बसस्थानकाचा गजबजलेला परिसर. येणारे प्रवासी-जाणारेही प्रवासीच. गाड्यांची ये-जा सुरू आहे. ज्याची गाडी आली तो वेगाने सीट पकडण्यासाठी धावतोय. काही गाडीच्या प्रतिक्षेत आहेत. काही बायाबापड्या चिल्ल्या – पिल्ल्यांना सांभाळून आहेत. स्थानकाच्या आवारात एक शेंगदाणेवाला त्याची टोपली लावून उभा आहे. त्या टोपलीत शेंगदाण्यांसह फुटाणे, सूर्यफुलाच्या बियाही आहेत. एका बाजुला कागदाची पुंगळी आहे (शेंगदाणे देण्यासाठी). दुसऱ्याबाजुला पितळी मापं आहेत. शेंगदाणे गरम रहावेत म्हणून त्यावर एका छोट्या माठात जळती लाकडं ठेवलेली आहेत. माठ गरम झाला की शेंगदाणेही गरम होतात. त्या टोपलीच्या शेजारीच शेंगदाणेवाला उभा आहे.. ग्राहकाच्या प्रतिक्षेत…
इतक्यात बसस्थानकालं, आगारातलं कुणीतरी येतं त्याच्या जवळ उभं राहतं दोन शब्द बोलतं.. बोलत असताना त्याच्या टोपलीतले चार-दोन शेंगदाणे तोंडात टाकतं.. शेंगदाणेवाल्याला न विचारताच… अन आला तसा निघुन जातो. इकडे शेंगदाणेवाल्याच्या मनात विचार चक्र सुरू झालेलं.. अजुन बोहनी (सकाळी पासुन प्रथम विक्री झालेली नाही) झालेली नाही. घरातून निघताना मुलांनी सांगितलेली शाळेची पुस्तकं कशी न्यायची हा त्याच्या समोर प्रश्न होता. कारण सकाळपासुन उभा राहुनही त्याच्या पदरात काहीच पडलेलं नव्हतं. आज चांगले पैसे मिळावे ही त्याची अपेक्षा होती.. पण… इतक्या वेळात एक प्रवासी त्याच्या जवळ आला. ‘शेंगदाणे दे रे.. पाच रुपयाचे’ असे काहीसे तो म्हणाला… शेंगदाणेवाल्यालाही बरे वाटले बोहनी होणार याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर येऊ लागला असतानाच त्याने पाच रुपयाच्या मापाने शेंगदाणे कागदाच्या पुंगळीत टाकले आणि त्या ग्राहकाच्या हाती दिले. त्या ग्राहकाने ५० रुपयाची नोंट काढली. सुट्यांचा प्रश्न निर्माण झाला. कारण शेंगदाणेवाल्याकडे काहीच पैसे नव्हते. त्याची आता सुरवात होत होती. त्याने ग्राहकाला सुटे विचारले तर तो नाही म्हणाला. मग शेंगदाणेवाला टोपली तशीच सोडुन सुटे घेण्यासाठी पलिकडे असलेल्या बुकस्टॉल वाल्याकडे गेला. इतक्या वेळात त्या ग्राहकाने टोपलीतून चार शेंगदाणे घेऊन तोंडात टाकले. त्याच्या जवळ असलेला आणखी एक प्रवासी पुढे झाला… ‘कुठे गेला शेंगदाणेवाला’ म्हणत त्यानेही चार दाणे तोंडात टाकले आणि निघुन गेला. काहीच वेळात तो शेंगदाणेवाला सुटे घेऊन आला होता. त्या ग्राहकाला उर्वरित पैसे त्याने दिले.. तो निघुन गेला. सकाळपासुन उभा राहुन त्याच्या पदरात केवळ पाच रुपये पडले होते… मुलासाठीचं पुस्तक त्याच्या डोळ्यासमोरून जातं नव्हतं..
मध्ये असाच बराच वेळ गेला. एक दोन ग्राहक आले.. त्यांनी शेंगदाणे घेतले.. घेताना चार दोन दाणे तोंडात टाकलेही.. शेंगदाणेवाला हटकु शकत नव्हता कारण त्याला पुस्तकं घ्यायचं होतं.. हटकलं आणि ग्राहक पळालं तर काय करणार… दुपार व्हायला आली होती. तो पर्यंत त्याच्या पदरात वीस रुपये पडले होते. त्याच्या पोटात कावळे ओरडू लागले होते. सकाळी निघतांना बायकोने काहीतरी बांधुन दिलं होतं.. पण ते खायची त्याची इच्छा नव्हती… आणखी थोड्यावेळाने बघु..खायचं असा काहीसा विचार करून तो पुन्हा त्या टोपली शेजारी उभा राहिला. इतक्या वेळात एक एसटी आली. तिच्यातल्या ग्राहकांजवळ जवळ जावे का टोपली घेऊन असा विचार त्याच्या डोक्यात आला. ग्राहक येत नाही तर आपण ग्राहकांपर्यंत जावे असे त्याला वाटत होते. पण टोपलीचे वजन जास्त होतं, ती घेऊन जाणे शक्य नव्हतं. त्याने तोही विचार मागे सारला. तो वाट पाहू लागला ग्राहकाची… मध्येच एक म्हातारी आली.. दोन रुपयाचे शेंगदाणे घ्यायला.. खरं तर दोन रुपयाचे शेंगदाणे किती द्यायचे हा त्याच्या समोर प्रश्न होता.. पण तरीही म्हातारीची दया करून त्याने थोडे शेंगदाणे म्हातारीला दिले होते… दुपार पुढे सरकत होती.. पण त्याच्याकडच्या गल्ल्यात तीस रुपयेही जमा झालेले नव्हते. एकीकडे पोटात भुकेची आग लागलेली तर दुसरीकडे मुलाने सांगितलेलं पुस्तकं कस न्यायचं हा प्रश्न… तिसरीकडे गल्ल्यात केवळ तीस रुपये… शेंगदाण्यांच्यावर ठेवलेल्या छोट्या माठात ठेवलेल्या लाकडांसारखा तो देखील आतुन जळत होता. पण त्याच्या हातात तरी काय होतं. केवळ वाट पाहण्याशिवाय… कुणीतरी सहहृदयी ग्राहक येईल आणि शेंगदाणे खरेदी करेल… त्यातुन पैसे जमा झाले की तो मुलाची अपेक्षा पुणे करू शकणार होता…
असे कितीतरी शेंगदाणेवाले आपल्या अवती-भोवती उभे असतात. उद्यांनाच्या जवळ. चित्रपण थिएटर जवळ, बसस्थानक, रेल्वेस्थानक आणि कितीतरी सार्वजनिक ठिकाणी… त्यांची दखल आपण पाच रुपयांपेक्षा जास्त घेत नाहीत… पण आपल्या पाच-दहा रुपयांनी त्याच्या मुलांच्या स्वप्नांची पुर्तता होणार असते… हे कुणी लक्षात घेतले पाहिजे… इतकी संवेदनशीलता आपल्यांत आता राहिलीय का…!
दिनेश दीक्षित