मामांच्या कार्यालयात त्यांचाच भाचा कामाला होता. दूरचे नाते असले तरी कामात मात्र दोघांचे सगळेच पटायचे. कामाचा, कर्जाचा व मंदीचा व्याप वाढत असल्यामुळे तणाव, चिडचिड आणि वैताग हे रोजचेच झालेले. मामांना परिस्थिती सोसेनाशी झालेली. ‘ऑफिसमध्ये त्रास आहेच आणि घरीदेखील शांतता नाही,’ असे पुटपुटत मामा निघाले. संध्याकाळी घरी जायची वेळ होती. भाचाही घरी जाण्याच्या तयारीत होता. दोघे एकदमच उतरले. मामांनी भाच्याला म्हटले, बस माझ्या गाडीत ‘घरी सोडतो तुला.’ भाचा मामांच्या गाडीत बसला. कार्यालयापासून २०मिनिटांवर भाच्याचे घर होते. गाडी सुरू झाली व भाच्याचे घरही आले. वीस मिनिटे कशी गेली कळलेच नाही. गाडीत मौन होते, पण दोघांच्याही डोक्यात विचारांचा गोंधळ होता. घरी पोहोचल्यावर भाच्याने मामांना ‘चहा घेऊन जा’ असे म्हटले. उशीर झालेला तरी मामा उतरले. घराजवळ येऊनही आत न जाणे बरे दिसले नसते म्हणून मामा ‘पाच मिनिटांकरिता येतो’ असे म्हणाले. घराच्या दाराशी एक झाड होते. भाच्याने त्या झाडावर हात फिरवला, काहीतरी केले. मामांना काही कळले नाही. दाराची बेल मग त्याने वाजवली. दार उघडताच भाच्याच्या चेहर्‍यावरचे भाव एकदम बदलूनच गेले. त्याने हसत आपल्या बायकोला म्हटले, ‘‘पोचलो एकदाचा. किती छान वाटतंय आता. मामांसाठी मस्त चहा आण पाहू. समोर आलेल्या आपल्या पोरांना घट्ट मिठी मारली व खिशातून चॉकलेट काढून पोरांना दिले. मामांना हे सर्व पाहून प्रचंड आश्‍चर्य झाले. ऑफिसमध्ये वैतागलेला हा माणूस अचानक एका क्षणात कसा काय एवढा आनंदी झाला? गाडीतले मौन, विचारांची मारामारी खरी होती की हे घरातले हसणे-खिदळणे आणि आनंद ? मामांना प्रश्‍नच पडला. चहा घेऊन मामा  निघाले. भाचा मामांना गाडीपर्यंत सोडण्यासाठी आला. गाडीत बसता बसता मामांनी भाच्याला विचारले ‘‘दोन गोष्टी कळल्या नाहीत बेटा. त्या घराबाहेरील झाडाला तू काय केलेस आणि घरी पोहोचताच तुझे मौन पळून गेले. काय हे?’’ त्यावर भाचा म्हणाला, ‘‘मामा,  मी रोज घरी आलो की या झाडावर माझे सर्व त्रास टांगतो आणि आत जातो. त्यामुळे मी घरी पोहोचताच प्रसन्न होतो. दुसर्‍या दिवशी घरून निघताना पुन्हा त्या झाडावरून उचलतो. पण काल टांगलेले काही पडतात रात्रभरात आणि सकाळी कधीकधी त्रास झाडावर सापडतच नाहीत. हे आहे ‘‘त्रासांचे झाड.’’ प्रत्येकाने आपल्या घराबाहेर असेच एक त्रासांचे झाड लावावे. घरी जाताना त्रास बाहेर टांगून आत जावे. घरात फक्त आनंद असावा, त्रास नाही.


‘तुमच्या घराबाहेर आहे का ‘‘त्रासाचे झाड?’

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel