घरांतील सर्व वडील मंडळीनी, आई बाबा काका मामा(त्याचवेळी कांही कामानिमित्त माझा मामा व काका टपकले होते.)  सर्वांनी माझी न भूतो न भविष्यती शाब्दिक धुलाई केली. माझ्या पत्नीला सुद्धा मी केलेली खरेदी पसंत पडली नव्हती.तीही नाक मुरडून चेहरा पाडून उभी होती.

मला कशी अक्कल नाही.

मला कसे व्यवहारज्ञान नाही.

मी कसा धर्म लंड आहे.

आमच्या पोटी हा असा कसा जन्मला.

या बावळटाला कुणीही कसा गंडवतो.

त्याचा मेल्याचा फ्रीज खपत नव्हता.

पितृ पंधरवड्यात खरेदी करायला कोण येणार?

दुकानदाराला हा बरा बकरा  सापडला.

त्याने कापला याने कापून घेतले. 

काय काय बोलणी मला बसली.मी मुकाट्याने सर्वकांही ऐकून घेत होतो.मुलेही हिरमुसली झाली होती.पम्याने सुचविल्याप्रमाणे मी तडजोड सुचविली.आपण या फ्रीजचे पॅकिंग उघडणार नाही.फ्रीज गॅलरीत तसाच ठेवू.पैसे या महिन्यात द्यायचे नाहीत.दुकानदाराकडे जागा नव्हती म्हणून त्याने येथे आणून ठेवला असे समजायचे.आता कांही हरकत आहे का?ही तडजोड शेवटी  सर्वानी मान्य केली.फ्रीजची पॅकिंगसकट स्थापना गॅलरीत झाली.आणि मी सुटकेचा नि:श्वास सोडला.घरातून विरोध होईल ही कल्पना होती.परंतु इतका कडक विरोध होईल.माझा इतका उद्धार होईल.अशी कल्पना मी केली नव्हती.

त्या दिवशी रविवार होता.संध्याकाळचे सहा वाजले होते.मी जरा फिरून येतो असे सांगून घराबाहेर पडलो.एकटाच फिरत फिरत समुद्रकिनारी आलो.रविवार असल्यामुळे किनाऱ्यावर भरपूर गर्दी होती.त्यातल्या त्यात जागा बघून वाळूत बसलो.दुपारपासूनच्या कामांनी आणि नंतर घरी झालेल्या हजामतीने मी क्लांत झालो होतो.मला शांतता हवी होती.वाळूमध्ये मी जरा आडवा झालो.डोक्याखाली हातांची घडी घेतली व आकाशाकडे बघत बघत डोळे मिटून घेतले.किती वेळ गेला माहीत नाही.बहुधा माझा डोळा लागला असावा.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel