अज्ञातवास संपल्यावर पांडवांतर्फे द्रुपदाचा पुरोहित कौरवांकडे आला व त्याने राज्याची मागणी केली. ती दुर्योधनाने नाकारली. भीष्माने पुरोहिताला सांगितले कीं आम्ही विचार करून काय तो जबाब कळवू. पांडवांची मागणी मान्य केलीच पाहिजे असा आग्रह भीष्माने धरला नाहीं. मागणी नाकारली गेली. कटु सवाल जबाबांनंतर अखेरचा प्रयत्न म्हणून पांडवांतर्फे कृष्ण कौरवदरबारांत शिष्टाईला आला. पांडवांचा, अज्ञातवास पुरा केल्याचा दावा वादग्रस्त आहे हें ओळखून, कृष्णाने त्यावर मुळीच भर न देतां शम हा दोन्ही पक्षांना कसा हितावह आहे यावरच जोर दिला. दुर्योधनाने पांडवांचा दावा सपशेल फेटाळून लावला व ’युद्धाला भिऊन मी राज्य देणार नाहीं’ असे म्हटलें. यावर भीष्मद्रोणांनी ’तूं असा आडमुठेपणा केलास तर आम्ही तुझी बाजू घेणार नाहीं, युद्धापासून अलिप्त राहूं’ असे त्याला बजावले नाहीं. पांडवांचे मुख्य समर्थक द्रुपद व पांचालराजपुत्र असल्यामुळे द्रोणाला त्यांच्याशीं युद्धाची खुमखुमी असणे समजूं शकतें पण भीष्माने अशी धमकी दिली असती तर जन्मभर भीष्माच्या हो ला हो करणार्‍या द्रोणालाहि स्वस्थ बसावें लागले असते. भीष्माने असे कांही केले नाहीं. पांडवांचा अज्ञातवास पुरा केल्याचा दावा त्यालाहि मान्य नव्हता काय? त्याने तसेंहि म्हटलेले नाहीं! दुर्योधन अजिबात बधत नाही असे दिसल्यावर कृष्णाने अखेर धृतराष्ट्र, भीष्म व इतरांना बजावलें कीं कुलक्षय टाळण्यासाठी तुम्ही दुर्योधनाला आवरा. तसे केलेत तर पांडवांना मी आवरीन.’ कोणीहि काही केले नाही. एव्हांना दुर्योधनाला ठामपणे विरोध करण्याचे बळ वा इच्छाशक्ति भीष्म वा इतर कोणातहि उरली नव्हती. शिष्टाई असफल होऊन कृष्ण परत गेला व कार्तिक प्रतिपदेपासून युद्ध सुरू करूं असा कर्णातर्फे त्याने कौरवांना निरोप दिला. युद्ध आतां अटळ होतें.
भीष्माने या अटीतटीच्या वेळीदेखील कौरवपक्ष सोडून पांडवांची बाजू घेण्याचा विचारहि केलेला दिसत नाही. त्याने अजूनहि तसा धाक दुर्योधनाला घातला असता तर द्रोण, कृप, अश्वत्थामा यांनी काय केले असते, दुर्योधनाने काय केले असते, हे तर्क निष्फळ आहेत. कौरवांचे दुर्योधनाने देऊं केलेले सेनापतिपद भीष्माने खळखळ न करतां स्वीकारलें. फक्त एकच अट घातली कीं ’एकतर कर्ण किंवा मी, एकच कोणीतरी लढेल’. यात मात्र एक गोष्ट दिसून येते कीं युद्धावर नियंत्रण ठेवण्याचा त्याचा हेतु असावा. आततायी व पांडवाचा दीर्घद्वेष करणार्‍या कर्णाला ’अर्धरथी’ ठरवण्यामागे आणि अशी अट घालण्यामागे कर्णाने युद्धापासून दूर रहावें हाच भीष्माचा हेतु होता तो अचूक सफळ झाला. ’भीष्म जिवंत असेपर्यंत मी युद्धात भाग घेणार नाही कारण मी कितीहि पराक्रम केला तरी विजयाचे श्रेय सेनापति या नात्याने भीष्मालाच मिळेल. भीष्माच्या मृत्यूनंतरच मी युद्धाला उभा राहीन.’ असे त्याने दुर्योधनाला म्हटले. ज्याच्यावर दुर्योधनाचा भरवसा होता त्या कर्णानेच एक प्रकारे त्याला दगा दिला! कर्णासाठी भीष्माला बाजूला सारण्याचे धैर्य दुर्योधनाला झाले नाही. ’मी रोज १०,००० सैन्य मारीन पण एकाहि पांडवाला मारणार नाही’ हेहि भीष्माने दुर्योधनाला प्रथमच सांगून टाकलें. यावरून माझा तर्क असा कीं सर्व राजे व प्रचंड सैन्य जमलें आहे तेव्हां थोडेंफार युद्ध अटळच आहे तर तें जमेल तितके नियंत्रणाखालीं ठेवलें तर निदान कुलक्षय टळेल असा भीष्माचा प्रयत्न दिसतो. त्याच्या सेनापतित्वाखाली पहिले दहा दिवस युद्ध झाले तोंवर धर्मयुद्धाचे त्यानेच घालून दिलेले नियम सर्रास मोडले जात नव्हते. जरी सैन्याचा व कित्येक वीरांचा मृत्यु झाला होता तरी कौरव व पांडवांपैकी कोणीहि मेले नव्हते. त्यामुळे भीष्माचा हेतु साध्य झाला होता असे म्हटले पाहिजे. युद्धामध्ये भीष्माला कोणीहि रोखूं शकत नव्हतें. तो फार अनावर झाला म्हणजे नाइलाजाने अर्जुनालाच त्याचेशीं लढावे लागत होते. अंबेने ज्या शिखंडी रूपाने पुनर्जन्म घेतला होता त्याचेशी युद्ध करण्याचे भीष्म नाकारत राहिला कारण शिखंडी प्रथम स्त्री म्हणून जन्माला आला होता. मात्र शिखंडीचे हातून भीष्म मेला असे महाभारत मुळीच म्हणत नाही. त्याचे आड राहून अर्जुनाने भीष्माशी युद्ध केले असेहि महाभारत म्हणत नाही. युद्धाच्या दहाव्या दिवशीं अर्जुनाचेच प्रखर बाण लागून अखेर भीष्म शरपंजरीं पडल्यावर ’आतांतरी युद्ध पुरे करा’ असें त्याने दोन्ही पक्षांना सांगितले पण आतां फार उशीर झाला होता. कुलक्षय व्हायचा टळला नाहीं. उत्तरायण लागेपर्यंत भीष्म शरपंजरी जीव धरून होता. त्यामुळे युद्धाचा भीषण शेवट त्याला मृत्यूपूर्वी ऐकावा लागला.
भीष्मचरित्राचा आढावा घेतल्यावर त्याच्या वागण्याचा कित्येक वेळां उलगडा होत नाहीं असेंच म्हणावे लागते. ज्या कुरुकुळाच्या वाढीसाठी तो कौरव-पांडवांच्या जन्मापर्यंत आपल्यापरीने झटला त्या कुळातील दुर्योधनाचे अनाचार तो थांबवू शकला नाही. तसा निकराचा प्रयत्नहि त्याने केलेला दिसत नाही. परिणामी कुरुकुळाचा क्षयच त्याला अखेर पहावा लागला. भीष्मप्रतिज्ञा एकप्रकारे विफल झाली असें म्हणावे लागते. मात्र प्रतिज्ञापालनाचा एक उज्वल आदर्श त्याने उभा केला हे खरे.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel