दुसरे सूत्र आहे सम्यक संकल्प. आपला संकल्प, आपले ध्येय हे फार आवाक्याबाहेरचे नको तसेच फार साधे, अगदी सहजसाध्य, कुवतीपेक्षा पुष्कळ कमी असेही नको. आपल्या नेहमीच्या जगण्यात, विशेषत: आजच्या काळात तर सम्यक संकल्प फार महत्त्वाचा ठरतो. आपल्या मुलांसाठी अवास्तव अपेक्षा बाळगणारे पालक मुलांसमोर न झेपणारे ध्येय ठेवतात. त्या ध्येयाकडे वाटचाल करताना मुले आणि पालक दोघेही दु:खी होतात. ध्येय साध्य झाले नाही की आत्मविश्वास ओसरू लागतो. ताण येतो. आपण पालकांच्या अपेक्षा पुऱ्या करू शकलो नाही याचे दु:ख होते. अशा वेळी आत्यंतिक निराशेने मुलांनी आत्महत्या केल्याचीही उदाहरणे आहेत. याखेरीज संकल्पामध्ये दुराग्रह असू शकतो. खोटी प्रतिष्ठा आणि अहंकारापायी अमुक एक करून दाखवीन आणि मगच विसावेन, या संकल्पामुळे आयुष्यातील मौल्यवान काळ फुकट जाऊ शकतो. मनापासून नको असलेली गोष्ट करणे म्हणजे मानसिक शक्तींचा अपव्यय असतो. दुसरीकडे आळशीपणा करून, आपल्याकडे असलेली शक्ती, ताकद, कौशल्य फुकट घालविणे हे सुद्धा दु:खदच म्हणावे लागेल. ही माणसे आपले आणि समाजाचे नुकसान करीत असतात. तेव्हा कुवतीनुसार समतोल ध्येय म्हणजे सम्यक संकल्प आवश्यक असतो