पहिला दिवस पार पडला. आणि अशाच प्रकारे दिवस जाऊ लागले.

“तुम्ही रोज नवीन भाग दाखवता. हा काळुपुरा मी कधी पाहिला नव्हता.” एक विद्यार्थी म्हणाला.

“मी तुम्हांला या सुंदरपूरचा भूगोल शिकवीत आहे. या गावात कोठे काय आहे. गरीब लोक कोठे राहतात, त्यांची वस्ती कशी असते, त्यांचे उद्योग काय,---सारे कळेल. ज्या गावात आपण राहतो त्याची तरी पुरेशी माहिती आपणास कोठे असते? खरे ना?” घना म्हणाला.

त्या दिवशी काळुपुरा आरशासारखा स्वच्छ झाला. त्या ठिकाणी एक चाळ होती. मालकाने संडासाकडे कधी लक्ष दिले असेल तर शपथ! मो-या तुंबलेल्या, बुडून गेलेल्या. कोठे कोठे किडे वळवळत होते. वसकन घाण येई. लोक तेथे कसे बसत? घणीत हे लोक जगू कसे शकतात? जो घणीत जगू शकतो, राहू शकतो, तो का मनुष्य?

घना आणि ती सारी सेना यांनी ते संडास स्वच्छ केले. सर्वत्र फिनेल टाकले. चाळीच्या मालकाला कळले. तो तेथे टांग्यातून आला. तो शरमला.

“अहो घनाभाऊ, राहू द्या. तुम्ही कशाला करता हे काम?” तो म्हणाला.

“आम्ही हे काम स्वत:चा अहंकार जावा म्हणून करीत आहोत. भंगीबंधूंशी हृदय जोडले जावे म्हणून करीत आहोत. तुम्हांला हिणवण्यासाठी नाही. ही मुले महात्मा गांधीकी जय म्हणतात. परंतु महात्माजी तर म्हणतात की, जय माझ्या नावाचा नको; माझ्या शिकवणीचा जय असो! गांधीजयंती नका म्हणू, चरखा जयंती, रेंटियाबारस असे म्हणा. आम्हाला तुमच्या चाळीच्या संडासात भरपूर काम मिळाले. मुलांना आनंद झाला.” घना म्हणाला.

मुलां-मुलींनी ‘महात्मा गांधीकी जय’ घोषणा केली.

एके दिवशी स्वच्छतेचे काम चालले होते. घना ती घाण भरत होता. तो एकदम कोणी तरी वरून घाण पाणी टाकले. घनाच्या अंगावर पडले. तो भिजला. ते सारे खरकटे होते. आमटीचे पाणी!

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel