मनाला हुरहूर लावत अखेर सात एप्रिलचा दिवस उगवला. ऑफिसच्या कामामुळे अगदी शेवटच्या दिवशी बॅग भरायला वेळ मिळाला होता. अर्थात आता परदेश वारी सवयीची झाल्याने माझी आणि आमच्या अनेक मेम्बर्सची मानसिकता अगदी शेवटच्या क्षणी `बॅग भरो और निकल पडो' इथपर्यंत पोहोचली आहे. तीन टी शर्ट आणि एक ट्रावझर हीच ती काय नवीन खरेदी, बाकी सगळे जुने जुने. पण दरवेळचा उत्साह मात्र नेहमीच नवा असतो. ग्लोबल चे अल्ताफ पठाण बरोबर असतात त्यामुळे तशी काही काळजी नसतेच. दुपारी ४ वाजता गिरिकंद च्या ए.सी. कोच ने आम्ही २७+१ जणांनी रशियाला जाण्यासाठी सातारा सोडले. यावेळी आमची अंतरराष्ट्रीय फ्लाईट दिल्लीवरून होती. पुण्याच्या डोमेस्टिक एअरपोर्टला वेळेत पोहोचलो. पुण्याचे हे एअरपोर्टसुद्धा आता चांगलेच बहरू लागलेय. आमची फ्लाईट रात्री आठला होती, त्यामुळे जेवणाचे टायमिंग चुकत होते. म्हणून मग अल्ताफभाईंनी पॅक्ड लंच पॅकेट बरोबर दिले होते. जरा घाबरत घाबरत, यातील तेल लिकेज झाले तर कपड्यांची वाट लागायची, अशी भीती बाळगत सर्वांनी पॅकेट बॅगेत टाकले. चेकिन करून आतल्या लॉबीत पोहोचल्यावर काही जणांनी लंच पॅकेट संपवले तर काहींनी घरून आणलेल्या पदार्थांवर ताव मारत विमानतळावर आपला सातारी बाणा दाखवला. प्रतीक्षा संपून `पुणे-दिल्ली' फ्लाईटचे बोर्डिंग सुरु झाले. `गो-एअर' च्या विमानात विंडो सीट हवी असली तरी ३५०-४५० रुपये एक्सट्रा द्यावे लागतात. त्यामुळे कोणीही अर्ली ऑनलाईन चेकिन केलेले नव्हते, त्यामुळे मिळेल ती सीट घ्यावी लागली. नेहमीप्रमाणे टॅक्सिइंग करत विमान रनवेवर आले आणि हलकासा धक्का देत आकाशात झेपावले. ठराविक लेव्हलला विमान स्थिर झाल्यावर सर्वांनीच आपापले लंच बॉक्स उघडले आणि जेवण सुरु केले. त्या पॅक मध्ये अगदी साग्रसंगीत दोन सुक्या भाज्या, दोन दोन फुलके आणि पराठे, थोडेसे स्वीट, डाळभात अगदी चटणी कोशिंबिरीसहित होते. अनपेक्षितपणे मिळालेले इतके चांगले जेवण सर्वानाच आवडले. जेवल्यानंतर सर्व मंडळी सुस्तावली. विमानाचा तो ठराविक घूंSSS आवाज सोबतीला होताच. विमानप्रवासाचे अप्रूप आता अजिबात राहिलेले नाही. उलट दुसरी काही व्यवस्था असली तर बरे असे वाटते पण इतक्या वेगात इतके अंतर पोहोचवणारे दुसरे साधन आपल्या आवाक्यात नाही. त्यातही आपण इकॉनॉमी मधून प्रवास करणार. बिझनेस क्लासला मात्र आरामदायक सुविधा असतात पण त्याचे तिकीट दुप्पट असते. असो.

 

दिल्लीपर्यंतचा प्रवास दोन तास दहा मिनिटांचा होता. दिल्ली जशी जवळ आली, पायलटने लँडिंगची घोषणाही केली पण परत काही वेळाने `हवामान खराब असल्याने लँडिंग ३० ते ४० मिनिटे उशिरा होणार आहे' असे अनाऊन्स केले. उतरण्याच्या तयारीला लागलेली मंडळी पुन्हा सुस्तावली. खराब हवामान असल्याने विमानही हादरत होते. अखेर पाऊण तासाच्या विलंबानंतर दिल्लीत सुखरूप लँडिंग झाले. (आम आदमी केजरीवालजी आजूबाजूला कुठे दिसतील अशी उगाच आशा वाटून गेली, पण नाही, सरजी यावेळी झोपले असावेत) आपापले लगेज घेऊन अंतरराष्ट्रीय विमानतळ गाठायचे होते. बाहेर आलो तर तिकडे जाण्यासाठी शटल बसची व्यवस्था होती. त्या बसने बराच वळसा घालत, शहराच्या काही भागातून दिल्लीच्या `इंदिरा गांधी आंतराष्ट्रीय विमानातळ' वर नेले. (परत येताने मात्र आतल्याआत हा टप्पा आम्ही चालत पार केला)

डोमेस्टिक फ्लाईटला उशीर होऊन सुद्धा आम्ही बरेच लवकर इथे पोहोचलो होतो. कारण आमचे बुकिंग असलेल्या रशियाच्या `एरोफ्लोट' कंपनीच्या विमानाचे मूळ टायमिंग होते रात्री तीनचे. पण गेल्या काही महिन्यापासून भारत-पाकिस्तानचे बिघडलेले संबंध लक्षात घेऊन गेल्याच २९ तारखेपासून रशियाने आपल्या सर्व विमानांना पाकिस्तान आणि अफगाणिस्तानवरून उडण्यास प्रतिबंध केलाय. आपले भारतातील काही जण पुलवामाला साधी दुर्घटना म्हणत आहेत, भारताने केलेला सर्जिकल स्ट्राईक खोटा आहे असे म्हणत आहेत पण जागतिक राजकीय घडामोडींवर गरुडासारखी तेज नजर ठेवणाऱ्या रशियाने मात्र `परिस्थिती स्फोटक आहे' हे मान्य करत पाकिस्तानला प्रवासातून वगळलंय. त्यामुळे आमचे येणारे विमान आणि परत जाणाऱ्या विमानाच्या वेळेत तब्बल पाच तासांचा फरक पडला होता. त्यामुळे आम्हाला विमानतळावरच सहा-सात तास काढायचे होते. घाईगडबडीत चौकशी न करता आम्ही पासपोर्ट दाखवून बिल्डिंग मध्ये प्रवेश केला खरा पण कळले कि चेकिन चार वाजता सुरु होणार आहे. म्हणजे जिथे आराम करता येऊ शकेल अशा लाउंज मध्ये जायलाही ४ ते ५ तास वाट पाहावी लागणार होती. तसा तिथे एक `रात्र आराम कक्ष' बाहेरच्या बाजूला आहे, जिथे आरामाची सोय आहे पण त्याला बाहेरूनच जावे लागते. आणि एकदा विमानतळाच्या इमारतीत प्रवेश केला कि तुम्हाला परत तिथूनच बाहेर पडता येत नाही. (माहित असावे म्हणून उल्लेख केला).

मग काय इकडे तिकडे फिरत फिरत मंडळी लँडस्केप केलेल्या ग्रॅनाइटच्या कट्ट्यांवर विसावली, अवघडून फरशीवर बसत कट्ट्याला पाठ टेकती झाली आणि काही वेळाने चक्क फरशीवर आडवी झाली. साताऱ्यातील नामांकित बांधकाम व्यवसायिक दिल्ली विमानतळाच्या फरशीवर निवांत झोपले होते. म्हणूनच मी मागे एकदा `विमानतळ ही सर्व धर्म समभाव' शिकवणारी जागा आहे असे म्हणालो होतो. त्याक्षणी अमिताभ बच्चन जरी तिथे असते तरीही ते असेच कुठल्या तरी कट्टयावर रेंगाळले असते. हळू हळू पाठीवरच्या बॅगांमधून घरून आणलेले आणि ग्लोबल नेही सोबत दिलेल्या खाद्यपदार्थांच्या पिशव्या बाहेर आल्या आणि फस्त झाल्या.

चार तासाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर चेकिन सुरु झाले. आता पुढील सोपस्कार सुरु होणार होते. मी आणि अनेक माहितगारांनी अगोदरच `ऑनलाईन चेकिन' करून हव्या त्या जागा मिळवल्या होत्या. त्यामुळे जरा कमी गर्दी असलेल्या लायनीत उभे राहता आले. मोठ्या बॅगा एकदाच्या विमानकंपनीकडे सोपवल्या आणि जरा निवांत वाटले. आता काय प्रत्येकाच्या हातात फक्त एक छोटी बॅग किंवा बॅकपॅक होते. पुढे जाऊन इमिग्रेशन चेक, पर्सनल तपासणी हे सोपस्कार उरकत आम्ही वेटिंग लाउंज मध्ये आलो. प्रत्यक्ष बोर्डिंग सुरु व्हायला अजूनही २-३ तास शिल्लक होते. मग काहीजण शॉपिंग मध्ये व्यस्त झाले तर काही जण जागा मिळेल तिथे आरामशीर सुस्तावले. मी आणि सुहास ने पहिला बिझनेस लाउंज गाठला. * परदेश प्रवास करणारांसाठी माहिती म्हणून जरा विस्तृत सांगतो. आजकाल बऱ्याच जणांकडे `क्रेडिट कार्ड' असतात. किमान परदेश वारी करण्याइतपत आर्थिक सुबत्ता असलेल्यांकडे तर नक्की असतात. हे क्रेडिट कार्ड वापरून तुम्हाला या बिझनेस लाउंज मध्ये प्रवेश मिळतो. इथे आरामाची सोय तर असतेच शिवाय भरपूर खाद्य पदार्थांची रेलचेल, अगदी पेयपानासकट फुकट व्यवस्था असते. क्रेडिट कार्ड वर इंडियातल्या कुठल्याही विमातळावर असा प्रवेश मिळतोच पण याही पुढची पायरी म्हणजे मोठ्या बँकांच्या क्रेडिट कार्डवर एक `प्रायोरिटी पास' मिळतो. हा आपोआप मिळत नाही तर मागवून घ्यावा लागतो. आणि या प्रायोरिटी पासचा उपयोग करून इतर देशातल्या विमानतळाच्या बिझनेस लाउंजला सुद्धा एंट्री मिळते. मी आणि सुहास ने दिल्लीत तर याचा फायदा घेतलाच पण परतीच्या प्रवसात रशियातल्या `सेंट पिटर्सबर्ग' विमानतळावर सुद्धा आम्ही याचा उपभोग घेतला. त्यामुळे पुढच्या वेळी जाण्याअगोदर क्रेडिट कार्ड आणि हा प्रायोरिटी पास नक्की सोबत घ्या.

या श्रम परिहारानंतर सात वाजता बोर्डिंग सुरु झाले आणि आम्ही विमानात पोहोचलो. मी नेहमीप्रमाणे विंडो सीट मिळवली होती. खरेतर ज्यांना विमानातून बाहेरचा परिसर बघायचा आहे त्यांनी विंडो सीट घ्यावी पण ज्याला मस्त पैकी झोपून जायचे असेल त्याने आतल्या पॅसेजकडील सीट निवडावी म्हणजे किमान जरा पाय पसरून सुस्तावता येते. लवकरच विमानाने टेक ऑफ केले आणि आकाशाकडे झेपावत उत्तरे ऐवजी दक्षिण-पश्चिम दिशा पकडली. पाकीस्तानला टाळायचे म्हणून विमान दिल्लीवरून अगदी जयपूर, अहमदाबाद असे होत मुंबईच्या जवळून समुद्रावर गेले. तिथून ते उत्तरेची दिशा पकडेल असे वाटत होते पण पाकिस्तानच्या सागरी हद्दीलाही टाळण्यासाठी अगदी अरेबियन खाडीच्या पलीकडच्या तीरावरून म्हणजे मस्कत, दोहा आणि वळून बाकु जवळून रशियात प्रवेश करते झाले. विमानातल्या स्क्रीनवर ही सर्व माहिती मिळत होती. मला विमानात सहसा झोप लागत नाही, तरीपण काल रात्रीचे अखंड जागरणामुळे काही काळ डोळा लागला. पण नंतर मात्र अखंडपणे मी बाहेर बघत होतो. विमानातून दिसणारे ढंगाचे चित्र अतीशय सुंदर असते. नजर स्थिर ठेऊन बघत राहिले तर आपल्या मनात येणारे अनेक आकार त्या ढगांमध्ये दिसू लागतात. कधी कुठला प्राणी तर कधी पक्षी तर कधी डोंगर तर कधी मानवी चेहरे असे विविध आकार दिसतात. या सगळ्याचा आनंद घेत माझा प्रवास चालू होता. मूळची सात तासांची असलेली फ्लाईट एव्हाना नऊ तासाची झाली होती. मध्ये अनेकदा हवामान खराब असल्याच्या आणि पट्टे बांधण्याच्या सूचना येत होत्याच. आणि विमानात तसे जाणवतही होते. या खराब हवामानातल्या विमान प्रवासाचे नक्की वर्णन करायचे असेल तर असे समजा कि तुम्ही एका छान हायवेवरून वेगाने चालले आहात, मधेच रस्त्याचे काम सुरु आहे, रस्त्याला खड्डे आहेत, त्यावरून गाडी जाताने हादरे बसताहेत, मधेच असा आवाज येतो कि जणू काही रस्त्यावर डांबर आणि खडीचा पहिला लेयर टाकलाय आणि त्यावरून गाडी जाताने टायर घासल्याचा आवाज येतोय आणि अचानक हे काम संपून पुन्हा स्वच्छ गुळगुळीत रस्ता सुरु झालाय..... असेच काहीतरी विमानातही अनुभवायला मिळते. असो.

अखेर मॉस्को जवळ आल्याची अनाउन्समेंट झाली. पण खाली काहीच दिसत नव्हते. मॉस्को वर अखंड धुक्याचा थर होता. आपल्याकडचे धुके म्हणजे कसे एका ठराविक उंचीपर्यंत असते पण इकडे हा थर अनेक किलोमीटरचा होता. विमानाचे अल्टीट्युड अजूनही ८-१० किलोमीटर उंची दाखवत होते. वैमानिकांना विमानतळ कसे दिसत असेल कोणास ठाऊक? पण आजकालच्या इलेक्ट्रॉनिक क्रांतीमुळे हे सहज सोपे झालेय. योग्यवेळी विमानाचे लँडिंग झाले आणि बाहेरचंही स्पष्ट दिसू लागले. बर्फ संपायचा सिझन गाठून आम्ही आलो असलो तरी बऱ्याच ठिकाणी खोलगट भागातून बर्फाचे गालिचे पसरलेले होते. विमानातून बाहेर पडताने थंड वारे अंगाशी झोंबले. बाहेर पाऊल ठेवताच हलकासा पाऊस आणि भुरुभुरु बर्फ अंगावर आला. ते शुभ्र बर्फ जणू आम्हाला म्हणत होते ``रशियामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे''...... भेटूच पुन्हा मॉस्कोच्या भूमीवरून..... .....................

अनिल दातीर, सातारा
(९४२०४८७४१०)

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel