भीष्मांनी मद्र देशाच्या राजकन्येला का घातली मागणी?
कुंतीनं दिलेल्या वराचा वापर करताना माद्रीनं काय चातुर्य दाखवलं?
माद्रीनं पांडूसोबत सहगमनाचा निर्णय का घेतला?
माद्रीचा भाऊ शल्याचं महाभारतातलं योगदान काय आहे?
अंकिता आपटे
मद्र देशाची राजकन्या, म्हणून हिचं नाव ‘माद्री’. माद्रीच्या सौंदर्याची कीर्ती भीष्मांच्या कानावर आली आणि त्यांनी पांडूसाठी तिला मागणी घातली. महाभारत आपल्याला सांगतं, की तिच्या वडलांना भरपूर धन देऊन त्यांनी तिला शब्दश: विकत घेतलं आणि पांडूची पत्नी, कुंतीची सवत म्हणून माद्री आली. सवती आणि मत्सर हे समीकरण मात्र या दोघींना कधीच शिवलं नाही. पांडूचं त्या दोघींवरही प्रेम होतं आणि त्या दोघींचं नातंही मोठं प्रगल्भ होतं. स्त्रीशी जवळीक साधल्यास मृत्यू होण्याचा शाप पांडूला मिळाल्यानंतर हे तिघे वनात राहू लागले. माद्री कुंतीइतकी कर्तृत्ववान नसली, तरीही या त्रिकोणी कुटुंबाचा एक महत्त्वाचा कोन होती.
पांडूनं जेव्हा पितृऋण फेडण्यासाठी नियोगातून संतती निर्माण करण्याचा विचार कुंतीला बोलून दाखवला, तेव्हा तिनं आपल्याला मिळालेल्या वराबद्दल पांडूला सांगितलं आणि त्याच्या संमतीनं धर्म, इंद्र आणि वायू अशा तीन देवतांना पाचारण केलं. त्यांच्यापासून कुंतीला युधिष्ठीर, अर्जुन आणि भीम असे तीन पुत्र झाले. तिची कूस भरलेली पाहून माद्रीलाही मातृत्त्वाची ओढ वाटू लागली. तिनं पांडूकरवी शिल्लक राहिलेला एक वर कुंतीकडून मिळवला. इथं माद्रीचं चातुर्य आपल्याला दिसतं. तिनं अश्विनी आणि कुमार या द्वंद्वदेवतांना पाचारण केलं आणि तिला जुळी मुलं झाली. माद्रीनं आपल्याला फसवलं, असंही काही काळ कुंतीला वाटलं; पण यामुळे त्यांच्या नात्यावर फारसा परिणाम झालेला दिसत नाही.
एके दिवशी माद्री पांडूसोबत वनात गेली. पांढरीशुभ्र वस्त्रं परिधान केलेल्या सौंदर्यवती माद्रीकडे पाहून पांडूला मोह अनावर झाला. या कृत्याच्या परिणामांची कल्पना दोघांनाही होती; पण माद्रीनं वारंवार त्याला दूर लोटूनही पांडू मागे हटला नाही आणि तिच्याशी संग केल्यानंतर लगेचच त्याला मिळालेला शाप खरा ठरला आणि तो मृत्यूमुखी पडला. ही भयंकर बातमी कुंतीला पोचवण्याची दुर्दैवी जबाबदारी माद्रीनंच पार पाडली. पांडूचे अंत्यसंस्कार झाले, त्या वेळी या दोघींनीही सहगमन करण्याची तयारी दाखवली; पण शेवटी सहगमन केलं, ते माद्रीनं.
माद्रीचा पाठीराखा म्हणून तिचा भाऊ शल्य तिच्यासोबत आला. नंतर कुरुक्षेत्राच्या युद्धात तो कौरवांच्या बाजूने लढला, कर्णाच्या रथाचं सारथ्य त्यानं केलं; पण त्याचा कल मात्र पांडवांच्याच बाजूने होता. कर्णासोबत असताना त्याचा बुद्धिभेद करण्याचं काम शल्यानं केलं आणि त्याचा मनोभंग केला.
माद्री महाभारतात तुलनेनं फारच कमी वेळासाठी आपल्याला दिसते. तिनं काही मोठं कर्तृत्व गाजवल्याचं किंवा महत्त्वाचं कार्य केल्याचे उल्लेखही नाहीत; पण तिचं शांत, संयत सौंदर्य मात्र सतत दिसत राहतं.