मॉस्को मधील आमचा दुसरा दिवस उजाडला तो स्वच्छ कोवळे ऊन घेऊनच. दोन दिवसाचे ढगाळ वातावरण कुठेच दिसत नव्हते. पण थंडी आणि गार वारे मात्र होतेच. हॉटेल मधेही अनेक सुविधा होत्या. त्यामुळे काहीजण लवकर उठून स्वीमीन्गला गेले होते, कोणी जिमला गेले होते तर काहीजण इतर ऍक्टिव्हिटीज चा आनंद घेत होते. सर्वानी साडेनऊला तयार होऊन लॉबीत एकत्र जमायचे असे ठरले होते. अगदी `परफेक्ट वेळेत म्हणजे बरोब्बर अकराला' सर्व जण तयार झाले. आमची गाईड हसतमुख `याना' आणि बसचा खत्रूड ड्राइव्हर वैतागून आमची वाट बघत होते. बसने आम्हाला रेड स्क्वेअर जवळ सोडले. समोर एक लाल विटांमध्ये बांधलेला उंच टॉवर दिसत होता. तिकिटे घेऊन आम्ही आत गेलो. आतला हा चार-पाचशे एकरांचा परिसर म्हणजे रशियाचे अति महत्वाचे ठिकाण. त्यामुळे इथे रस्त्यावरून न चालता फक्त साईडच्या फुटपाथवरूनच चालावे लागते. अर्थात तेही खूप ऐसपैस आहेत. सगळीकडे शस्त्रधारी सैनिकांचा खडा पहारा असतो. के.जी.बी. चे लोकही आसपास नजर ठेऊन असतील. के.जी.बी. ही रशियाची जगप्रसिद्ध गुप्तहेर संघटना. जशी भारताची रॉ, अमेरिकेची सी.आय.ए. इझ्रायलची मोसाद. पण इतके सेन्सिटिव्ह ठिकाण असूनही पर्यटकांना बघायला परमिशन दिलीय हे विशेष. कदाचित त्यांना आपल्या सुरक्षा व्यवस्थेवर दृढ विश्वास असेल. याच परिसरात तीन ऐतेहासिक महत्व असलेले चर्च आहेत. समोरच `क्रेमलिन पॅलेस' ही ऐतेहासिक वास्तू उभी आहे. तीन मजलीच आहे. पण पसारा खूप मोठा आहे. काही महिन्यांपूर्वी रशियाचे प्रसिडेंट व्लादिमिर पुतीन यांचा कार्यालयातून बाहेर पडून लिमोझीन मध्ये बसेपर्यंतचा पाच मिनिटांचा व्हिडीओ व्हायरल झाला होता तो इथलाच होता.

सतराव्या शतकात `आर्किटेक्ट रस्ट्रेल' यांनी हा पॅलेस राजघराण्यासाठी `विंटर पॅलेस' म्हणून बांधला. त्यात नंतर अनेकदा रिनोव्हेशन, मॉडर्नायझेशन झालेय. पण इमारतीचा मूळचा बाज तसाच मेंटेन केला गेलाय. राजघराण्याच्या अस्तानंतर सत्तेत आलेल्या लेनिन, नंतर स्टॅलिन, नंतर गोर्बाचेव्ह, नंतर बोरिस येल्तसिन यांचे निवास्थान आणि ऑफिस इथेच होते. त्यानंतर सध्याच्या प्रेसिडेंट `व्लादिमिर पुतीन' यांचे कार्यालय सध्या इथेच आहे. पण पुतीन महाशय इथे राहत नाहीत. क्रेमलिन पॅलेसच्या समोर एक चर्चसारखी वास्तू आहे. तिथेही पर्यटकांना जायला परवानगी नाही. त्या इमारतीत पूर्वीपासून रशियाचे सर्वोच्च स्थान असलेले ख्रिश्चन धर्मगुरू `पोप' राहायचे. ख्रिश्चन धर्म असलेल्या देशांमध्ये या चर्च आणि त्यांच्या पोपला फार महत्व असायचे. राजांपेक्षाही जास्त अधिकार या चर्चेसना होते. त्याकाळी आपला धाक टिकवून राहण्यासाठी हे चर्चेस अनेक चमत्कार करून दाखवायचे. जसे येशूच्या डोळ्यातून पाणी येणे, पायातून हातातून रक्त येणे, मदर मेरीच्या डोळ्यातून पाणी येणे, स्तनातून दूध येणे वगैरे वगैरे. कालांतराने हे सर्व प्रकार मेकॅनिकल करामती असायच्या हे सिद्ध झाले. असो.

........... या परिसरात कॅथेड्रल ऑफ अँन्यून्सिएशन, कॅथेड्रल ऑफ आर्चएंजेल, डॉरमिशन कॅथेड्रल, पॅट्रीआर्च पॅलेस आणि अजूनही बऱ्याच महत्वाच्या इमारती आहेत. या परिसराला `सोबोर्नय स्क्वेअर' असेही म्हटले जाते. यातील फक्त कॅथेड्रल(चर्च) मधेच पर्यटकांना जायला परवानगी आहे. बाहेर परिसरात अनेक तोफा ठेवलेल्या आहेत. त्यातील एक तोफ तर एवढी मोठी होती कि तिच्यात एखादे लहान मूल सहज उभे राहील. जवळच बाहेरच्या बाजूला एक अवाढव्य घंटा आहे. तिला `टीसार' बेल म्हणतात. या बेलचे वजन २०१ टन आहे. सोळाव्या शतकात ही बेल ब्रॉन्झपासून तयार करून एका टॉवर वर लावलेली होती. सतराव्या शतकात त्या टॉवरला लागलेल्या आगीत ही बेल खाली पडली आणि तिचा एक तुकडा तुटून बाहेर पडलाय. तो तुकडा तसाच तिथे ठेवलेला आहे त्याचेच वजन ११ टन आहे.

या परिसरातून आम्ही एका भव्य कमानीतून बाहेर आलो तर तो होता ऐतेहासिक `रेड स्क्वेअर' याच चौकातून सुरु झालेल्या लाल क्रांतीत तत्कालीन राजा निकोलस-दुसरा याला पदच्युत केले गेले आणि कम्युनिझम चा उदय झाला. याच चौकात रशियाचे सिम्बॉल म्हणून जी रंगी बिरंगी इमारत ओळखली जाते ती म्हणजे `सेंट बॅसिल्स कॅथेड्रल' आहे. याचे बांधकाम १५५५-१५६१ मध्ये झाले. याचे मूळ नाव `ट्रिनिटी चर्च' होते. नंतर १७ व्या शतकातील `बॅसिल' या ख्रिश्चन संतांच्या नावावरून याचे `सेंट बॅसिल्स कॅथेड्रल' असे नाव झाले. याचे आतील बांधकाम फारच सुंदर आहे. याच परिसरात व्लादिमिर लेनिनचे स्मारक आहे. या चौकात सर्व शासकीय कार्यक्रम पार पडतात. हे कॅथेड्रल बघून बाहेर आलो आणि बसकडे वळलो. पण आमच्याकडचे दोन शार्प शूटर्स (कॅमेऱ्यातून शूटिंग करणारे) प्रकाश आणि इम्तिहाज गायब होते. त्यांना शोधण्यात अर्धा तास गेला. ते फोटो काढण्यात दंग होते.

तिथून आम्ही बाहेर पडलो आणि `खजुराहो' या इंडियन रेस्टोरंन्टला जेवायला गेलो. या रेस्टोरेंट मध्ये अनेक भारतीय देवदेवतांच्या मूर्तींबरोबरच खजुराहो मधील काही विवक्षित मूर्तीही भिंतीवर लावलेल्या होत्या. माझ्या नजरेला त्या खटकल्या. भारतीय संस्कृतीत इतरही अनेक चांगल्या गोष्टी असताना भारताची ओळख म्हणून अशा विवक्षित मूर्ती लावणे मला योग्य वाटले नाही. म्हणून मी त्या हॉटेल मालकाशी यावर मुद्दाम चर्चा केली. पण त्याच्या म्हणण्यानुसार या मूर्ती बघून अनेक रशियन कस्टमर परत परत हॉटेलमध्ये येतात आणि माहिती घेऊन खजुराहोलासुद्धा भेट देतात. त्याच्यादृष्टीने भारताच्या सांस्कृतिक प्रतिमेपेक्षा त्याचा व्यवसाय महत्वाचा होता. असो,.

जेवणानंतर उर्वरित सिटी टूर साठी निघालो. काही वेळाने बस एके ठिकाणी थांबली. समोर एक खूप मोठी कॅन्टिलिव्हर्ड- हँगिंग गॅलरी दिसत होती. तिला काचेचे रेलिंग होते. भलामोठा सिक्स लेन हायवे, त्याच्या बाजूला फुटपाथ आणि त्याला लागून तुडम्ब भरून वाहणारी मॉस्को नदी. रस्त्याच्या एकाच कडेला असलेल्या भव्य पिलर मधून हा कॅन्टिलिव्हर काढलेला होता, तो अगदी नदीपात्रावर गेलेला होता. मोस्ट हॅपनिंग प्लेस. शेकडो लोक होते तिथे. फोटो काढायला तर सीमाच नव्हती. त्या गॅलरीतून ते सगळे लॅंडस्केप डोळ्यात साठवून घेत परत फिरलो. त्याच्या जवळच एक कल्चरल सेंटर पण दिसत होते. पलीकडील गार्डन आणि ऍम्पिथिएटरच्या भव्य पायऱ्या खूपच आर्टिस्टिक दिसत होत्या. पण हे सर्व जवळून बघण्याइतका वेळ आमच्याकडे नव्हता. रात्रीच्या वेळी हा परिसर फारच सुंदर दिसत असेल असे वाटले. तिथून आम्ही एका बागेतून चालत चालत पुन्हा विरुद्ध बाजूने रेड स्क्वेअर मधेच आलो. संध्याकाळचे पाच वाजले होते. या काळात मॉस्कोतील दिवस सकाळी ५-५.३० उगवतो आणि आठ-साडेआठला मावळतो. त्यामुळे आमची रात्रीची जेवणं दिवसाउजेडीच होऊन जायची. रेड स्क्वेअर भागात सर्वांना दोन तास फ्री टाइम होता. तिथेच एक मॉल होता `गम मॉल'. सगळेजण आनंदाने आत गेले. आतापर्यंत खरेदीला वेळच मिळाला नव्हता म्हणून सगळेजण मॉल बघून खुश झाले. आत खूप मोठा तीन मजली लांबच्या लांब मॉल होता. दुकानांच्या वेग वेगळ्या रांगा, मध्ये भरपूर मोकळी जागा, त्यावर इकडे तिकडे जाता येतील असे हँगिंग पॅसेजेस. त्यातही काही कॉफी शॉप्स. मंडळी हौसेने आत गेली खरी पण थोडयाच वेळात अनेकांची निराशा झाली. आपल्या कल्पनेतला हा डिस्काउंटवाला मॉल नव्हता. इथल्या किमती प्रचंड होत्या. अगदी तुलना करायची म्हटली तर शॉपर्स स्टॉप शी करता येईल. पण रशिया एकंदरीतच खूप महागडा आहे. आपल्यापेक्षा किमान ७ ते १० पट किमती होत्या. साधे फ्रिजला चिकटवायचे सोव्हेनियर बघीतले तरी त्याच्या किमती पाच-सातशे होत्या. पाण्याची अर्धा लिटरची बाटली सुद्धा ९० रुबल्स म्हणजे आपले ११५ रुपये अशी होती. शहरात इतके मुबलक पाणी असूनही पाणी एवढे का महाग काही कळले नाही. हाच अनुभव नंतरही अनेकदा आला.

लवकरच एकेक जण बाहेर आला. अल्ताफभाईंनी सर्वांना गरम गरम कॉफी पाजली तीही २०० रुपयाला होती. काय वेळ घालवायचा इथे म्हणत सगळेजण बाहेर पडले. रेड स्क्वेअर च्या परिसरावर अखेरची एक नजर टाकत मीही बाहेर पडलो. तिथून निघालो आणि बसने पुन्हा एका ठिकाणी सोडले. जिथे एक फक्त पायी फिरणारांसाठीच पूल बांधलेला होता. खालची स्वच्छ मॉस्को नदी, दूरवर दिसणारी अस्ताकडे निघालेल्या सूर्याची सोनेरी आभा, खालच्या रस्त्यावरुन वेगाने पण हॉर्न न वाजवता जाणाऱ्या असंख्य गाड्या. काही अंतरावर नदीत एक सुंदर जहाजाची प्रतिकृती असलेले स्मारक बांधलेले दिसत होते. मॉस्को मध्ये एकही टू व्हीलर किंवा थ्री व्हीलर दिसली नाही. कदाचित थंडीमुळे कोण वापरत नसतील किंवा बंदीही असेल. त्या पुलावर अनेक रशियन लोकही फिरायला आलेले होते. अनेक प्रेमी युगुलंही दिसत होती. त्या पुलाच्या रेलिंगला अनेक वेगवेगळ्या प्रकारची कुलुपे अडकवलेली होती. चौकशी करता कळले कि हा पूल म्हणजे `लव्हर्स पॉईंट' आहे. इथे येऊन प्रियकर प्रेयसी प्रेमाच्या आणाभाका घेतात आणि आपल्या प्रेमाची निशाणी म्हणून रेलिंगला एक कुलूप लावून चावी नदीत फेकून देतात. आपल्या भारतासारख्या अंधश्रद्धा बाहेरच्या देशातही आहेत. अनेकदा सिनेमात नाही का कोणीतरी हिरो हिरोईन डोळे बंद करून एखाद्या तळ्यात, कारंज्यात पैसे फेकताने काहीतरी विश मागितल्यासारखे दाखवतात, तसाच हाही एक प्रकार.

या पुलावर टेडीचे/ फरचे जाड कपडे घालून काहीजण मनोरंजन करत होते. कोणी ससा झाला होता, कोणी टर्की झाला होता, तर कोणी कांगारू होता. हे लोक जवळ येऊन फोटो काढायला उद्युक्त करत होते आणि त्यांच्याबरोबर फोटो काढला कि लगेच पैशासाठी जबरदस्ती करत होते. एकाने फोटो काढताने आमच्या विजयजींचा चलाखीने चष्मा काढून घेतला आणि तो परत देण्यासाठी पैसे मागितले. बरे सुट्टे पैसे पण घेत नव्हता, त्याला डॉलरच पाहिजे होते. शेवटी `याना' मदतीला धावून आली आणि तिने तो चष्मा परत मिळवून दिला.

हाही अनुभव जमेस टाकत आम्ही बस मध्ये सवार झालो आणि पुन्हा एक इंडियन रेस्टोरेंट मध्ये जेवण करून हॉटेल गाठले. अशा रीतीने आमचा मॉस्कोतील हाही दिवस आनंदात संपला.................

अनिल दातीर.
(९४२०४८७४१०)

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel