नेपोलियनला लहान वयांतच ड्रम वाजविणें, तलवार फिरविणे वगैरे खेळांची आवड असे व त्याचा वडील भाऊ जोसेफ हा सौम्य स्वभावाचा होता. या फरकामुळें थोरल्याला भिक्षुकी धंद्यात (चर्च) व दुसर्याला म्हणजे नेपोलियनला शिपाईगिरींत घालण्याचें बापानें ठरविलें. नेपोलियनचा बाप चैनी व खर्चिक होता व त्याला दारूचें व्यसनहि जास्त जडत गेलें. त्यामुळें कर्ज झालें, व कुटुंबाला कठिण काळ आला. तथापि नेपोलियनची आई मॅडम मेरिया मोठी धीराची बाई होती. तिनें मुलांची चांगली काळजी घेऊन त्यांनां कडक शिस्त लावली. नेपोलियन फार व्रात्य असल्यमुळें त्याच्यावर तिला फार लक्ष द्यावें लागे. नऊ वर्षांचा होईपर्यंत कॉर्सिका येथें शिक्षण झाल्यावर नेपोलियनला त्याच्या बापानें फ्रान्समध्यें आणून तेथीलं शाळेंत चार महिने ठेवून नंतर ब्रीन येथील लष्करी शाळेंत घातलें. या शाळेंत फ्रेंच, लॅटिन वगैरे भाषा आणि इतिहास, भूगोल, गणित व शिवाय नर्तन, गायन, वादन, चित्रकला वगैरे विषय शिकवित. शाळेवर देखरेख व शिस्त धर्मगुरूंची असे, व शाळेची कीर्ति चांगली नव्हती. शाळेंत नेपोलियन इतरांशीं मिसळत नसे. त्याचा अभ्यास बरा असे. त्या वेळच्या त्याच्या चोपड्या अद्याप आहेत. त्यावरून तो फार पुस्तकें वाची व त्यांचा गोषवारा काढी असें दिसतें. गणितांत त्याची मति विशेष चाले, इतिहास व विशेषत: फ्लुटार्ककृत चरित्रें त्याला फार आवडत असत. ब्रीन येथील अभ्यासक्रम संपल्यावर १७८४ सालीं पॅरिस येथील ‘ईकोल मिलिटेयर’ नांवाच्या लष्करी शाळेंत तो गेला. तोफखान्यांत जागा मिळावी म्हणून त्यानें चांगला अभ्यास केला. तथापि त्याला फ्रेंच भाषा शुद्ध लिहितां येत नव्हती व अक्षरहि फार वाईट होतें, त्यामुळें त्याचा नंबर परीक्षेंत वर आला नाही. कविता करण्याचा नादहि त्याला तेव्हापासून होता.