी एक खास गोष्ट सांगतो. ती म्हणजे, मी खरोखर चहाच्या भानगडीत दोन तीन मित्रांसाठी मुलगी पाहायला गेल्याचे किस्से आहेत. तसं माझ वय जरी फारसं नव्हतं तरी एकदा नजरचुकीने मुलीने मलाच पसंत करून टाकलं होतं. एकदा तर चक्क गल्लीतल्या एका मुलीने माझ्या घरी तक्रार केली होती. जाऊ द्या. सोडा सर्व.
आज रविवारचा दिवस असल्याने गल्लीत बऱ्यापैकी सामसूमच होती. शेजारच्या घरातला टेलिव्हिजन चालू असल्याने त्याचा आवाज माझ्या बालपणी पर्यंत पोहोचत होता. कारण त्या टेलिव्हिजनच्या मालकाला कमी आवाज ऐकू येत नसे. मी बालकनीत मस्तपैकी खुर्ची टाकून बातम्या ऐकत बसायचो. पण वीज बिलाच्या बाबतीत मात्र त्या शेजारच्या थेरड्याची फार कृपा झाली आमच्यावर. स्वतंत्र टेलिव्हिजन घरी असूनही फारसा चालू करावा लागत नसायचा. दोन घर सोडताच एक छान मुलगी राहायला नवीनच आली होती. आणि महत्त्वाचं म्हणजे मी चक्क तिच्या प्रेमात पडलो होतो. गोरीगोमटी होती दिसायला, वाटलं जणू ब्रिटनवरून आली की कायं? पण नंतर मी हळूहळू माहिती मिळवत गेलो तसंतसं मला समजलं की, तिथे जम्मू-काश्मीर वरून शिक्षण घेण्याकरता आली आहे. आजवर फक्त एकदाच म्हणजे महिनाभरात किराणा दुकानात समोरासमोर भेट झाली होती आमची. दुकानदाराला हिंदी अन तिला मराठी येत नसल्याने मी माझ्या आयुष्यात शिकलेल्या हिंदी चा उपयोग करून तिची मदत तर केलीच. शिवाय मी कोड्यातही पडलो. कोड हे होतं की, ती काश्मिरी मुलगी मला नक्की कोणत्या दृष्टिकोनातून बघत होती ? तिचे डोळे भरपूर प्रश्न निर्माण करणारे होते. बहुधा मी तिच्याशी जगाशी अनभिज्ञ होतो म्हणूनच कदाचित मला तसं भासलं असेल.
सहसा भारतात राहणारा माझ्यासारख्या सर्वसामान्य व्यक्ती कधीच काश्मीरमधल्या परस्थितीला समजून घेऊ शकत नाही; किंवा पुढारपणा मिरवण्यातच मोठेपणा मानणारे लोक कधीच काश्मीरमधल्या मुलांच्या शाळेचं काय? हा विचार करत नाहीत. पण तुझं काय मधेच हे अंक्या? माझं मन स्वतःलाच प्रश्न करू लागलं. त्याच प्रश्न करणही योग्यच होतं म्हणा. मी तरी कुठे इतका शहाण्यासारखा विचार केला होता आजवर? उगाच एक मुलगी कधीतरी त्या ठिकाणाहून येते, आणि त्यानंतर मला सद्य परिस्थितीची जाणीव होते, पुळका येतो, अचानक कुणाचा तरी पण का? दिवसभर त्या काश्मिरी मुलीच्या डोळ्यांच्या विचारात मी काश्मीरप्रश्न डोक्यात ठेवून नुसता इकडून तिकडे फिरत होतो. पण अशा नुसत्या फेऱ्यांनी किंवा आंदोलनाचा विचार वगैरे डोक्यात आणल्याने काहीच फरक पडणार नव्हता. शेवटी सायंकाळ जवळ येऊन ठेपली. बाबा घरात परतले. आई दळण घेऊन आली. बहिणीने प्यायला चहा दिला. आणि चहा चांगला झाला नसल्याचे कारण देत तिच्या बरोबर भांडण उकरून काढले. बहीण-भावाच्या नात्यात जेवढं घट्ट प्रेम असतं तेवढेच जास्त वादही त्याच हक्काच्या नात्यात असतात; अर्थात हे त्रिबाधित सत्य आहे. पण सध्यातरी या अंकाचं रिकामं डोकं त्या अतिसुंदर दिसणाऱ्या काश्मिरी मनमोहिनीतच अडकलं होतं. काय करणार? आखिर हमे भी तो प्यार होना ही था.....
एक क्षण आला अन आमच्यातली मैत्री अगदीच घट्ट नातं होऊन बसली. त्या नात्याला फारसं काही म्हणता येणार नाही पण नाव दिलं नाही तर अर्थही उरणार नाही. पण इथेच माझ्या आयुष्य बदलाची सुरुवात झाली. माझ्या त्या आयुष्यबदलाचा एकमेव साक्षीदार काश्मिरहून आलेली मुलगी होती जिच नाव होतं मानसी. मी तिच्याकडून दैनंदिन वापरातली काही काश्मीरी शब्द हौसेने शिकत असायचो. तीही या अंक्याला तिचा चांगला मित्र समजू लागली होती. आणि म्हणूनच की काय ती एके दिवशी माझ्याजवळ तिचं मन मोकळं करताना रडली. दरवेळी गालावर छानशी खळी घेऊन हसणारी, ती त्या रात्री पहिल्यांदाच डोळ्यात ढसाढसा अश्रू घेऊन एक प्रकारचा आक्रोश करत होती. तिच्या त्या आक्रोशाने माझी दोन मिनिटांसाठी भंबेरी उडवली होती. पण नंतर मी तिला सावरलं. मनभरुन रडून घेतल्यानंतर तिच्या भूतकाळच्या आठवणी ताज्या करून माझ्याजवळ ती त्या शिजवू लागली. तिची कहाणी ऐकल्यानंतर आजवर कधीच हवालदिलंही न झालेला हा अंक्या मनातून जवळपास कोसळलाच. पण ते तेवढ्यापुरतच कारण कुणासाठीतरी आपल्याला नाही त्या परिस्थितीत खंबीर व्हावं लागतच. त्या रात्री हवेत गारवाही कमीच होता. मोठ्या हिमतीने डोळे पूसून तिने तिच्या आजवरच्या काश्मीरमधे घडलेला इतिहास माझ्यासमोर मांडण्यास सुरुवात केली.
वुलार तलाव मी राहत असलेल्या ठिकाणाहून खूप जवळ होता. लहानपणी सहसा त्या तलावावर जाणं बऱ्याचदा व्हायचं तेही शेजारच्या मैत्रिणींसोबत. कधीतरी तीन-चार महिन्यात एकदा आईच्या हाताला हात धरून फुलांच्या शेतातून फार गमतीजमती करत तलावाच्या किनारी जाणं व्हायचं. 'बंदीपोरा', हे जिल्ह्याच ठिकाण ज्याच्या जवळपास एका कोपर्याला आमचं छोटसं घर होतं. घर पूर्णपणे लाकडानेच बनलेल. घरात तेवढा पैसा उपलब्ध नसायचा त्यामुळे टेलिव्हिजनशी फारसा संबंध कधी आलाच नाही. रेडीओवर ठरलेल्या वेळी बातम्या ऐकण्यासाठी आई बाबा आणि मी एकत्र मोठ्या खोलीत येऊन बसायचो. आमचं 'फ्लोरीट्सच' म्हणजे फुलांच दुकान घराला लागूनच होतं. कधी कधी मीदेखील दुकानावर फुलं विकायला थांबायची. माझ्या बाबांच कमी शिक्षण झाल होतं; अशातला भाग नव्हता पण आमच्याकडच्या भागात त्यांना हवं ते करता येणं शक्य नव्हतं.
पुढे ती बोलतचं होती. आणि आईला व मला आम्हा दोघींना सोडून त्यांना इतर भागात जाणं शक्य नव्हतं. शेवटी स्वप्नांना कॉम्प्रमाइज् करत त्यांनी आहे असं जगणं स्वीकारलं. मला अजूनही ती रात्र आठवतीये ज्या रात्री त्यांनी काही कागद, वह्या, पेपरची कात्रणे वगैरे बरच काही जाळून टाकलं होतं. त्यांच्या डोळ्यातला एक एक अश्रूचा थेंब असा वाहत होता जणू, त्या आगीचा भयंकर निखारा होणारंय अन् त्यात तो सगळं अस्तित्व मिटवून टाकणारयं. मी दाराच्या बाजूला अंधारात लपून ते सर्व पाहत होती. माझ्या आईला तिच्या नवऱ्याने केलेल्या त्यागाची फार चिंता वाटायची. त्या रात्री आईने मला कुशीत असं कवटाळंल होतं जणू काहीतरी भयानक आमच्या आयुष्यात घडणारयं. हळूहळू मी मोठी होत गेले. आणि अवतीभोवतीच जग मला खऱ्या अर्थाने समजायला लागलं. मी वृत्तपत्र वाचायला सुरुवात केली होती. मोठी होत गेली तसतसं शाळेचे दिवस कमी कमी होत चालले होते. दर आठवड्याची तीच गत असायची. काहीतरी दहशतवादी हल्ले, दंगली उफाळून यायच्या, दगडं फेकल्या जायची आणि सामील नसलेल्या मंडळींनाही बऱ्याचदा जेलमध्ये डांबल्या जायचं. माझ्या शेजारच्या मैत्रिणींसोबत किंवा शेजारच्या गावांमध्ये बरेच प्रसंग घडायचे. पण मला याची तीव्रता तेव्हा जाणवली जेव्हा माझ्यासोबत काही गोष्टी घडून गेल्या.
मला आजही तो संपूर्ण दिवस आठवला तरी भिती वाटायला लागते. मी अजून जिवंत कशी? हा प्रश्न उभा राहतो. त्यादिवशी मी मैत्रिणींबरोबर शाळेतून दुपारी घरी येत होते आणि अचानक चालता चालता उजव्या बाजूच्या गल्लीतून गोळ्यांचा आवाज येऊ लागला. आवाजाची तीव्रता एवढी भयानक होती की, मन एकदम भांबावून गेलं. एका ठिकाणाहून म्हणजे शेजारच्या गल्लीतून एका इसमाने येऊन आमचा पाठलाग सुरू केला आणि आम्ही सगळ्या मैत्रिणी चहू बाजूंनी विखुरल्या गेलो. गल्ल्या अरूंद होत्या आणि खूप पटकन इतर गल्ल्यांमध्ये घुसताही येत होतं बऱ्यापैकी. पण काही क्षण गेल्यानंतर मी आणि सोबतची एक मैत्रीण जीच नाव जास्मिन होतं अशा आम्ही दोघी हल्लेखोरांच्या तावडीत सापडलो. आम्ही जीव वाचवण्याच्या आकांताने अशा काही धावत होतो की, त्या गडबडीत जास्मिनच्या पायाला अचानक लागलेला मारही आमच्या लक्षात आला नाही. अचानक घाबरलेल्या अवस्थेत त्यांच्या तावडीत असताना माझी नजर तिच्या रक्ताळलेल्या पायावर पडली. माझ्या डोक्यावरील ओढणीने मी तिच्या पायाच्या जखमेला पट्टी केली. पण रक्ताच वाहणं काही केल्या थांबत नव्हतं. पुढच्या दोन क्षणांसाठी आम्ही दोघींनीही आता आपला जीव जाणार; याची एकमेकींना नजरेत बतावणी केली. आणि त्यापाठोपाठ सहन न झाल्याने दोघांनीही एकमेकींना कडकडून घट्ट मिठी मारली. आम्हाला ओलीस धरण्यात आलेलं होतं, जेणेकरून त्या हमलेकरूंवर सैनिकांनी प्रतिहल्ले करू नयेत. आम्हाला ज्याने धरून ठेवलं होतं त्याने एका बाजूने गोळ्यांचा जोर समोरच्या भिंतीआड असलेल्या सैनिकावर लावून धरला होता. तेवढ्यात अचानक आमच्या पाठून एक गोळी येऊन त्या हल्लेकरूच्या डोक्यात शिरली. पाठोपाठ दोन.... तीन.... आणि तो जागीच कोसळला. तो जागीच ठार झाला. जवळच पडला असल्याने मला त्याच्या शर्टमधील एक चिठ्ठी दिसली. मी ती उचलून घेतली आणि माझ्या जवळील शाळेतल्या बॅगेत टाकून दिली.
ज्या सैनिकाने त्या अतिरेक्याला ठार केलं तो नाही म्हंटलं तरी आमच्यापासून बराच दूर अंतरावर होता. मला व जास्मिनला त्याचीही अगोदर भीतीच वाटली होती. पण नंतर त्याने जवळ येऊन स्वतःहून आम्हाला संरक्षण देत शेजारच्या पोलिस चौकीत आणून सोडलं. आणि तो निघून गेला आमच्या सात मैत्रिणींपैकी आणखी इतर दोघीही इथे सुखरूप पोहोचलेल्या पाहून बरं वाटलं. आता गोळीबाराची घटना घडून जवळपास दोन तासांच्या वर होत आले होते पण अजूनही इतर तिघी इथे आल्याच नव्हत्या त्यामुळे फार चिंता वाटू लागली होती. त्यातल्या एका मुलीला बिचारीला आधिच वडिलांचा सहारा देखील राहिलेला नव्हता. पोलिस चौकीत संरक्षणासाठी फक्त दहा ते पंधरा पोलिस उरले होते. बाकीच्या इतर सर्वांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पाठवलेलं होतं. जास्मिन इतक्यात अचानक बेशुद्ध पडली. एव्हानापर्यंत तिच भरपूर रक्त वाया गेलं होतं. इथे आता दोन गल्ल्या ओलांडल्यानंतर एक दवाखाना जवळच होता. पोलिसांनी जास्मिनला पहिल्या पहिल्या डॉक्टरांना फोन लावला व त्यांना घ्यायला ते रवाना झाले. दहा मिनिटांमध्ये पोलीसकाका डॉक्टरांना सुखरूप घेऊन आले. सुदैवाने नशीब म्हणून तरी बरं की दवाखान्याच्या परिसरात अतिरेक्यांनी हल्ला चढवला नव्हता.
शहरात मी पहात आले तेव्हापासून तरी हे पहिल्यांदाच घडत होतं. आजवर इतर ठिकाणी आमच्याच भागात या गोष्टी भरपूर घडल्या. पण आज प्रत्यक्ष जेव्हा आमच शहर निशाना ठरल तेव्हा माझ्या मनातल्या तीव्र वेदनांनी अक्षरशः उफाळा घेतला. माझं शहर आज प्रथमच एवढं तणावाखाली आलं होतं. जास्मिन ठिक असल्याचं समजल्यावर मग जरा जीवात जीव आला. पण डॉक्टरांनी सांगितलं आणखी काही वेळ ती शुद्धीवर येऊ शकणार नाही. आणि तिच्या इतर उपचारासाठी तिला दवाखाण्यात घेऊन जाव लागेल. मग घेऊन आम्ही म्हणजे, मी जास्मिन डॉक्टर दोन व पोलीस असे सर्वजण दवाखान्याकडे रवाना झालो. थोड्याच वेळात एका वार्डमध्ये तिला रक्त चढविण्यास सुरुवात केल्या गेली. मी दाराबाहेर सुन्न एका जागी स्थिर बसून राहिले होते. पुस्तकात कधी एकेकाळी वाचलेल्या गोष्टी कानांत गुणगुण करून फेर धरू लागल्या होत्या. मुक्ती, क्रांती, लढा, चळवळ, राष्ट्रवाद, जातिभेदावरून दंगली हे असे शब्द कानात जणू इकडून तिकडे फिरू लागले होते. नक्की रक्तपात का? कशासाठी? कुणाला काय साध्य करायचयं? सारे प्रश्नच प्रश्न पण उत्तर काही जवळ नव्हतं. मी केवळ एक केविलवाणा चेहरा घेऊन जास्मिन शुद्धीवर येण्याची वाट पाहत होते. ती शुद्धीवर आल्याशिवाय मी तिला एकटीला सोडून जाऊ शकत नव्हते. पंधरा मिनिटे भयाण शांततेत गेल्यानंतर दगडफेक सुरू झाली. आम्ही तिसऱ्या मजल्यावर होतो. गोळीबाराचा आवाजही कानांवर पडू लागला. पुन्हा त्याच संकटात सापडल्या गेलो. मी वार्ड मध्ये जाऊन जास्मिनच्या बेडखाली लपले. त्याच पळण्याच्या गडबडीत मी जास्मिनला तिथेच बेडवर पूर्णपणे झाकून टाकली; जेणेकरून तिच्यावर कुणाची नजर पडु नये. आमच्या संरक्षणासाठी आलेल्या दोन्ही पोलिसांनी प्रतिकात्मक हल्ला चढवला. एक पोलीस माझ्या आमच्याच वार्डच्या खिडकीतून आडोसा घेऊन बाहेर हल्ला चढवत होता. आणि दुसरा मुख्य दरवाजावर लढा देत होता. दहा मिनिटांनी पुन्हा सगळी शांतता पसरली. दगडाने बऱ्याच काचा फुटल्याच माझ्या लक्षात आलं. पोलीसकाका तसे फार बारकाईने शांतता अचानक का पसरली? याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करत होते. इतक्यातच एक गोळी वेगाने येऊन त्यांच्या डाव्या खांद्यावर लागली. रक्त यायला सुरुवात झाली आणि गोळीबार पुन्हा सुरू झाला. मी माझ्या बागेतली जास्मिनची ओढणी शोधू लागले पण बहुधा ती एवढ्या सगळ्या गोंधळात कुठेतरी हरवली होती. शेवटी एक पट्टी बाजूला पडलेली मी घेतली आणि ती जाऊन पोलीस काकांच्या खांद्याला घट्ट बांधून आवळली. एवढं रक्त जात असूनही ते मला बेडखालून न निघण्याचा सल्ला देत राहिले. पण मला त्यांचं रक्त पहावत नव्हतं. म्हणून मी डॉक्टरांना शोधायला वार्डच्या बाहेर पडणारच होते आणि दुर्दैवाने दरवाजा उघडताच डाव्या बाजूला डॉक्टरांचा मृतदेह पडलेला मला दिसला. दवाखान्याच्या मुख्य दरवाजावर असलेले पोलीसकाकाही आता दिसेनासे झाले होते. आता मात्र मृत्यू अटळ आहे; याची ग्वाही मी स्वतःला दिली. मी पूर्णतः बिथरून गेले होते. थोड्या वेळात गोळ्यांचा आवाज बंद झाला. बाहेरचे अतिरेकी बहुधा निघून गेले होते. पोलिस काका बेशुद्ध अवस्थेत रक्तरंजित थारोळ्यात पडले होते. मी संपूर्ण दवाखाना धुंडाळून आले तर आम्हा तिघांव्यतिरिक्त इतर कोणीही जिवंत उरलं नव्हतं. सगळीकडे रक्ताच पाणी वाहत होतं. माझ्यासाठी सगळ्या गोष्टीची जणू आता हद्दच संपली होती. मी जास्मिनच्या घरी फोन करून ती इथे सध्या सुखरूप असल्याचं कळवलं.
डोळ्यातून निघणारे अश्रुंचे ओघळ तसेच घेऊन भिंतींचा आडोसा घेत घेत मी एकदाच घर गाठलं. दार उघडलं, आई.....! आणि मी जोरात किंचाळले कारण घरात आई जमिनीवर रक्ताने बरबटून पडली होती तिच्या पाठी बाबांचाही मृतदेह दिसला. मी तसेच दरवाज्यात जोरात खाली पडले, मला चक्कर आली आणि मी बेशुद्ध पडले. माझं माझ्या माणसांबरोबरच अस्तित्व नष्ट झालं. मी त्या एका क्षणात पोरकी झाले. जास्मिनने तिचा पाय कायमचा गमवला कारण तिची जखम खूपच भयानक होती. माझ्या हातात आई-वडिलांच्या अंत्यसंस्कारांच्या वेळी केवळ एक कागद उरला होता. जो की मला त्या अतिरेक्याजवळून मिळाला होता. आई-बाबांची चिता जवळ होती आणि त्या कागदातलं दुःख मी वाचत होते. त्यांच्या अतिरेकी होण्याला त्याला पर्याय नव्हता; असं त्याने त्यात नमूद केलं होतं. पण माझ्या भोवताली दररोज वावरणाऱ्या व्यक्तींच काय? त्यांचा या सर्वात दोष कुठे होता? त्यांनी तर पाकिस्तान पाहिलही नसेल उभ्या आयुष्यात. माझ्या आयुष्याचं मग येथून पुढे काय ?हा प्रश्न स्वतःला विचारण्याची ती वेळ योग्य होती का? किंवा माझी मानसिकता देखील ती नव्हती. पण सर्वच बाजूंनी नाईलाज झाला होता. आता पूर्ण:त मावळू पहात असलेल्या माझ्या आयुष्यातल्या सूर्याला मला एक दिवस तारून वापस आणावं लागणारच होतं. अर्थात पर्याय नव्हता ना. पण असंख्यातल्या एका प्रश्नाने जरी योग्य दिशा दोन क्षणांसाठी दाखवण्याची तयारी ठेवली असती; तर.... तर सर्व व्याकुळतेतलं जगणं पुन्हा पूर्व-पदावर आलं असतं याची ग्वाही देता येणार नाही. एकमेकांना अकारण विरोध करून साध्य काहीच होतं नाही; हे समजणार कधी त्या वणव्याला. उगीचच पेटत चाललायं कुणीही अडवणार नाही म्हणून. अरे पण त्यात राखरांगोळी होते रे! त्या राखेलाच पुन्हा शेवटी पुरवा म्हणून डोळ्यातली धगधगती आग बनवून ठेवावं लागतं. दहा ते बारा दिवस निघून गेले. मी घरात दिवसभर एकटीच पडून राहायचे. फार काही करायची इच्छा मनात उरली नव्हती. सतत प्रश्नांनी डोकं भांबावून सोडलेलं असायचं. मी मात्र केवळ त्या प्रश्नांना डोळ्यांसमोर आणून त्यांचा ठाव घेण्याचा प्रयत्न करत राहायची.
आणि बोलता बोलता ती तशीच माझ्या छातीवर डोकं ठेवून झोपी गेली. भरपूर रात्र झाली होती. पण माझा डोळा अजूनही लागला नव्हता. मी इतके दिवस जिला अगदी सहजरीत्या विचारात घ्यायचो ती आतून इतकी दुख्खाने पोखरलेली असेल; याची मला अजिबात कल्पनाच नव्हती. मी अलगद तिच्या गालांवर हात ठेवला. खूप नाजूकसा स्पर्श भासत होता मला तो! ती एव्हानापर्यंत माझ्याजवळ सर्वकाही बोलून मोकळी झाली होती. पण माझ्याकडे काहीच नव्हतं. मी आहे तसाच होतो अगदी. नेहमी हसत आणि हसवत राहणारा, चुकूनही कधी फारसा रक्तपात न पाहिलेला; पण तरीही तिच्या वेदनांची जाणीव झाली होती मला. नाहीतर हा सर्व चित्तथरारक प्रसंग ऐकताना मी नकळतपणे दिलासा देण्यासाठी स्वतःहून तिचा हात हाती घेतला नसता. पण त्या रात्रीने मला मात्र भरपूर कोड्यात टाकलं. जाऊ द्या. मनमोकळी झाली "ती" ते महत्वाचं.
आज कुठे जरा विसावा घेतला तिच्यावर दाटून आलेल्या संकटाच्या ढगांनी.... पुर्णत: रित झाल्याशिवाय माघार तरी कशी घेऊ शकणार होती ती.... पण दुख: असं दिलं जणू पुन्हा ऊजेडात बागडायची भिती वाटेल तिला.... आणि असंख्य प्रश्न तिच्यासाठी सोडून दिले असे जणू की, ओझं वाहणं हा तिचा हक्क आहे. तरीही एक मन तिला सावरायला समर्थ आहे. स्वत:वर आलेल्या विस्कटलेल्या काळरातींना सावरलं ज्याने आजवर तोच करेल इथून पुढे तिच्यावरील अडचणींवर मात....
सकाळ कधी झाली हेदेखील लक्षात आलं नाही. ती अजूनही माझ्या कुशीत तशीच अगदी निपचित पडून होती. तिला तसंच डोळ्यात साठवून ठेवावसं वाटत होतं. तिची झोपमोडही करायची माझी इच्छा होत नव्हती. पण नाईलाजानेच का असेना मला तिला उठवावं लागलं. नाही तर चुकून जरी आम्हा दोघांना तशा अवस्थेत तिथे कुणी जरी पाहिलं असतं तरी माझी काही खैर नव्हती. ती उठून तिच्या खोलीत खाली निघून गेली. माझं डोकं जरा जड झालं होतं. मीही माझ्या घराकडे संथ गतीने पावले टाकत निघालो. आयुष्य किती भयानक आणि कठीण असू शकतं याची झळ मला पहिल्यांदाच बसली होती. पण माणसाला विनाधर्म बाळगता जगणं कधीच शक्य होणार नाही?? या धर्म,भेद,द्वेश आणि राष्ट्रवाद अशा संकल्पनांचा वापर केवळ आजवर तरी माणसांचा बळी घेण्यासाठीच केलेला मला पाहायला मिळाला आहे. मी तेवढा अभ्यास जरी करत नसलो तरी एक वाक्य "अल्बर्ट आईन्स्टाईन" या शास्त्रज्ञाच मला हमखास आठवतं ते म्हणजे, "राष्ट्रवाद हा बालपणाचा आजार आहे". पण ते वाक्य तो ज्या अर्थाने बोलला तो अर्थ आज मात्र कुणीच लावायला तयार नाही. जेव्हा लहान मुलांना जातिभेद आणि राष्ट्रवादाच्या संकल्पनांमुळे बेघर व्हावं लागतं तेव्हा त्यांचे चिमुकले डोळे ज्यात कित्येक गोष्टींची भूक सामावलेली असते; ते कोणालाच दिसत नसावेत का ? मोठ्या लोकांनी कुठवर आम्हाला अशा संकल्पनांमध्ये अडकवून स्वतःची पोळी भाजून घ्यायची? जिथे आमच्या रक्ताचा दंगली मध्ये एक एक एक थेंब नष्ट होत असतो तिथे त्यांच्या घशाखाली नरड्यात दारूचा एक एक पेग आरामात चढत असतो. त्यांची पोरं बाळ गाडीत बसून प्रत्येक वीकेंडला लोणावळा, खंडाळा आणि बीचवर फिरायला. आणि आमची पोरं? आमच्या सर्वसामान्यांची पोरं होरपळून मरायला. मागे टीव्हीवर एकदा सिरियातल्या लहान मुलांचे गेलेले बळी पाहत होतो तेव्हा ते पाहत असताना फक्त दोन क्षणांसाठी भावुक झालो होतो; तेवढंच. पण त्या मुलीच्या तोंडून जेव्हा घडणाऱ्या घडामोडींची तीव्रता ऐकली तेव्हा कुठे मी भानावर आलो. पण माझ्या एकट्याच्या किंवा मानसीच्या; केवळ आमच्या दोघांच्या नजरेतून माणसाला माणूस म्हणून इतरही लोक पाहू शकतील का?
घरात पाऊल ठेवलं आणि पुन्हा जोराने आईचे अंक्या... मूर्खा हे मूळ हे शब्द कानांवर पडले. तिने तिची विचारपूस चालू केली आणि तिला उत्तरे देता देता माझे नाकी नऊ आले. त्यात भरून पेटवायला बहीणही होतीच मग झालच. पण अंक्या हे शब्द असे काही कानांवर पडतात की वाटतं जणू सगळ्या जगात आपणच एक उरलोय. मग दुःखणार डोकही थांबल एव्हानापर्यंत. पण चहा पिल्याशिवाय आपलं काही दिवसभराच कामकाज चालणारच नव्हतं. त्यामुळे आईने चहा ठेवला आणि मी टेलिव्हिजनवर नजर फिरवण्याचा विचार केला. पण धक्क्यांवर धक्के एकापाठोपाठ बसावेत तशा बातम्या माझ्यावर धडकू लागल्या. अगदीच छोट्या अक्षरात खाली लिहूण त्या आलेल्या होत्या. आणि पुन्हा दहशतवादी काश्मीरमध्ये घुसले होते. चार जवान शहीद झाल्याची बातमी पुन्हा पुन्हा हायलाईट होऊन येत होती. मी नाईलाजाने टीव्ही बंद केला. काय नेमकं करावं? तेच समजेनासं झालयं मला. ज्या वास्तवाला टाळण्याचा प्रयत्न करतोय तेच वास्तव दरवेळी भयानक रुप घेवून समोर उभं राहतयं. आईने चहा आणून दिला. बहीण मला पुन्हा काहीतरी टोमणा मारून बाहेर निघून गेली. पण माझं लक्ष अजिबात तिच्याकडे किंवा समोरच्या चहाकडे जात नव्हतं. मनाने हळव्या असलेल्या माणसाने खरच संगत करू नये कुणाशी, नंतर फार भीती वाटायला लागते. काहीच कमजोरी नसताना धडधाकट शरीरालाही अशक्तपणा येतो म्हणजे काय? मला वाटायला लागलं होतं की, मी या मुद्द्यावर काहीतरी तोडगा काढायला हवा. पण याच एका निर्णयाखातर माझ्या मनात इतर भरपूर प्रश्नही उभे राहू लागले होते. सध्या काय योग्य हे विचार करण्याची वेळ नव्हती. मी चहाचा कप हातात घेतला तेव्हा माझा डावा हात आपोआप थरथरू लागला होता. आई बाजूला अजूनही तशीच उभी होती. मी एक नजर त्या थरथरणाऱ्या हातावर फिरवली आणि दुसऱ्या क्षणीच हातातला तो कप बाजूला ठेवून उभ्या असलेल्या आईला अचानक घट्ट मिठी मारली. आईला म्हटलं फक्त दोन मिनिटे मला असं तुझ्या मिठीत राहू दे.
कारण माझा मनात उसळलेल्या गोंधळाच्या प्रचंड लहरींना जर कोणतं वादळ शमवू शकणार होतं तर ती केवळ आईची ममता होती. बऱ्याचदा खऱ्या आयुष्यात बरेच जण ही गोष्ट गोष्ट करत नाहीत. त्यांना वाटतं आपण आता मोठे झालोय पण कधी कधी असे प्रसंग आल्यावर आईच्या कुशीत सरळ स्वतःला हरवून द्यावं, मी म्हणतो. थोड्या वेळाने मी तिला सोडलं. आईलाही समजलं होतं की, मी नक्की कोणत्या ना कोणत्या तणावात आहे. पण तिला ठाऊक होतं तिचा मुलगा नक्की मार्ग काढेन. आई निघून गेली आणि ती तिच्या कामात पुन्हा मग्न झाली. बाबादेखील घरी नव्हते. मी माझ्यासोबत घडलेला तो प्रसंग तर पुरताच विसरलो होतो. आणि सतत माझ्या डोळ्यात सध्यातरी फक्त मानसीचा घाबरा झालेला चेहरा दिसत होता. एवढ्या नाजूक सुंदर दिसणाऱ्या मुलीवर किती बाका प्रसंग बेतला होता. पण सगळ्यात मोठ दुर्दैव हे की, दिवसेंदिवस बालकांचे, त्यांच्या आई-वडिलांचे, पोलिसांचे व जवानांचे निष्पाप बळी जातच आहेत. मरणाला जणू इथे परिसीमाच उरली नसावी की काय? एकीकडे माझा देश असा काही विद्रुपरीत्या पोखरला जात आहे आणि दुसरीकडे अंधश्रद्धा, बलत्कार, ड्रग्ज, हुंडा या अशा अनेक समस्यांनी त्रासलेला आहे. मला खूप मोठा प्रश्न पडलाय आता. नेमकं कोणतं दुःख मी तराजूत जास्त म्हणून मापू? कोणत्या गोष्टीवर लक्ष देऊन मी नेमकं बदलवणार काय? कोणाला? आणि कशासाठी?
जन्मालाही न आलेलं अभ्रक एकीकडे बंदुकीच्या गोळीने मरत तर दुसरीकडे स्त्री-अभ्रक आहे म्हणून मारलं जातं. कधी कुठून कसा हल्ला होईल आणि कधी एकदा स्थलांतर करावं लागेल याची ग्वाही न बाळगता जगणाऱ्या समाजातील माणसाची किमान व्यथा तो मांडणार कुणापुढे? त्याचं जगणच इतकं लाचार झालयं जणू, तो बिचारा करणार तरी मग काय? दिवसेंदिवस राष्ट्रप्रेम फार वाढत चाललंय म्हणूनच की काय मंदिराच्या मंदिर उभी राहतात. दररोज येथे पैशांना अजिबात कमी नाहीये. पैसा दानपेटीत पडून राहतो, मूर्त्या दिसतात पण लहान मुलांचे शाळेपासून वंचित राहणारे डोळे पहायची हौस मात्र कुणालाच नकोशी झाली आहे. पण...... पण बिन किंवा चर्चा करून तोडगा काढू म्हणणारे अजून किती बळी जायची वाट पाहत राहणार?
मी फार दूरचे विचार करत करत कधी एकदाचा मानसीच्या घरी पोहोचलो हे माझं मलाच लक्षात आलं नाही. मी दार ठोठावलं, तिने दार उघडताच मी तिच्या चेहर्याकडे पाहतच राहिलो. नुकतीच बहुधा फ्रेश वगैरे झाली होती ती. तिने आत बोलावलं आणि मी आत जाऊन बसलो. मी तिला माझ्या मनातला सगळा संभ्रम थोडक्यात सांगून टाकला. आणि चेष्टेचेष्टेत तिला तिच्या काश्मीरमध्ये एक हक्काचं घर घेऊन देण्याचं वचण दिल. मी आतातर अधिकच प्रेम करू लागलो होतो तिच्यावर. पण मला एवढ्यात तिला ते व्यक्त करायचं नव्हतं. आमच्यातल्या मैत्रीचे कमी वेळात धागेदोरे असे काही जुळले होते की जणू, ते जन्मोजन्मीचे ऋणानुबंध असावेत. पण मी अजूनही या विचारात होतो की, सुदैवाने माझी प्रेयसी अगदी मृत्यूच्या घट्ट मिठीतुन सुखरूप परतली आहे. त्यामुळे तिला मी कधीही गमावू नये.