व्यक्तीला पहिल्यांदा सार्वजनिक आणि सामाजिक विश्वात घेऊन जाण्यासाठी शाळा ही फार महत्त्वाची भूमिका निभावत असते.शाळा केवळ शिक्षणच देते असे नव्हे तर जगण्याचे बळ, आत्मविश्वास, प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, आठवणी, उपयोजन,समस्या निराकरण,ताणतणावाचे समायोजन,आपण कोण आहोत ? आपल्याला काय करायचे आहे?आपले ध्येय कोणते ? इ.अनेक प्रश्नांना शाळा उत्तर देत असते.जो शाळेत जातो त्याला या गोष्टींची हळूहळू जाणीव होत जाते.

आमची शाळा म्हणजे जिल्हापरिषदेची चौथीपर्यंत वर्ग असणारी.दोन वर्गखोल्या अन दोनच शिक्षक.शाळा कधीच विसरत नसतो माणूस कारण सुरूवातीचे मनाला फुलविण्याचे आणि झुलविण्याचे दिवस असतात ते.

पूर्वी खेड्यात शाळा म्हणजे एक आपुलकीचं ठिकाण होते.आजही मला आठवते ती आमची शाळा सारं काही सामावून घेणारी होती.मुले तर होती धिंगाणा करणारी परंतु काही ज्या चार ज्ञानाच्या गोष्टी शिकलो त्याही तिथेच.तेंव्हा काही सुद्धा कळत नसायचे.सारं निरागस असण्याचे ते वय होतं.

पूर्वी आमच्या गावात एक डॉक्टर यायचे महिण्या पंधरा दिवसातून एकवेळा.त्यांना बसण्यासाठी हक्काचं ठिकाण म्हणजे आमच्या शाळेचा व्हरांडाच.तिथंच पेशंट यायचे तपासून घ्यायचे.आम्ही निरीक्षण करायचो.एकदा डॉक्टर ते त्यांचे साहित्य तिथेच सोडून थोडे कुठे तरी गावात गेले होते.आम्हाला त्या साहित्याचे खूप कुतूहल होते.आम्ही चार-पाच मुले तिथे आलो आणि व्हरांडयातील एक एक सहित्य हाताळून पाहू लागलो.कधीच न हाताळलेले ते साहित्य हातात घेऊन एकमेकांना दाखवून मजा घेत होतो बिनधास्तपणे.मी तर ते स्टेथोस्कोप घेऊन कानात घातला अन बिनधास्तपणे पोरांसोरांच्या छातीवर टेकवून तपासल्या सारखे करत होतो ,खूप मजा वाटत होती.हसू येत होते.आनंद होत होता.माझ्या जवळील हे उपकरण सर्वांनाच खूप आवडत होते म्हणून ती सोबतची मुले ते मला बघू दे असं म्हणून मागत होती पण मला ते इतके छान वाटत होते की कोणालाही द्यावे वाटत नव्हते. पण हा आनंद जास्तकाळ टिकला नाही.तितक्यात समोरून डॉक्टर आले व मी पूर्ण त्या खेळात दंग झालो होतो.मुले तर केव्हाच डॉक्टर आले म्हणून दूर पळून गेली होती. मी एकटाच ते उपकरण घेऊन बघत होतो हे पाहून त्या डॉक्टरांनी मला बरोबर पकडले.माझ्याकडील तो स्टेथोस्कोप स्वत:कडे घेऊन  एक हात घटट् पकडून मला रागावू लागले.सोबतची सर्व मुले हे लांबून सर्व पाहत होते.मस्त मजेने माझ्याकडे पाहून हसत होते.एवढंच नाही तर तुमच्या स्टेथोस्कोपला हा मुलगा कसं करत होता, ती माहितीही वरून त्यंना देत होते.आता त्या डॉक्टरला तर खात्री पटली की हा मुलगाच खरा सुरूवातीची कळ काढणारा आहे अन् यानेच सर्वप्रथम आपल्या साहित्याला हात लावला.मी खूप झटके देत होतो ,हाथ सोडवून घेत होतो पण त्यांनी एवढे घटट् पकडले होते की सुटता सुटत नव्हते.मी पुरता आडकलो होतो.डॉक्टर म्हणजे उंच पुरा लांबच लांब कल्ले असलेला बेलबॉटमची पॅन्ट अन हिप्पीकट असलेला चांगला तगडा माणूस.मला आजही तो चांगलाच आठवतो.तो म्हणत होता आता देऊ का तुला इंजेक्शन अन मी जोरात रडत होतो.मला प्रचंड भिती वाटत होती.पश्चाताप होत होता की आपण कशाला या वस्तूला हात लावला.बरं सोबतचे मुलं तर केव्हांच दूर झाले अन मी एकटाच मार खायला उरलो होतो याचे ही वाईट वाटत होते.डॉक्टर काही सोडायला तयार नव्हते.अन इतक्यात जर आमचे गुरूजी आले तर आणखीच पंचायत होणार कारण त्यांना हे समजलं की ते पण मारणार शिवाय त्यांच्याकडून घरीही समजणार आणि घरचा पण मार मिळणार अशी माझी फजिती होत होती.माझी हात सोडून घेण्याची धडपड होती पण डॉक्टर दटावून विचारत होते की पुन्हा हात लावतो का ? मी नाही म्हणत होतो.अखेर डॉक्टरांनी माझी कबुली घेऊन पोटाला एक जोराचा चिमटा काढून मला सोडून दिले.मला सुटल्याचा खूप आनंद झाला.वर्गात बारीक तोंड करून पाटीकर काही तरी उगाच रेघोट्या मारत बसलो.डोळयातून पणी वाहत होते थोडे पाणी सूकून गालावर वणही आले होते.गप्प एका कोप-यात खाली मान घालून मी बसलो होतो.मुले मधूनच माझ्याकडे बघून हसत होती कधी मध्येच त्यांची माझी नजरानजर झाली की अजूनच हुंदके दाटून येत होते.तो दिवस अतिशय वाईट गेला.मनात त्या डॉक्टरचा बदला घ्यावा असा विचार येत होता.त्याचा खूप राग येत होता.मनात वाटले डॉक्टर जायला निघाला की एक दगडंच हाणावा फेकून नेम धरून.पण आधीच झालेल्या फजितीमुळे हिम्म्त होत नव्हती. मुले ही आपल्या बाजूने नाहीत असे वाटून तो विचार तसाच राहिला. पुढे किती दिवस मला त्या डॉक्टरचा राग होता.तो डॉक्टर दिसला की मी दूर पळून जात असे.पण मनात असे होतेच की एक तरी दिवस येईल तो माझ्या तावडीत सापडेल मी त्याचा बदला घेईन तेव्हां माझ्या मनाला शांत वाटेल.पण तशी संधी काही आली नाही.ती गोष्ट मात्र मला मनात कायम आठवत राहते. पुढे पुढे तर असे वाटायचे की आपणही शिकून मोठे डॉक्टर व्हावे अन त्या डॉक्टरला म्हणावे बघ तू मला तुझ्या साहित्याला हात लावू देत नव्हतास पण आता बघ मी हे साहित्य लहान  मुलांनी जरी घेतले तर त्यांना रागवत नाही…बरेच दिवस असे बदला घेण्याचे विचार येत राहिले.पुढे काही दिवसांनी डॉक्टरचे गावात येणे ही बंद झाले.मला ही ती शाळा सोडून दुस-या शाळेत जावे लागले.नंतर ते डॉक्टरसोबतच्या प्रसंगाचे हळूहळू विस्मरण झाले. माझी झालेली फजिती मी कधी आजही विसरलेली नाही.पण आजही त्या डॉक्टरच्या साहित्याला हात लावतांना मला ते आठवत राहते…

संतोष सेलूकर
परभणी
7709515110

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel