घरात चार कार्टी असली की गिळायला जरा जास्तच लागतं. मी आपली सक्काळ संध्याकाळ त्या चुलखंडाजवळ शेकून निघते. सुना बर्या आहेत पण सुगरणपणा जरा कमीच. शिवाय त्यांच्या नौकर्या सांभाळत गाडं काही पोळी भाजीच्या पुढं जात नै. वेळच नै हो... मग काय.. आपल्या जिभेला शेवाळ आलं की आपणच चार वेगळे जिन्नस करायचे न पोरांच्या नावाने गिळायचे. त्यात यांची डायटची फ्याडं सांभाळून केलं तर बरंय. नाहीतर नाकं उडवितात. पाकिटातली गोमूत्राच्या वासाची म्यागी नि सुपं ( फुळ्ळुक पाणी नुसतं) गिळताना ही फ्याडं आड येत नाहीत याकडे मीही कानाडोळाच करते. ;)
तर आमच्या धाकट्याच्या थोरलीचे जिभेचे चोचले फार. त्यात तो पास्ता का फास्ता म्हणजे जीव ! म्हणलं अगं त्या पास्त्याच्या पुंगळीसारखी होशील ! जरा घसघशीत खावं... तर म्हणे आज्जी मग तु दे असं चटकमटक... म्हणलं बरं.. जन्म गेला यांच्या जिभेची कौतुकं करताना. आता नातवंडांसाठी मागं हटले तर नावाची लक्षुम्बाई नाही !
झालं. तरातरा गेले सैपाकघरात. ज्वारीचं पीठ घेतलं २ वाट्या, अर्धी वाटी बेसन आणि उगीच चिकटपणाला थोडिशिक कणिक. त्यात घातलं चमचाभर लाल तिखट, पाव चमचा हळद, पाव चमचा हिंग आणि मीठ. घसाघसा मळलं नि ठेवलं बाजूला. कढईत बचकाभर लसणाची फोडणी केली, त्यात पण तिखट मीठ हळद घातलं नि तांब्याभर पाणी ओतलं. उकळी येऊस्त्वर वाट बघावी म्हणलं तर देवळापासच्या येश्वदाबाई आल्या गावभरची धुणी बडवायला. ( ते तुमचं गासिप कि काय तेच ) मग तिंबलेलं पीठ घेतलं न बसले त्यांच्यापुढं. कडबोळ्यासारखे शेंगोळे वळायला तसा वेळ नाही लागत. पण म्हटलं या बाईला मी रिक्कामटेकडी नै वाटू.. ! येश्वदेच्या तोंडच्या पट्ट्यावाणीच भराभरा शेंगोळे वळले. तवर फोडणीच्या पाण्याला आधण आलं होतं. खळ खळ उकळीत एकेक शेंगोळे टाकले. तेवढ्यात १०८ वेळा रामचं नाव पण घेऊन झालं. कामात काम करायचं झालं ! मग येश्वदेला चहा करुस्तोवर शिजले चांगले. बोटानी चेपले तर आतपर्यंत शिजलेले दिसले. हो... मला नै बै उठसुठ तोंडात घालत बसायला आवडत ! मग येश्वदेला खाय म्हणलं तर तिला प्रदोष ! धाकट्याची थोरली बसली होती गप्पा हाणत फोनवर. तिला हलवून बोलावली. म्हणलं ये तुला गावरान पास्ता केलाय. "पास्ता?" म्हणत लेकरु टुण्ण्कन उडी मारून आलं जवळ. अशी माया आली लेकराची...
गुळाचा सुपारीएवढा खडा घेतला न टाकला शेंगोळ्यात. उगाच उकडलेलं खाऊन पोट नको फुगायला. तेवढ्यात खमंग वासानं की काय बाकीची पोरंटोरंही आली. बसली खायला न काय सांगू सगळी कढई १० मिनिटात फस्त की वो...
"अमेझिंग पास्ता आज्जी" ! मला काय ते कळलं नाही. तरी पदर तोंडाला लावून कवतुकानं हसले झालं.
तर आसं झालं. साधं मेलं जवारीचं पीठ. त्याचे थोडे लाड केले की गप पोटात गेलं लेकरायच्या. अशा भाकरी बडवून
खाल्ल्या असत्या व्हय ???
आमच्या सुना कधी असं शिकायच्या रामाला ठावुक ! येते हो आता. दिवेलागणीची वेळ झाली.
( आजी मोड ऑफ)