महर्षी भृगु यांचा पुत्र ऋचिक याचा विवाह राजा गाधी याची कन्या सत्यवती हिच्याशी झाला होता. विवाहानंतर सत्यवतीने महर्षी भृगु यांच्याकडे स्वतःसाठी आणि आपल्या मातेसाठी पुत्राची याचना केली. तेव्हा महर्षी भृगुंनी सत्यवतीला २ फळे दिली आणि सांगितले की ऋतू स्नानानंतर तू उंबराच्या झाडाला आलिंगन दिल्यावर आणि तुझ्या मातेने पिंपळाच्या झाडाला आलिंगन दिल्यावर हे फळ खा.
परंतु सत्यवती आणि तिच्या मातेने विसरून या कामात चूक केली. ही गोष्ट महर्षी भृगुना समजली. तेव्हा त्यांनी सत्यवतीला सांगितले की तू चुकीच्या झाडाला आलिंगन दिले आहेस. म्हणूनच तुझा पुत्र ब्राम्हण असूनही क्षत्रियांचे गुण घेऊन जन्माला येईल आणि तुझ्या मातेचा पुत्र क्षत्रिय असूनही ब्राम्हणाप्रमाणे आचरण करेल.
तेव्हा सत्यवतीने महर्षी भृगु यांच्याकडे प्रार्थना केली की माझा पुत्र क्षत्रिय गुणांचा नसूदे, हवे तर माझा नातू तसा झाला तरी चालेल. तेव्हा महर्षी भृगुंनी सांगितले की असेच होईल. काही काळानंतर जमदग्नी मुनींनी सत्यवतीच्या गर्भातून जन्म घेतला. त्यांचे आचरण ऋषी प्रमाणेच होते. त्यांचा विवाह रेणुकाशी झाला. जमदग्नी ऋषींना ४ पुत्र झाले. त्यांच्यापैकी परशुराम हे चौथे. अशा प्रकारे एका चुकीमुळे भगवान परशुरामाचा स्वभाव क्षत्रियांप्रमाणे झाला.