डेक्कन कॉलेजमध्ये असतांना त्यांची मैत्री आगरकरांबरोबर झाली. दोघेही त्या काळात राष्ट्रप्रेमाने भारलेले होते. ते मिळून युरोपियन लेखकांची राजनीती, अर्थशास्त्र आणि सामाजिक परिवर्तनावरील पुस्तके वाचत आणि त्यावर चर्चा करत. जेव्हा त्यांनी डेक्कन कॉलेज सोडले, तेव्हा त्यांनी दोन निश्वय केले होते. एक म्हणजे सरकारी नोकरी नाही करायची आणि दुसरे म्हणजे आपले जीवन राष्ट्रसेवेसाठी अर्पण करायचे. टिळक आगरकर हे एकेकाळी खूप जवळचे मित्र होते पण देशाला स्वातंत्र्य मिळवण्याच्या मतांतरामुळे दोन परममित्रांमध्ये वादाची दरी उभी राहिली. स्वातंत्र्याआधी समाज सुधारला पाहिजे, तसे झाले तरच स्वातंत्र्याला अर्थ उरेल असे आगरकरांचे मत होते तर समाजसुधारणेला बराच वेळ लागेल, स्वातंत्रासाठी इतके दिवस थांबणे शक्य नाही असे टिळकांचे म्हणणे होते. या वादामुळेच या द्वयीने एकत्र काम करणे सोडलं, मूळच्या गरीब घराण्यातल्या आगरकरांनी प्रचंड दारिद्र्य अनुभवून वयाच्या अवघ्या चाळिशीत देह ठेवला.