नमस्कार, मी निमिष सोनार. मी पुणे येथे राहतो आणि एका खासगी कंपनीत काम करतो. माझे कार्यक्षेत्र जरी टेक्निकल असले तरी लहानपणापासून मला साहित्याची आवड आहे. माझे सतत वाचन आणि लेखन सुरू असते. आरंभच्या फेब्रुवारी अंकापासून मी संपादकपदाची धुरा सांभाळली आहे, अर्थात ती माझ्याकडे यापूर्वीचे संपादक श्री अभिषेक ठमके यांनी दिली आहे आणि त्यांनी स्वतः सल्लागाराची भूमिका स्वीकारली आहे. अर्थ मराठी आणि बुकस्ट्रक यांच्यातर्फे संयुक्तपणे आरंभ मासिक चालवण्यात येते.

माझ्या लेखन कारकिर्दीबद्दल सांगायचे झाले तर, मी तसा आठवी-नववीत असतानापासून वाचन लेखन करत आलेलो आहे. एक लेखक आधी एक चांगला वाचक असावा लागतो. माझ्या अनेक चित्रकथा, व्यंगचित्रे, लेख ठिकठिकाणी प्रसिद्ध झाले आहेत. माझ्या पहिल्या "जलजीवा" या सायन्स फिक्शन कादंबरीला 2016 साली बुकस्ट्रकतर्फे सर्वोत्कृष्ट फॅन्टसी असा पुरस्कार मिळाला आणि मी बुकस्ट्रकच्या टीमसोबत सामील झालो ते आजतागायत! त्यानंतर माझ्या अनेक कथा कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या, त्यातील गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये प्रसिद्ध झालेली "वलय" ही सिनेसृष्टीवर आधारित कादंबरी जगभरातील मराठी वाचकांना आवडते आहे आणि अजूनही मला ती कादंबरी आवडल्याचे मेसेजेस, फोन आणि इमेल्स येतच असतात. अभिषेक यांच्या अग्निपुत्र, पुन्हा नव्याने सुरुवात, मैत्र जीवांचे यासारख्या कादंबऱ्या खूप लोकप्रिय झालेल्या आहेत. त्यापैकी त्यांची अग्निपुत्र ही फॅन्टसी कादंबरी मला खूपच आवडते.

बुकस्ट्रकच्या अक्षर प्रभू देसाई आणि सिद्धेश प्रभूगावकर यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच! त्यांनी बुकस्ट्रक या अॅपद्वारे अनेक नवोदित लेखकांना लिहिण्यासाठी ऑनलाईन व्यासपीठ उपलब्ध करून दिले.

अभिषेक ठमके यांनी जानेवारी 2018 पासून "आरंभ" हे मासिक सुरू केले आणि अल्पावधीतच ते लोकप्रिय झाले. यापूर्वी मी सल्लागाराच्या भूमिकेत होतो.  हे मासिक गुगल प्लेस्टोअरवर फ्री डाऊनलोड करून मिळतं. प्रत्येक अंकात वेगवेगळे विषय हाताळून या मासिकाने वैविध्य जपलं आहे, तसेच अनेक नवोदित लेखकांना संधी सुद्धा दिली आहे. अनेक प्रथितयश लेखक सुध्दा यात लेखन करताना दिसतात. आता या मासिकाच्या संपादकपदाची जबाबदारी माझ्याकडे आली आहे. अभिषेक यांनी इथपर्यंत आणून ठेवलेली ही जबाबदारी आता मला त्यांच्याच इतक्या समर्थपणे पेलायची आहे. आरंभची सगळीच टीम आपल्या कामाच्या व्यापातून वेळ काढून आरंभ साठी मेहनत करताना दिसून येते आणि त्याचीच परिणीती हे मासिक लोकप्रिय झाल्यात होत आहे. शेवटी कोणत्याही यशामागे टीमवर्क हेच महत्वाचे!

फेब्रुवारी अंकाचा काय विषय निवडावा याबद्दल माझ्या मनात विचार सुरू होता. मग मी विचार केला की "प्रवासवर्णन" हा विषय का घेऊ नये? सर्वांच्याच आवडीचा हा विषय आहे! आपल्या रोजच्या कामाच्या व्यापातून विरंगुळा मिळावा यासाठी आपण छोटे-मोठे पर्यटन करतच असतो. त्यामुळे लेखकांना त्यांनी केलेल्या पर्यटनाबद्दल लिहायला लावून त्याचा उपयोग वाचकांना सुद्धा होईल आणि तेही अधिकाधिक पर्यटन करायला उत्सुक होतील हा त्यामागचा उद्देश!

आपल्या स्वतःच्या किंवा इतर राज्यात आणि शक्य झाल्यास देशाच्या बाहेर पर्यटन हे होत असतं. पर्यटनामुळे माणूस शहाणा होतो. ठिकठिकाणचे चाली-रीती, व्यवहार, भाषा, नवनवीन लोक, निसर्गसौंदर्य आपल्याला अनुभवायला मिळत असतं. ठिकठिकाणचा भूगोल इतिहास आपल्याला त्यामुळे समजत असतो. अनुभवता येतो. तसेच पर्यटनामुळे आपली जगाकडे बघण्याची दृष्टी बदलते, आपलं आजूबाजूचं ठराविक चाकोरीबद्ध आयुष्य सोडून अधूनमधून पर्यटन केल्याने आपला दृष्टिकोन व्यापक होतो. आपल्यात एक नवीन एनर्जी येते आणि आजच्या टेक्निकल भाषेत सांगायचं झालं तर आपण "रिचार्ज" होतो, आपला मेंदू आणि मन "रिफ्रेश" होतात. आपल्या विचार कक्षा रुंदावत जातात!!

हा विषय इतका व्यापक आहे की फक्त फेब्रुवारीपुरता मर्यादित न ठेवता तो मी मार्च साठी सुध्दा घ्यायचा ठरवला. आणखी एक कारण म्हणजे एप्रिल-मे मध्ये म्हणजे उन्हाळी सुट्ट्यांमध्ये लोक जास्त करून पर्यटन करायला जातात. हे समोर ठेवून मी दोन्ही अंकासाठी हा सेम विषय निवडला आणि लेखकांचा भरघोस प्रतिसाद आरंभ टीमला लाभला.

मी स्वतः केलेल्या पर्यटनाबद्दल सांगायचे झाल्यास कंपनीच्या कामानिमित्त वर्षभर मी कुटुंबासह लंडन येथे होतो. ते माझं पहिलं वहिलं परदेश पर्यटन. मुंबई ते लंडन असा सलग दहा तासांचा विमान प्रवास होता तो! माझा पहिलाच विमान प्रवास! तोही सलग दहा तास! भारतातील ठिकाणांबद्दल सांगायचे झाल्यास माथेरान, महाबळेश्वर, पुणे, कोल्हापूर, अलिबाग, गणपतीपुळे, म्हैसूर, उटी, बँगलोर, अजंता, एलोरा यासारखी अनेक ठिकाणं मी बघितली आहेत. त्याबद्दल मी पुढच्या अंकात लिहीनच! आपण जेव्हा परदेशात प्रवास करतो तेव्हा तिथल्या लोकांबद्दल असलेल्या आपल्या संकल्पना विशेषतः वेस्टर्न किंवा पाश्चिमात्य लोकांबद्दल असलेल्या समजुती गैरसमजुती बरेचदा बदलतात असा माझा अनुभव आहे.

एका आयुष्यात आपण संपूर्ण जग खचितच आपण फिरू शकत नाही पण प्रवासवर्णन असलेली पुस्तके, मासिके ही आपण जरूर वाचली पाहिजेत. वाचण्याचा अनुभव वेगळाच! मीना प्रभूंची प्रवासवर्णन असेल पुस्तके तर सच्चा प्रवाश्याला एक पर्वणीच आहे. तसेच "लोनली प्लॅनेट", "नॅशनल जिओग्राफिक ट्रॅव्हलर इंडिया" यासारखी इंग्रजी मासिकंसुद्धा जरूर वाचली पाहिजेत. मराठीतही भटकंती विषयाला वाहिलेली अनेक मासिकं निघतात, दिवाळी अंक निघतात तेही वाचून आपले ज्ञान वृद्धिंगत करता येईल. अर्थात आज ट्रॅव्हल या विषयाला वाहिलेल्या अनेक प्रायव्हेट वाहिन्या किंवा चॅनेल्स आहेत. त्यापैकी सगळ्यात चांगली वाहिनी माझ्या मते "ट्रॅव्हल एक्सपी" आहे. टाटा स्काय चॅनेल नंबर 765.

आरंभच्या या अंकात आपल्याला मदुराई, रामेश्वरम, चेन्नई, अंदमान, रहिमतपूर, सातारा, शालीमार गार्डन इथली एकाहून एक सरस अशी प्रवासवर्णन वाचायला मिळतीलच, त्याशिवाय प्रवासाविषयी उपयुक्त माहिती जसे प्रवासापूर्वीची तयारी तसेच प्रवासादरम्यानचे मजेशीर अनुभव वाचायला मिळतील. तसेच "आयुष्याच्या प्रवासाविषयी दोन कविता" आणि "व्हेज बार्बेक्यू बिर्याणीची रेसिपी" आणि "फार्मासिस्टची नैतिक तत्वे" सुद्धा वाचायला मिळतील.

माझे पहिलेच संपादकीय म्हणता म्हणता जास्त लांबलेले आहे असे मला वाटते. तेव्हा आता जास्त पसारा न करता शेवटी मी विनंती करेन की पर्यटनावर असलेल्या या अंकातील लेख वाचा आणि पुढच्या अंकात तुम्हाला सुद्धा लिहावेसे वाटले तर तुम्हीही आम्हाला लेख लिहून पाठवा. निवडक लेखांना जरूर प्रसिद्धी दिली जाईल. हे मासिक आपल्यासाठीच तर आहे!

आणि हो आपण वाचलेल्या लेखांवर आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कळवायला विसरू नका.

आमचा ई-मेल आयडी आहे: aarambhmasik@gmail.com

कळावे लोभ असावा!

आपला संपादक, निमिष सोनार; फेब्रुवारी २०१९

[ संपादकाचा पत्ता: पुणे, मोबाईल नंबर – ८८०५०४२५०२ ]

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel