“तुम्ही वस्तूंचे पसारे वाढवीत आहात. परंतु त्यामुले मने का मोठी झाली आहेत? उलट अधिकच संकुचित झालेली दिसतात.” तो पुन्हा म्हणाला.

“जाऊ देत भाऊ या गोष्टी.” मालती म्हणाली.

“सखाराम, जीवनाला आवश्यक वस्तू तरी हव्यात ना? अन्न, वस्त्र, घर – या तरी हव्यात ना? मनाचा विकास उपाशीपोटी तर नाही ना होत? विश्वसंगीत ऐकायलाही माझे पोट भरलेले असायला हवे. महात्माजी म्हणाले होते, पक्षी सकाळी उंच भरारी घेतो,-- परंतु आदलेया दुवशी पोटभर जेवलेला असतो. खरे ना?”

“माझे एवढेच म्हणणे की, खरे समाधान विवेकानेच मिळते. अमेरिकेत इतकी सुखे आहेत, परंतु आत्महत्याही तेथे अधिक! तेथे का आंतरिक समाधान आहे? हे पाहिजे—ते पाहिजे. धवाधाव. मनूने फार प्राचीन काळी सुखदु:खाची मार्मिक व्याख्या करून ठेवली आहे : ‘तत् यत् परवशं दु:खं यत् यत् आत्मवशं सुखम्!’ – जे जे दुस-यावर अवलंबून ते दु:ख, जे स्वत:वर अवलंबून ते सुख. गांधीजी हीच गोष्ट सांगत होते. चरखा खेड्यात दुरुस्त होईल. तो अमेरिकेतून कधी येतो याची वाट पाहायला नको. अन्न आणि वस्त्र या ज्या जीवनाच्या मुख्य गरजा, त्या तेथल्या तेथे भागवायला आपण शिकले पाहिजे. म्हणजे पुष्कळसे स्वातंत्र्य अनुभवता येईल.” सखाराम म्हणाला.

शिपायाने ‘आता पुरे’ म्हणून सुतवले. सखाराम व मालती जायला निघाली.

“भाजीभाकरी आवडली का?” तिने विचारले.

“माझ्या हातची खाल तेव्हा कोण अधिक चांगला स्वयंपाक करतो ते कळेल.” तो हसून म्हणाला.

“आज परतंत्र आहात. खा माझ्या हातचे.”

“या पारतंत्र्यातही एक प्रकारची स्वतंत्रता, म्हणजे मनोमय आनंद उपभोगीत आहे.”

“येतो घना.” सखाराम म्हणाला.

“येते घना.” मालती म्हणाली.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel