एषा बुद्धिमतां बुद्धिर्मनीषा च मनीषिणाम् ।

यत्सत्यमनृतेनेह, मर्त्येनाप्नोति मामृतम् ॥२२॥

अंतरीं विषयांची आसक्ती । वरीवरी ब्रह्मार्पण म्हणती।

ते ठकिले बहुतां अर्थीं । तेंचि श्रीपती सांगत ॥९८॥

एक बुद्धिमंत होती । ते निजबुद्धी घेऊन हातीं ।

शेखीं लागले विषयस्वार्थीं । ते ठकिले निश्चितीं देहममता ॥९९॥

एकाची बुद्धि अतिचोखडी । वेदशास्त्रार्थी व्युत्पत्ति गाढी ।

ते अभिमानें कडोविकडी । ठकिले पडिपाडीं ज्ञानगर्वें ॥४००॥

बुद्धिमंत अभ्यासी जन । अभ्यासें साधिती प्राणापान ।

ते योगदुर्गीं रिघतां जाण । ठकिले संपूर्ण भोगसिद्धीं ॥१॥

एक मानिती कर्म श्रेष्ठ । वाढविती कर्मकचाट ।

विधिनिषेधीं रुंधिली वाट । बुडाले कर्मठ कर्मामाजीं ॥२॥

यापरी नानाव्युत्पत्ती । करितां ठकले नेणों किती ।

तैसी नव्हे माझी भक्ती । सभाग्य पावती निजभाग्यें ॥३॥

माझें सर्वभूतीं ज्यासीं भजन । त्याचे बुद्धीची बुद्धी मी आपण ।

ते तूं बुद्धी म्हणसी कोण । कर्म ब्रह्मार्पण ’महाबुद्धी’॥४॥

सर्वभूतीं माझें भजन । सर्व कर्म मदर्पण ।

हे बुद्धीचि ’महाबुद्धि’ जाण । येणें ब्रह्म परिपूर्ण स्वयें होती ॥५॥

चतुरांचें चातुर्य गहन । या नांव बोलिजे गा आपण ।

मिथ्या देहें करुनि भजन । ब्रह्म सनातन स्वयें होती ॥६॥

आधीं मायाचि तंव वावो । मायाकल्पित मिथ्या देहो ।

तें देहकर्म मज अर्पितां पहा हो । ब्रह्म स्वयमेवो स्वयें होती ॥७॥

मिथ्या देहाचेनि भजनें । सत्य परब्रह्म स्वयें होणें ।

जेवीं कोंडा देऊनि आपणें । कणांची घेणें महाराशी ॥८॥

देतां फुटकी कांचवटी । चिंतामणी जोडे गांठीं ।

कां इटेच्या साटोवाटीं । जोडे उठाउठीं अव्हाशंख ॥९॥

तेवीं मिथ्या देहींचें कर्माचरण । जेणें जीवासी दृढ बंधन ।

तें कर्म करितां मदर्पण । ब्रह्म परिपूर्ण स्वयें होती ॥४१०॥

अनित्य देहाचियासाठीं । नित्यवस्तूसी पडे मिठी ।

हेचि बुद्धिमतीं बुद्धि मोठी । ’ज्ञानाची संतुष्टी’ या नांव म्हणिपे ॥११॥

निष्टंकित परमार्थ । स्वमुखें बोलिला श्रीकृष्णनाथ ।

तो कळसा आणोनियां ग्रंथ। उपसंहारार्थ सांगतु ॥१२॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please login to comment. Click here.

It is quick and simple! Signing up will also enable you to write and publish your own books.

Please join our telegram group for more such stories and updates.

Books related to श्री वेंकटेश विजय


श्री वेंकटेश विजय