सकाळी भगवान् सूर्यनारायण अंगणात येऊन उभे राहतात. त्यांना का गलिच्छ अंगणात उभे करावयाचे ? सूर्याच्या किरणांचे स्वच्छ अंगण स्वागत करील. किती सुरेख कल्पना व पवित्र भावना :

सकाळी उइून             काम सडा-सारवण
दाराशी उभे राहती             देव सूर्यनारायण ॥

दळण-कांडण, दुरून पाणी आणणे, मसाला कुटणे, सारी कामे ती करते. तिला कंटाळा नाही. आईच्या तालमीत ती तयार झालेली :

दळण सडण             नित्य माझे ग खेळणं
माझ्या मायेनें वळण             लावीयेलें ॥

सासरी कसे वागावे ते आईने शिकविलेले असते. आई गुरू :

मला शिकवीलें             माय त्या माउलीनें
परक्याच्या साउलीनें             जाऊं नये ॥
मी ग शिकलेली         बयाबाईच्या शाळेला
काम आपुलें करावें             सदां वेळेच्या वेळेला ॥

सार्‍याच ठिकाणी सासुरवास असतो असे नाही. काही सासवा आयांसारख्या असतात :

घराची घरस्थिती         काय पाहशी परक्या
लेकी-सुना त्या सारख्या         माझ्या घरी ॥

अशी प्रेमळ सासू सुनेचे लाड करते. बांगडया भरणारे कासार आले तर बांगडया भरविते, पटवेकरी आले तर सुनेचे बाजूबंद पटविते :

आले आले ते पटवेकरी         पटवाया काय देऊं
बाजूबंद गोंडे लावूं             सूनबाईच्या ॥
आले हो वैराळ             बसूं घालावी घोंगडी
चूडा भर नागमोडी             सूनबाई ॥

सासू सूनबाईला नटवते. सूनही सजते. परंतु कुणी म्हणते :

किती तूं नटशील         एवढें नटून काय होतें
रूप सुंदर कुठें जातें             उषाताई ॥

सूनबाईलाही ते समजते. मुख्य अलंकार म्हणजे शेवटी स्वत:चे सौभाग्य हे ती ओळखते :

सासूबाई तुम्हीं             एक हो बरें केलें
कपाळीचें कुंकू                 रत्‍न माझ्या हातीं दिलें ॥

पतीला आनंद व्हावा म्हणून ती झटते. सारे दु:ख गिळून पतीसमोर हसते. पती सुखी असला म्हणजे पत्‍नीला सारे मिळाले :

सासूचा सासुरवास         सारा मनांत गिळिते
कंथाशी हांसती                 उषाताई ॥
होवो माझें कांही         नाहीं मला त्याचें दु:ख
माझ्या कुंकवाला             मिळूं दे ग परी सुख ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel