१४ एप्रिल रविवार, परतीचा दिवस. परतीच्या प्रवासाबद्दल काय सांगायचे? एका विमानात बसलो-उतरलो, दुसऱ्या विमानात बसलो-उतरलो, तिसऱ्या विमानात बसलो-उतरलो, बसमध्ये बसलो आणि साताऱ्यात पोहोचलो. या चार ओळीत हा प्रवास संपू शकतो. पण तसे नाही या प्रवासातही अनेक गमती जमती घडत असतात. अनेकदा काही लोक फिरायला बाहेर पडतात आणि कधी एकदा डेस्टिनेशन वर पोहोचतो असे बिहेव्ह करतात. माझे तसे नाही. ट्रीपसाठी म्हणून घराबाहेर टाकलेले पहिले पाऊल ते परत घरात येईपर्यंतचा प्रत्येक क्षण हा ट्रीपचाच भाग असतो आणि तो तितकाच एंजॉयेबल असू शकतो. आणि मी तो प्रत्येक क्षण एन्जॉय करतो. खरेतर हा डेस्टिनेशनला पोहोचण्याचा प्रवास आनंदात घालवता यायला पाहिजे, यातील गमती जमतीही अनुभवता आल्या पाहिजेत.

आमचा परतीचा प्रवासही असाच गमती जमतींनी भरलेला होता. शेवटच्या दिवशी तसा काही नियोजित कार्यक्रम नव्हता. शहराचा फेरफटका मारत विमानतळ गाठणे हाच कार्यक्रम होता. आणि विमानाची वेळ चारची होती, त्यासाठी दोनपर्यंत पोहोचले तर चालण्यासारखे होते. म्हणून मग सगळेच जरा निवांत रेंगाळत होते. काहींनी हॉटेलच्या आजूबाजूच्या परिसरात भटकंती केली. कुणी लवकर बॅगेज आवरून, शेवटच्या क्षणाच्या खरेदीला पसंती दिली. हॉटेलचे चेक-आऊट तसे लवकर होते. रूम मधील मिनीबार मधील काही घ्यायचे नसते आणि शक्यतो रूम मध्ये काही ऑर्डर द्यायची नसते, ते फार महाग पडते हे अनुभवाने लोकांना माहित झालेय. त्यामुळे काउंटरला काही देवघेव शक्यतो नसतेच. एअरपोर्टला पोहोचायला तास दीड तास लागणार होता आणि रविवार असल्याने कदाचित ट्राफिक जॅम मध्ये अडकू या भीतीपोटी साडेअकरालाच बाहेर पडायचे ठरले होते. पण काहीजण खरेदीला गेल्याने उशीर झालाच आणि साडेबाराला प्रस्थान झाले. जाता जाता जेवढे म्हणून डोळ्यात साठवून घेता येईल ते घेत आम्ही जात होतो. अर्ध्या रस्त्यात आल्यावर अमोलला आठवले कि त्याने नुकतीच खरेदी करून आणलेल्या सामानाची पिशवी हॉटेलवरच राहिली. त्याचे म्हणणे होते कि मी टॅक्सिने परत हॉटेलवर जातो आणि बॅग घेऊन एअरपोर्टला येतो. पण नाही वेळेत पोहोचला तर सगळ्यांचाच खोळंबा व्हायचा म्हुणुन मग सगळ्यांनीच त्याला विरोध केला. हॉटेलवरून कुणी माणूस ती बॅग घेऊन येईल का असेही प्रयत्न केले पण ते शक्य झाले नाही. अमोलची ती बॅग कुणाला तरी (अनिच्छेने) दिलेली सप्रेम भेट मिळाली असेल.

जाता जाताही अनेक चांगल्या इमारती दिसत होत्या. रशियात (किंवा युरोप मध्ये) पहिल्यांदा जाणवते ती तिथली स्वच्छता. रस्त्यात कुठं कचरा नाही, कचरा कुंडीही असली तरी बंदिस्त, वाहते ड्रेनेज नाही, घाणेरडे वास नाही, मोकाट जनावरे नाहीत, भटकी किनारी, डुकरं नाहीत, पर्यायाने डासही नाहीत. इतकेच काय तर कुठे रस्ता खोदून ठेवलाय, काम चालू आहे असेही नाही. एकदा रस्त्याचे काम केले कि ते अनेक वर्षे टिकणारे असेल याची त्यांना खात्री असेल. (पण हे काही बरोबर नाही. रस्ते सारखे उखडल्याशिवाय काँट्रॅक्टरला काम कसे मिळणार? आणि पुढाऱ्यांना मलिदा तरी कसा मिळणार? हा अन्यायच नाही का....)

डोळ्यात भरणारी स्वच्छता, रस्त्यावर फक्त चारचाकी वाहने, ट्रॅफिकला शिस्त, पायी चालणाऱ्या माणसाला मिळणारा प्रेफरन्स आणि रिस्पेक्ट, आजूबाजूच्या भव्य इमारती, (एकही पडकी बिल्डिंग दिसली नाही) आणि सगळीकडे भरभरून असणारी सुबत्ता. आमच्यातील एकजण गमतीने म्हणालाही `च्यायला आमच्या आजोबा, पणजोबांना का नाही वाटले इथे येऊन राहावे म्हणून. मग आम्हीही इथेच जन्माला आलो असतो'. पण हे फक्त बोलणे. आम्हाला सर्वानांच आपला भारत देश प्यारा. पण इथे एक गोष्ट सांगावीशी वाटते, कि आठ-दहा दिवस जरी फॉरेनला फिरून आलो तरीही माणसाला त्याची भुरळ पडते आणि आपली मुले शिकायला म्हणून वर्ष दोन वर्षांकरिता परदेशी जातात, आणि तिथली लाईफ स्टाईल बघून तिकडचीच होऊन जातात. आपण त्यांना दोष देत बीसतो कि मुलांना आईवडिलांबद्दल, देशाबद्दल प्रेमच नाही. पण वस्तुस्थिती ही वेगळी असते. असो.

वेळेत एअरपोर्टला पोहोचलो. आतापर्यंत गाईड मिखोलाय आमच्यासोबत होता. आम्हाला चेकिन काउंटरवर पोहोचवून त्याने आमचा आनंदाने निरोप घेतला. एअरपोर्टला फार गर्दी नव्हती. चेकिन करून सगळ्यांच्या मोठ्या बॅगा आत गेल्या. लगेज कमी झाल्याने मंडळीही जरा निवांत झाली. इमिग्रेशन लवकरच उरकले. जेवणाच्या टाइमिंगच्या घोळामुळे अल्ताफभाईंनी सँडविच पॅक करून घेतले होते. काहींनी खाऊन घेतले. बोर्डिंग पास घेऊन आम्ही आमच्या ठरलेल्या गेटजवळ येऊन थांबलो. विमानाला चांगला तास -दीड वेळ होता. मी आणि सुहास ने लगेच बिझनेस लाउंज गाठला. क्रेडिट कार्डवरच्या प्रायोरिटी पास मुळे आम्हाला तिथे एन्ट्री मिळाली. नंतर अमोलही आला. आम्ही व्यवस्थित खातपीत त्या पासचा योग्य उपभोग घेतला. भारतातल्या विमानतळावर तर हा उपयोगी पडतोच पण १५६ देशातील विमानतळावरही ही सुविधा तुम्ही वापरू शकता आणि तीही पूर्णपणे मोफत. (जेंव्हा तुम्ही परदेशी जाल तेंव्हा हा प्रायोरिटी पास नक्की घेऊन जा).

आमचे तिकीट सेंट पिटर्सबर्ग ते दिल्ली असे असले तरी मॉस्कोपर्यंत डोमेस्टिक एअरलाईन आणि नंतर मॉस्कोहून इंटरनॅशनल फ्लाईट होती. फायदा एकच बॅगेज परस्पर ट्रान्स्फर होऊन दिल्लीतच पोहोचणार होते आणि बोर्डिंग पास आधीच मिळालेला होता. दीड तासाच्या विमानोड्डानानंतर आम्ही मॉस्कोला पोहोचलो. इथे पुढच्या फ्लाईट मधील वेळ जरा कमी होता. आणि आम्हाला डोमेस्टिक वरून इंटरनॅशनल टर्मिनल गाठायचा होता. अल्ताफ भाईंनी याचा अगोदरच विचार करून विमान कंपनीचा एक माणूस सांगून ठेवला होता. आम्ही उतरल्याबरोबर त्याने `दिल्ली' असा बोर्ड हातात धरत चालायला सुरुवात केली. आम्ही सगळे त्याच्यामागे निघालो. चालण्याचे रूपांतर थोडयाच वेळात पळण्यात झाले होते. किती एस्कलेटर चढलो, किती उतरलो आणि किती चाललो. सर्वात शेवटी एका भूयारि रेल्वेने आम्हाला टर्मिनल दोन ला पोहोचवले. धावपळीमुळे कोणाला कोणाकडे बघायला वेळ नवहता. प्रत्येकजण आपापले बघत होता. गेट नंबर २९ ला आमची फ्लाईट असणार होती. ते खूप लांब होते. एअरपोर्ट खूप मोठे पण अतिशय कंजस्टेड. तिथपर्यंतचा प्रवास हा एखाद्या मेट्रो सिटीतल्या गर्दीच्या रस्त्यावरून किंवा शॉपिंग मॉल मधून जातोय असे वाटत होते. गेटजवळ पोहाचलो तर बोर्डिंग सुरु झाले होते. सगळेच आपापले विमानात पोहोचले. सर्वांनी सकाळीच ऑनलाईन चेकिन केलेलं होते. त्यामुळे सगळ्यांच्या जागा विखुरलेल्या होत्या. त्यामुळे कोण आलाय, कोण राहिलाय हे बघायला काही चान्स नव्हता. रात्री ७ वाजता विमानाने मॉस्को वरून उड्डाण केले आणि रशियाला शेवटचा गुडबाय म्हणत आम्ही सर्व सैलावलो. प्रवास सगळा रात्रीचा असल्याने बाहेर काहीच दिसणार नव्हते. विमानात डिनर झाले, काहीवेळ सिनेमा बघितला आणि हळूहळू निद्राधीन झालो.

इथपर्यंत सगळे ठीक चालले होते. गडबड सुरु झाली ती दिल्लीत पोहोचल्यावर. पहाटे चारला दिल्लीत उतरलो. लगेज बेल्ट जवळ सर्व उभे राहिलो. जसजसे येईल तसतसे आपापले लगेज घेत सर्व बाजूला होत होते. आम्ही दोन चार जण अगोदरच बाहेर येऊन उभे राहिलो. सकाळ असल्याने बाहेर वातावरण चांगले होते. पण आकाशाकडे नजर गेल्यानंतर फरक जाणवला. गेले आठ दिवस दिसणारे निळे भोर आकाश दिल्लीत मात्र राखाडी रंगाचे, धुरकटलेले दिसत होते. बराच वेळ थांबलो तरी कोणच बाहेर येईना, एकदा बाहेर पडल्यानंतर आतही जाता येईना. खुपवेळाने सगळे बाहेर आले आणि कळले कि पाच जणांच्या बॅगा आल्याच नव्हत्या. मग एअरपोर्ट अथॉरीटीशी संपर्क करणे, योग्य कागदपत्रे दाखवून रीतसर तक्रार नोंदवणे या सोपस्कारात चांगला तास दीडतास गेला. पुढच्या दिल्ली-पुणे फ्लाईटला वेळ असल्यामुळे फार प्रॉब्लेम आला नाही. पुन्हा इंटरनॅशनल वरून डोमेस्टिक टर्मिनल. जाताने आम्ही बसने गेलो होतो पण यावेळी मात्र आतल्याआत चालतच हे अंतर आम्ही पार केले. ग्रुप बघून `गो-एअर' चा माणूस पुढे आला आणि सगळ्यांचे एकत्रित बोर्डिंग पास घेतले. आणि हे पास प्रत्येकाला देताने एक गोष्ट लक्षात आली कि आमचा एक मेम्बर कुठे दिसत नाही. सोयीसाठी आपण त्याला `संतोष' म्हणूया. सगळेजण `संतोष, संतोष, म्हणून हाक मारत आजूबाजूला बघत होते. मग प्रत्येकाला आठवायला लागले कि आपण बऱ्याच वेळापासून संतोषला पहिलेच नाही. अनेकजण फोन लावत होते पण त्याचा फोन लागत नव्हता. कोणाचा लागला तर आवाजच येत नव्हता. सगळेच हवालदिल झाले होते. पण काहीवेळाने संतोषचाच फोन आला आणि त्याने सांगितले कि तो मॉस्को मधेच राहून गेलाय. नंतर कळलेली हकीकत अशी कि मॉस्को एअरपोर्टवरील गडबडीत हा कुठेतरी मागे राहिला. त्यात मधेच कुठल्या शॉप मध्ये घुसला, शॉपिंगच्या आणि फोनच्या नादात सगळे कधी पुढे गेले कळले नाही. आणि त्यात सर्वात मोठी चूक त्याच्या गेट नंबरच्या ऐकण्यात झाली होती. शॉपिंग झाल्यावर कोणी दिसले नाही आणि तो ज्या गेटजवळ गेला तेंव्हा कळले कि हे चुकीचे गेट आहे, तुम्ही २९ नंबरला जा. धावत पळत तो आलाही पण तोपर्यंत विमानाचे बोर्डिंग टाइम संपलेले होते, गॅंगवे हटवला गेला होता आणि विमान टॅक्सिइंग करत समोरून जात होते. आपली फ्लाईट चुकलीय हे संतोषच्या लक्षात आले. तसा संतोष परदेश प्रवासाला सरावलेला आहे. त्यामुळे गडबडून न जाता त्याने ऍरोफ्लोत एअरलाईन्सचे ऑफिस गाठले. अगोदरच बोर्डिंग पास घेतला असल्याने आणि कनेक्टिंग फ्लाईट मिस झाली म्हणून कंपनीने संतोषला थोडेफार कन्सेशन दिले तरी पण संतोषला हा अनुभव २५००० ला पडला. त्यामुळे परदेशी ट्रिप मध्ये सर्वांच्या बरोबर राहणे, किमान दोन-तीन जण बरोबर असणे, शॉपिंग करत असलो तरीही इतरांकडे आणि विशेषतः घड्याळाकडे लक्ष देणे हेही महत्वाचे असते हा धडा संतोषला तर मिळालाच पण आम्हालाही तो मार्गदर्शक ठरेल हे नक्की. (तुम्हीही कधी गेलात तर नक्की लक्षात ठेवा.)

संतोषचे मागे राहणे आम्हाला अगदी दिल्लीत पोहोचल्यानंतर कळले. पण तो सुखरूप आहे, त्याने दुसऱ्या फ्लाइटचे तिकीट काढलेय आणि तो अजून २४ तासांनी सुखरूप येईल अशी खात्री पटल्यानंतर सगळ्यांनीच निश्वास सोडला आणि लगेज चेकिन कडे वळलो. डोमेस्टिक फ्लाईटला लगेजची मर्यादा १५ किलोच असल्यामुळे सगळ्यांचच लगेज जास्त होते. पण सहा जणांच्या बॅगा कमी झाल्याने आणि एकत्रित बोर्डिंग केल्याने जमून गेले तरी पण पन्नास किलो जास्तच होते. काहीतरी जुगाड करून ते जमवले आणि आम्ही गो-एअरच्या विमानात बसलो. एक तास दहा मिनिटाच्या प्रवासानंतर पुण्यात पोहोचलो. एअरपोर्टच्या बाहेर येताच तापमानातील फरक जाणवला. आम्ही सेंट पिटर्सबर्ग सोडले तेंव्हा ४ डिग्री तापमान होते आणि १७ तासानंतर पुण्यात ३४ डिग्री तापमान होते. नाही म्हटले तरी आठ दिवसात शरीर थंडीला सरावले होते पण पुण्यात मात्र उष्णतेने अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. आपण इंडियात पोहोचलो हे आमच्यातील एकाने लगेच सिद्ध केले आणि हातातील प्लास्टिकचे रॅपर रस्त्याकडेला फेकले, त्याचे बघून कुणीतरी रिकामी बाटलीही फेकली. चालायचंच. इंडिया इज ग्रेट!

दुपारी साताऱ्यात पोहोचलो, प्रत्यकाने गाडी मागवून घेतली होती. घाईघाईत सर्वांचे निरोप घेत जो तो आपल्या घराकडं निघाला. आपल्या महाराष्ट्रीयन माणसांचा होमसिकनेस फारच स्ट्रॉंग असतो. चार दिवस घराबाहेर राहिलो तरी खूप दिवस झाल्यासारखे वाटतात आणि कधी घरी पोहोचतो असे होते. असो.

पुणे सोडतानेच संतोषने मॉस्कोतून उड्डाण केल्याचे कळलं होतं. दुसऱ्या दिवशी तो सुखरूप पोहोचला. पाच जणांच्या राहिलेल्या बागाही दोन दिवसांनी मिळाल्या. एक बॅग जरा तुटली होती. बाकी सर्व ठीक होते.

अशा रीतीने काही बऱ्या वाईट अनुभवासह आमचा हा रशिया दौरा अतिशय आनंदात पार पडला. पुढचे अनेक दिवस, किमान पुढच्या फॉरेन ट्रीपची चर्चा सुरु होईपर्यँत तरी रशियाच्या आठवणी मनात घोळत राहतील हे नक्की. ....................

अनिल दातीर (सातारा)
(९४२०४८७४१०)

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel