स्वतंत्र भारतातील लोकशाहीविषयी चिंतन करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की, जोपर्यंत इंग्रज सरकार होते, तोपर्यंत आपल्या देशातील चांगल्या वाईट गोष्टीची जबाबदारी आपण त्यांच्यावर टाकत होतो. पण आता आपण स्वतंत्र झाल्यामुळे चांगल्या वाईट गोष्टीची जबाबदारी आपलीच राहणार आहे. त्यामुळे आपल्याला आता अधिक जबाबदारीने वागावे लागणार आहे. देशाच्या सुरक्षिततेच्या संदर्भात डॉ. बाबासाहेब म्हणतात... भारताचे स्वातंत्र्य आपल्याच लोकांच्या विश्वासघाताने गेले आहे. आपल्याच लोकांनी देशद्रोह केला आणि भारत देश दुसर्यांच्या हाती दिला. महंमद बीन कासीमने जेव्हा सिंधवर स्वारी केली तेव्हा राजा दाहीरच्या सेनापतीने लाच घेतली आणि तो आपल्या राजाच्या मदतीला धावला नाही. यामुळे राजा दाहीरचा पराभव झाला. महंमद घोरीला भारतावर स्वारी करण्याचे आमंत्रण राजा जयचंदने दिले. शिवाजी महाराज स्वराज्यासाठी लढत होते, तेव्हा इतर मराठे सरदार शिवाजी महाराजांविरुध्द लढत राहिले. आता पुन्हा तसेच होणार नाही ना? अशी मला चिंता वाटते. जर नेत्यांनी आपल्या पक्षाचे मत हे राष्ट्र हितापेक्षा श्रेष्ठ मानले तर भारताचे स्वातंत्र्य पुन्हा धोक्यात येईल. असे झाले तर पुन्हा स्वातंत्र्य मिळविणे अशक्यच होऊन बसेल. यासाठी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत आपण आपल्या स्वातंत्र्यासाठी लढले पाहिजे. मी हिंदू, मी मुसलमान, मी ख्रिश्चन, मी शिख, मी जैन-बौद्ध यांना दुय्यमत्व देवून, मी प्रथम भारतीय व अंतिमत:ही भारतीयच आहे असे आपण मानलेच पाहिजे.
डॉ. बाबासाहेबांच्या या विचारांच्या शब्दाशब्दात राष्ट्रप्रेम वास करीत आहे. त्यामुळे ते केवळ दलितांचे किंवा संविधानाचे निर्माते नसून ते आधुनिक भारताचे प्रमुख निर्माता होते.