आणि एक दहावे सांगतो. राष्ट्राचे हृदय एक व्हायला हवे असेल तर तशी एक भाषाही हवी. आपल्या प्रांतीय भाषा असल्या तरी त्या ठेवून सर्वव्यापक अशी हिंदी भाषाही घ्या ते म्हणाले. त्यांनीच दक्षिणेकडे आधी हिंदी प्रचार सुरू केला. ते एकच कार्य किती महान आहे! ते अशी हिंदी बोला सांगत होते की जी सर्वांना समजेल. ती नको केवळ संस्कृतनिष्ठ, नको केवळ फारशी. ती जनतेची करा. परंतु आमच्या अहंकारी लोकांचा येथही विरोध! गांधीजी उर्दू लिपीही शिका सांगत. तीनचार कोटी मुसलमानांची लिपी शिकणे कर्तव्यच आहे. परंतु एवढेच नाही. आपल्या पश्चिमेकडे सारी मुस्लिम राष्ट्रे आहेत. एक तुर्कस्तान वगळले तर सर्वांची एकच लिपी तुम्हाला अभ्यासावीच लागेल. त्या राष्ट्राचे राजकारण, इतिहास, सारी चळवळ कशी कळणार? इंग्रजी वृत्तपत्रे नि मासिके यांजवरून ?ती ती राष्ट्रे आपल्या दृष्टिकोनातून लिहिणार. तुम्हाला आशियातील राष्ट्रांचा संघ उद्या करावयाचा असेल तर उर्दू शिकण्यावाचून गत्यंतर राहणार नाही. महात्माजींची दूरदृष्टी संकुचित दृष्टी घेणा-या आमच्या पुढा-यांनाही समजत नाही, मग इतरांची कथा काय ?

महात्माजी नौखालीत गेले तर हातात बंगाली क्रमिक पुस्तके असत. तामिळ त्यांना थोडे येई. मराठी येरवडयास मनाच्या श्लोकांवरून शिकले. ते मूर्तिमंत भारत होते. भारतातील कोटयवधि बंधूच्या जीवनाशी एकरूप व्हायचा अनुभव घेऊ पाहाणारे, घेणारे होते. भारताचे दोन तुकडे झाले तरी या दोन्ही देहांत मला प्रेमस्नेहाचे एक मन निर्माण करू दे म्हणून अखेर अखेर तडफडत होते. इकडे शांत रहा. मी  पाकिस्तानात जातो असे सारखे म्हणत! केवढा महापुरुष, राष्टाचा तात!  देवाची देणगी आपल्याला मिळाली होती. देवाने नेली. परंतु त्यांची शिकवण आहे. अनेकांगी व्यापक शिकवण. सारे जीवन अन्तर्बाह्य करणारी शिकवण. रामदासस्वामी मरतांना म्हणाले,' मी दासबोधात आहे. दु:ख करू नका! 'महात्माजी १९३१ मध्ये कराचीस म्हणाले होते, 'माझी मुठभर हाडे तुम्ही तेव्हाच चिरडू शकाल. परंतु ज्या तत्त्वांसाठी माझे जीवन आहे. ती अमर आहेत.' महात्माजींची शिकवण अमर आहे, म्हणून तेही अमर आहेत. प्रणाम राष्ट्राच्या पित्याला, थोर बापूंना. त्यांच्या शिकवणीप्रमाणे आमची धडपड चालो.

साधना : आक्टोबर २, १९४८

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel