कुंती आपल्या पतीच्या निधनानंतर पाचही पुत्रांना घेऊन शतशृंगाहून हस्तिनापुरी आली. भीष्मांनी ह्या पुत्रांना प्रेमाने स्वीकारले व कौरव-पांडवांचे अत्यंत दक्षतेने परिपालन केले. त्यांच्या शिक्षणासाठी द्रोणगुरुंची नेमणूक केली. द्रोणांना अस्त्रविद्या परशुरामाकडून मिळाली होती. ते ब्राह्मण असले तरी अस्त्रविद्येत प्रवीण होते. अर्जुन त्यांच्या हाताखाली शिकताना मन लावून अध्ययन करत असे. रात्रीही तो धनुर्विद्येचा सराव करीत आहे हे पाहून द्रोणांनी त्याला जवळ घेऊन सांगितले, ’मी तुला सर्वश्रेष्ठ धनुर्धर करीन.’ एकदा त्यांनी शिष्यांची परीक्षा घेतली. कृत्रिम भासपक्षी बनवून तो वृक्षाच्या अग्रभागी ठेवला व प्रत्येकाला लक्ष्यवेध करण्यास सांगितले. या परीक्षेत फक्‍त अर्जुनानेच उत्तर बरोबर दिले व अचूक लक्ष्यवेधही केला. हे पाहून द्रोणांना फार आनंद झाला.

द्रोणांची शिष्यपरीक्षा

द्रोणास सोपिले कुमार विद्येसाठी

जाणून गुरुंची प्रज्ञा, महती, कीर्ती ॥१॥

ते घेती शिक्षण साग्र धनुर्वेदाचे

तलवार, खड्‌ग अन् प्रास, गदा, बाणांचे ॥२॥

एकाग्र मनाने करि अर्जुन व्यासंग

रात्रीच्या समयी राहि धनूतच दंग ॥३॥

पाहून चिकाटी, बुद्धितेज शिष्याचे

सांगती द्रोण त्या ऐक शब्द हे साचे ॥४॥

"मी करीन तुजला इतुका बा निष्णात

तू धनुर्धरातिल होशिल वीर वरिष्ठ" ॥५॥

जिद्दीने शिकवुन प्रविण करी सर्वांना

कौशल्य गदेचे भीम सुयोधन यांना ॥६॥

घेण्यास परीक्षा कृत्रिम पक्षी बनवी

गुरु द्रोण तयासी उंच तरुवर ठेवी ॥७॥

"या पक्ष्याचे जे शीर दिसे तरुवरती

ते लक्ष्य तुम्हाला, लावा त्यावर दृष्टी ॥८॥

धरल्यावर तुम्ही नेम; विचारिन प्रश्न"

रांगेत उभ्या शिष्यांना सांगत द्रोण ॥९॥

ये पुढे युधिष्ठिर, धरी नेम पक्ष्याचा

"तुज काय दिसे रे, सांग" प्रश्न द्रोणांचा ॥१०॥

"मज दिसता आपण, वृक्ष आणि तो भास

"हो दूर" सांगती नैराश्याने त्यास ॥११॥

भीमादिक येती एकामागुन एक

धर्मासम देती उत्तर हे निःशंक ॥१२॥

मग येई पुढती अर्जुन; धरि तो नेम

भासला प्रतापी श्रेष्ठ धनुर्धर राम ॥१३

विख्यात गुरुंनी प्रश्न टाकिला त्याला

"पक्ष्याचे दिसते शीर फक्‍त ते मजला" ॥१४॥

तो उत्तर देई एक नजर लावून

संतुष्ट गुरु त्या वदे "सोड तू बाण" ॥१५॥

शिर क्षणात पडले झाले शरसंधान

रोमाञ्चित होऊन कवटाळित त्या द्रोण ॥१६॥

हा श्रेष्ठ ठरेलच पृथ्वीवरती वीर

हे मनात येता आला भरुनी ऊर ॥१७॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel