अविनाश . ब. हळबे

"बाबा, चला ना. आपण संभाजी पार्कात जाऊया." - पिंकी.

खरंतर मी ऑफिसातून दमून आलो होतो. पण दहा वर्षाच्या माझ्या लेकीचा हिरमोड करणं माझ्या जीवावर आलं होतं. आम्ही निघालो. पार्कात गेल्यावर तिचं  खेळणं, भेळ खाणं, वगैरे साग्रसंगीत झालं. सहज लक्ष गेलं तर बालगंधर्व रंगमंदिराच्या कलादालनात, प्रदर्शन लागलेलं दिसलं.

"चला, जाता जाता हे प्रदर्शन बघून जाऊयात." तिकडे वळत मी म्हणालो.

प्रदर्शन आर्ट अँड क्राफ्टचे होते. बघत बघत आम्ही शेवटाकडे आलो. तिथे काही रांगोळ्यांची पण डिझाईन्स होती.

"छान आहेत नाही का या रांगोळ्या?" पिंकी त्यांच्याकडे निरखून बघत म्हणाली.  

"हो ना" आम्ही सर्व एकदम म्हणालो.

"मला काढता येतील अश्या रांगोळ्या?" – पिंकी.

"हो... न जमायला काय झालं? आधी शिकून घे. थोडी प्रॅक्टिस कर. मग नक्की जमतील." – मी.  

"मला घालाल बाबा तुम्ही त्या क्लासला?" – पिंकी.

"अवश्य !"- मी.

यथावकाश पिंकी रांगोळीच्या क्लासला जाऊ लागली. काही दिवसांनी बाईसाहेबांचा उत्साह ओसरेल असं वाटलं होतं. पण तसं झालं नाही. हळूहळू ती देवघरात आणि दारात न चुकता स्वस्तिक चिन्ह, गोपद्मे, देवांची नमने, इत्यादी काढू लागली. मग सोसायटीच्या गणपती पुढे रांगोळी काढणे आलेच. मधून मधून घरीदारी कौतुकही होई.

एक दिवस आमच्या टाटा मोटर्स म्हणजे त्यावेळेची टेल्को कंपनीत मी एक नोटीस पाहिली. कंपनीतर्फे बालगंधर्व कलादालनात कलाकृतींचे प्रदर्शन भरवण्यात येणार होते. यात कर्मचारी आणि कुटुंबीयांनाही भाग घेता येणार होता. बक्षिसे पण अर्थात होती. मी लगोलग घरी बातमी सांगताच सर्वानुमते पिंकीने त्यात भाग घ्यायचे असे ठरले. खरेतर रांगोळी शिकायला लागून तिला काही महिनेच झाले होते, पण बक्षीस मिळाले नाही तरी स्पर्धेचा अनुभव मात्र मिळणार होता. प्रदर्शन गुरुवारी सुरू होणार होते, त्यामुळे बुधवारी संध्याकाळी आम्हाला हॉल मिळणार होता. गुरुवारी सकाळी नऊ वाजता परीक्षण झाल्यावर लगेच अकरा वाजता बक्षीस समारंभ होणार होता.  

बुधवारी कंपनीतून आल्यावर आम्ही साडेसहाला सर्व सामुग्रीनिशी तिथे पोहोचलो. पण काही अपरिहार्य कारणामुळे, आम्हाला संध्याकाळी ऐवजी रात्री नऊ वाजता हॉल मिळणार असं कळलं. पिंकी काहीशी नाराज झाली. तिथं बसून काय करायचं म्हणून आम्ही घरी आलो. जेवण करून मी पिंकीला घेऊन साडेनऊच्या सुमाराला परत तिथे गेलो. ही घरीच थांबली.

दहा वाजता सगळ्यांची सुरुवात झाली. कलाकार आपल्या कलाकृती मांडू लागले. कुणी चित्र रंगवू लागले, तर कुणी थर्माकोलच्या कलाकृतींची जोडणी वगैरे सुरू करू लागले. पिंकीने रांगोळीसाठी गालिच्याचे डिझाईन ठरवले असल्याने, कार्यकर्त्यांनी आम्हाला एका कोपऱ्यात तीन बाय सहा ची जागा आखून दिली. पिंकीने मरगळ झटकून आपले काम सुरु केले. अकरा वाजले बारा वाजले... मला झोप येऊ लागली.

"पिंकी आता थांबूया. उरलेली रांगोळी सकाळी लवकर येऊन काढू" मी जांभई देत म्हणालो.

"तसं नको बाबा. मी आजच माझी रांगोळी पुरी करते. तुम्ही हवं तर चक्कर मारून या." – पिंकी.

पडत्या फळाची आज्ञा घेऊन मी सटकलो आणि खाली कॅफेटेरियात जाऊन चहा घेऊन, अर्ध्या तासाने वरती आलो तर पिंकीचा चेहरा उतरलेला!

"काय झालं?" मी विचारलं.

"बाबा मला अंदाज आला नाही. दोन रंग संपलेत. घरी पण शिल्लक नाहीत. आता माझी रांगोळी अर्धवटच राहणार.." पिंकी रडवेल्या चेहऱ्याने म्हणाली.

मी क्षणभर सुन्न झालो. कारण रात्री यावेळी कुठल्या दुकान उघडे असणार? एकाएकी मला जाणवले ... माझी लेक आयुष्यातल्या पहिल्या स्पर्धेला सामोरे जात होती. आता बाप म्हणून तिला साथ देणे माझे कर्तव्य होते. एकप्रकारे ही माझी सत्वपरीक्षाच होती म्हणा.

"पिंकी काही काळजी करू नकोस. मी आणतो कुठून तरी ते रंग. तू बाकीचं  डिझाईन पूर्ण कर. तोपर्यंत मी आलोच!" असे म्हणून मी निघालो सुद्धा.

स्कूटरवरून मी तातडीने मंडई गाठली. त्या भागात रंगाची दुकाने होती पण ती सगळी बंद झालेली होती. बरीच शोधाशोध केल्यावर, एका गल्लीत एक दुकान अर्धवट उघडं दिसलं. बहुतेक मालक जेवण उरकून दुकानात झोपायला आला असल्याने ते उघडं असेल. मला आनंदाने उडीच मारावी वाटली ! प्रथम तो दुकान बंद आहे असेच म्हणाला. पण मी अर्जव करताच त्याने मला दोन्ही रंग दिले. रंग आणून देतात पिंकीचा चेहरा खुलला. तिने तातडीने काम सुरू केलं. रांगोळीच्या गालीच्याचे डिझाईन पूर्ण झालं तेव्हा पहाटेचे साडेतीन वाजले होते!!

जागरणामुळे आम्ही पेंगत पेंगत सकाळी सव्वाअकरा वाजता कलादालनात पोहोचलो. बक्षीस समारंभ सुरू झाला होता. निरनिराळ्या विभागातील बक्षिसे जाहीर होत होती, आणि टाळ्यांच्या गजरात स्पर्धक ती स्वीकारत होते. शेवटी रांगोळी विभाग सुरू झाला. पिंकी नवोदित असल्याने, बक्षिसाची फारशी शक्यता नव्हती. उत्तेजनार्थ ... तिसरे ... आणि दुसरे बक्षीस जाहीर होताच, मी तर आशाच  सोडली. पण अचानक पहिल्या बक्षिसासाठी पिंकीचे नाव पुकारले गेले आणि मी खाडकन जागा झालो ! पिंकी स्टेजकडे जाऊ लागताच, टाळ्यांचा कडकडाट आणखीन वाढला. कारण स्पर्धकतील ती सर्वात लहान वयाची होती. येतानाही कौतुकाचा वर्षाव झाला. माझ्या आणि हिच्या डोळ्यातून पाणी यायचं बाकी राहिलं.

"मग काय पिंकू बाई ... पहिल्याच स्पर्धेत पहिले बक्षीस!! मज्जा आहे बुवा एका माणसाची." मी घरी येताच पिंकीला जवळ घेत म्हणालो.

"बाबा खरं सांगू?" पिंकी म्हणाली.

"सांग ना." मी म्हणालो.

"बाबा तुम्ही मला रांगोळीच्या क्लासला घातल नसतं आणि नंतर रंग आणून दिले नसते, तर हे घडलं नसतं. पहिल्या बक्षिसाचा मला आनंद तर झालाच, पण त्याहीपेक्षा जास्त आनंद या गोष्टीसाठी झाला, की आजवर मी सगळ्यांच्यासाठी टाळ्या वाजवत होते .... आज माझ्यासाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या!" पिंकी मला नमस्कार करत म्हणाली.

पिंकी तिच्या स्पर्धेत आणि मी माझ्या सत्वपरीक्षेत एकदमच पास झालो!!!

*****

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel