( ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा)

~प्रतीक~

माझे सर्व शिक्षण पुण्यात झाले.माझे आईवडील  बहीण भाऊ सर्व पुण्यात राहतात.बहीण माझ्याहून मोठी आहे.मला एक लहान बहीण होती.ती माझी खूप आवडती होती. तापाचे निमित्त होऊन दुर्दैवाने ती आम्हाला सोडून गेली.आता फक्त तिच्या स्मृती राहिल्या आहेत.

मी स्टेट बँकेची परीक्षा पास झालो. पुण्यामध्ये ट्रेनिंग पूर्ण झाल्यावर ऑफिसर म्हणून मला बँकेत नोकरी मिळाली.स्टेट बँकेच्या पुण्यातीलच एखाद्या शाखेत मला नोकरी मिळावी म्हणून खटपट केली.परंतु शेवटी माझी या शहरात नेमणूक झाली.येथे माझे कुणीही नातेवाईक नाहीत. एका अर्थी झाले ते बरेच झाले.घरापासून दूर गेल्यावर अनेक अनुभव पदरी पडतात. मनुष्य जास्त चौकस ,सावध,चतुर, जगाला तोंड देण्यास जास्त समर्थ होतो, असे मला वाटते.येथे आल्या आल्या मी स्टेट बँकेच्या गेस्ट हाऊसमध्ये उतरलो.तिथे मला जास्तीत जास्त आठ दहा दिवस राहता येणार होते.स्टेट बँकेला गेस्ट हाऊस नको असेल तर आणखीही कांही दिवस मी राहू शकलो असतो.परंतु कांही ना कांही कारणाने स्टेट बँकेला गेस्ट हाऊसची गरज भासतेच.मला माझा पडाव कुठेतरी दुसरीकडे टाकणे आवश्यक होते.

एक छानपैकी लॉजिंग बोर्डिंगची सोय पाहून मी तिथे राहायला गेलो. हे हॉटेल जरा जास्त खर्चिक होते.येथील जेवणही महाग होते.जास्त चविष्ट व चौरसही होते. सामान्य हॉटेलच्या  मानाने इथे जवळजवळ दुप्पट खर्च येत होता.मला पहिल्यापासून जरा आरामशीर रहाण्याची सवय आहे.मला पैसे साठवायचे नव्हते. कुणाला पाठवायचेही नव्हते.माझा  खर्च पाहून सहकारी स्तिमित होत असत. माझ्यासारखे जे सडाफटिंग राहत होते त्यांच्यापेक्षा माझा खर्च दुप्पट होता.  हे लॉजिंग बोर्डिंग कितीही चांगले असले तरी इथे कायमचे राहणे मला पटत नव्हते.आपण कुठेतरी जागा भाड्याने किंवा विकत  घेऊन राहिलो तर शेजाऱ्यापाजाऱ्यांशी ओळख होते. आपुलकीचे संबंध निर्माण होतात.कांही ना कांही प्रमाणात कौटुंबिक वातावरण निर्माण होते. सलोखा असतो. धुसफूस असते. हेवेदावे असतात.भांडणेही कांही कांही वेळा असतात .एकत्र मोठ्या कुटुंबात हे सगळे असतेच की !    

हॉटेलात परिस्थिती निराळी असते.नोकर मालक एवढेच स्थिर असतात.बाकी लोक येत असतात जात असतात.व्यापारी, बाजारी वातावरण असते.हॉटेलात अल्पकाळ जरी चांगले वाटले तरी दीर्घकाळ राहाण्यासाठी हॉटेल ही काही सुखदायी जागा नाही असे माझे मत आहे.मी राहण्यासाठी भाडयाने मिळाली तर एखादी जागा पाहात होतो.शेवटी एक दिवस फिरत असताना मला जागा भाड्याने देणे आहे अशी पाटी दिसली.मी लगेच मालकांना जाऊन भेटलो.डिपॉझिट व तीन महिन्यांचे भाडे भरून मी जागा ताब्यात घेतली.कुलूप लावूनच मी लॉजवर परत आलो.दुसऱ्या दिवशी मी त्या जागेत राहण्यासाठी गेलो. चांगली जागा मिळणे ही एक योगायोगाची गोष्ट आहे.प्रयत्न करूनही कित्येक वेळा चांगली जागा मिळत नाही.ही  जागा एक छोटासा ब्लॉक होता.वन रूम किचन सेल्फ कंटेंड ब्लॉक होता.सडाफटिंग असल्यामुळे मला एवढी जागा पुरेशी होती.पुण्याहून कुणी ना कुणी  प्रतीक कसा राहतो कुठे राहतो काय खातो पितो हे पाहण्यासाठी आलेच असते.अधूनमधून माझी आई किंवा बहीण येऊन राहिली असती.मला खायला व्यवस्थित मिळावे.माझी आबाळ होऊ नये.या उदात्त हेतूने ही दोघे आली असती.भाडय़ाने कां होईना मी छोटीशी जागा घेतली आहे हे कळल्यावर या दोघींचाही आनंद गगनात मावत नव्हता.फोनवरील  त्यांच्या उत्साहित बोलण्यावरून ते कळत होते.त्यांना आल्यावर या जागेत सहज सामावून घेता आले असते.अर्थात पुण्याहून कायमचे राहण्यासाठी इथे कुणी येण्याचा संभव नव्हता.हा भाग अलाहिदा.

~कुमुद~

बाबांनी ही जागा घेऊन येथे चार मजली घर बांधले.तळमजल्यावर पार्किंग आहे.पहिला मजला संपूर्णपणे आमच्याकडे आहे.त्यांत एक छोटासा वन रूम किचनचा ब्लॉक आहे. वरील तीन मजल्यावर प्रत्येकी दोन दोन असे एकूण सहा ब्लॉक आहेत.सर्व ब्लॉक थ्री बीएचके चे आहेत.आमच्या मजल्यावर वन रूम किचनचा एक ब्लॉक आहे. संपूर्ण मजला आपल्याकडे ठेवल्यास आपल्याला कुणाचीच सोबत राहणार नाही असा हेतू कदाचित त्यामागे असावा.एखादे कुटूंब घरकामासाठी आपल्याकडे ठेवल्यास,त्यांची राहण्याची सोय व्हावी असाही कदाचित हेतू असावा.तूर्त घरकामासाठी कुणीही कुटुंब या जागेत ठेवलेले नाही.स्वयंपाकीण, घरकामासाठी नोकर,अगोदरचेच आहेत.ते त्यांच्या घरूनच येतात.

आईजवळ विचार विनिमय करून बाबांनी हा ब्लॉक शेवटी भाड्याने द्यायचे ठरविले.बाबांनी जागा भाड्याने देणे आहे अशी पाटी लावली.त्याच दिवशी काही तासातच संध्याकाळी  एक देखणा मुलगा बाबांकडे चौकशी करायला आला. त्यावेळी मी तिथे होते.त्याला पाहताच याला बाबांनी जागा दिली तर चांगले होईल असा विचार माझ्या मनात आला.माझ्या विचाराचे माझे मलाच हसू आले.मला तो तरुण आवडला होता.बघितल्या बरोबर एखाद्याबद्दल चांगले मत होते तर एखाद्याबद्दल चांगले मत होत नाही.याला कारण असे कांहीच नसते.त्याच्याबद्दल माझे मत चांगले झाले होते.खोटे कशाला बोलू या तरुणाने माझ्या हृदयात नकळत घर केले होते.आता त्याला मी रोजच पहाणार होते. आमची रोजच भेट होणार होती.आणखी भविष्यात काय काय लिहिले होते ते देवच जाणे.

हा तरुण स्टेट बँकेत ऑफिसर होता. तो बाबांशी बोलत असताना मी तिथेच होते.त्याची शाखा सकाळी नऊला सुरू होत असे.सकाळी उठल्यावर आन्हिक( व्यायाम अासने प्राणायाम इ ) उरकून तो लगेच बँकेत पळत असे.खोल्या झाडणे, पुसणे, व्यवस्थित लावणे, इत्यादीसाठी मोलकरीण येईल त्या वेळी तो घरात असणे शक्य नव्हते.त्याने बाबांकडे येऊन विनंती केली.मी किल्ली तुमच्याकडे ठेवीन.तुमची मोलकरीण आमच्याकडे काम करूदे.नंतर ती ब्लॉक बंद करून तुमच्याकडे किल्ली देईल.तुम्ही तिच्यावर लक्ष ठेवाल का?बाबांनी होकार दिला.

माझे कॉलेज दुपारी बारा वाजता असते.सकाळी मोलकरीण तिथे काम करीत असताना मी अभ्यास करीत किंवा एखादे पुस्तक वाचत तिथे बसत असे.प्रतीक आमच्या इथे शेजारी राहायला आला यामागे काहीतरी परमेश्वरी योगायोग असावा  याबद्दल माझी खात्री आहे.

~संगीता~  

माझ्या घरची परिस्थिती गरिबीची असल्यामुळे मला इच्छा असूनही कॉलेज करता आले नाही.मी बाहेरून परीक्षेला बसणार आहे.वडिलांची प्रकृती बरी नसते.त्यामुळे फॅक्टरीत त्यांच्या  कितीतरी रजा होतात. आर्थिक  कारणासाठी मला नोकरी करणे क्रमप्राप्त होते.नोकरी शोधीत असताना मला या नामांकित बुक डेपोमध्ये नोकरी लागली.येथे सर्व प्रकारची इंग्रजी हिंदी मराठी पुस्तके मिळतात.कादंबऱ्या, नाटके, लघुकथासंग्रह, धार्मिक ग्रंथ, वैचारिक पुस्तके, शालेय पुस्तके, इत्यादी सर्व प्रकारची पुस्तके आहेत.

पुस्तक दुकानात एकूण दहा विभाग आहेत.त्यातील सहा मराठी दोन इंग्रजी व दोन हिंदी.पुस्तकांचे व्यवस्थित वर्गीकरण केलेले आहे.प्रत्येक विभागात लेबल लावलेली आहेत .संगणकात पुस्तकांची नावे ,विभाग, रॅक, कप्पा, या सर्वांची नोंद केलेली असते.एखाद्याने एखादे पुस्तक मागितल्यास संगणकावर आहे की नाही व कुठे आहे ते बघून लगेच तिथे जाऊन पुस्तक काढून आणता येते.संगणकावर नोंदी करण्याचे काम मी करते.पुस्तक काढून आणून देण्यासाठी एक स्वतंत्र कर्मचारी आहे.ग्राहकाने पुस्तक मागितल्याबरोबर ते आहे की नाही हे मला संगणकावर कळते.असल्यास लगेच त्याला ते देता येते.कोणती पुस्तके आहेत, कोणती पुस्तके नाहीत, कोणती मागवायला हवीत,याची रोजच्या रोज मला यादी करून द्यावी लागते.त्याप्रमाणे ऑर्डर देऊन पुस्तके आणली जातात.

आमच्या बुक डेपोमध्ये आणखी एक व्यवस्था आहे.कोणते पुस्तक खरेदी करावे याची काही वेळा अगोदर ग्राहकाला कल्पना नसते.संभाव्य ग्राहक आवडीनुसार  विशिष्ट विभागात जाऊन, पुस्तके चाळून पुस्तक खरेदी करावे की न करावे हे ठरवू शकतो.त्यासाठी कांही टेबल खुर्च्या टाकून वाचत बसण्याची व्यवस्था केलेली आहे.मात्र एखाद्याला अर्धा तासापेक्षा जास्त वेळ तिथे बसता येत नाही.नाहीतर संपूर्ण पुस्तक वाचत मला पुस्तक नको असे सांगून  ते रॅकवर ठेवून संभाव्य ग्राहक निघून जायचा.ही लायब्ररी नाही. बुक डेपो आहे.पुस्तके पाहिली म्हणजे कांहीतरी खरेदी केलीच पाहिजे अशी कोणतीही अट नाही.  

संध्याकाळ झाली होती.एक तरुण मुलगा आमच्या बुक डेपोत आला.त्याला पुस्तके चाळून एखादा लघुकथा संग्रह   खरेदी करायचा होता.त्याला मी लघुकथा विभाग दाखविला तो तिथे पुस्तके पाहू लागला.त्याने एक पुस्तक निवडले. पावती तयार करताना मी त्याला त्याचे नाव विचारले.त्याने त्याचे नाव प्रतीक केळकर म्हणून सांगितले.मी त्याला ते पुस्तक एका बॅगमध्ये टाकून दिले.रोज अनेक ग्राहक येतात व जातात.त्यांना सेवा देणे हा माझ्या कामाचा भागच आहे.असे असले तरी हा तरूण मला थोडा वेगळाच वाटला.कुठेतरी तो तरुण माझ्या लक्षात राहिला.कुठेही रस्त्यात पाहिला असता तरी त्याला मी प्रतीक केळकर म्हणून ओळखले असते.      

~प्रतीक~ 

मला वाचनाची खूप आवड आहे.मला पुस्तके विकत घेऊन संग्रही ठेवायला आवडतात.मला वाटेल तेव्हा मी कोणतेही पुस्तक घेवून त्यांतील हवा असलेला भाग पुन्हा वाचू शकतो.पुस्तक खरेदी व पुस्तकसंग्रह ही माझी हॉबी आहे.माझ्याकडून वाचण्यासाठी मित्र पुस्तके नेतातही. येथे मोठा बुक डेपो कुठे आहे म्हणून मी बँकेत चौकशी केली.मला पत्ता मिळताच मी तेथे गेलो.तेथील शिस्त, व्यवस्था, स्वच्छता, टापटीप,मला आवडली.विशेषतः पुस्तक चाळून खरेदी करावे की न करावे हा निर्णय घेण्याची सुविधा मला फार आवडली .या डेपोत माझे वारंवार जाणे होणार.कर्मचारी नम्र व हसतमुख होते.मी एक लघुकथा संग्रह खरेदी केला. तेथे काम करणार्‍या मुलीच्या टेबलावर तिच्या नावाची पाटी होती.

*संगीता(त्या मुलीचे नाव)

हसतमुख होती .तिचे हास्य मोहक होते.*

*तिचे व्यक्तिमत्त्व मनावर गारुड करणारे होते. तिने माझ्या मनावर गारुड केले.*  

*कदाचित तो तिच्या कामाचा भाग असेल.*

*ती मुलगी माझ्या मनात भरली एवढे मात्र खरे.*

*तिला पाहण्यासाठी, तिला भेटण्यासाठी, तिच्याशी बोलण्यासाठी, त्या दुकानात वारंवार जावे असे मला आंतून वाटले.*

*त्या दुकानात जाण्यासाठी मला आणखी एक कारण सापडले.*

* त्या मुलीबद्दल सॉफ्ट कॉर्नर,एक स्वतंत्र मृदु कप्पा माझ्या मनात निर्माण झाला.*

(क्रमशः)

१९/५/२०२१©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel