आठवाणीतला पाडवा

माझ्या लहानपणी आमच्या गावात,आम्ही राहात असलेल्या भागात गुढी पाडवा सण खूप जोरात साजरा होई, दहेगाव नाका म्हणून हा भाग ओळखला जाई,बहुदा हा जुन्या काळी जकात नाका असावा, नाक्या समोर तीन रस्ते एकत्र आलेले ,मध्ये बरीच मोठी मोकळी जागा होती. गावाचं हे शेवटचं टोक होतं, येथून पुढे थोड्या अंतरावर गाव संपे,आणि लोकांची शेतं, वाड्या, वस्त्या लागत...

आमच्या घरासमोरून जाणारा रस्ता ह्या वाड्या, वस्त्यां पर्यंत जाई, ह्या पैकीच एका वस्तीवर देवाचा

ऊत्सव असे,कुठल्या देवाचा ते माहित नाही पण तो खंडोबाचा असावा.

पाडव्याच्या दिवशी सकाळी आठ वाजेपासून लोक नाक्यावर जमायला सुरुवात होई,दहा वाजता एका आंब्याच्या पानांनी सजविलेल्या बैलगाडीत देवाची प्रतिमा ठेवून नाक्यावर आणत, बैलगाडीसमोर हलगी आणि संबळ जोरजोरात वाजत असे,एका जाड उंच लाकडी काठीला लाल कपडा गुंडाळलेला ,त्यावर वरच्या टोकाला भगवा झेंडा लावलेला असे. लोक ही काठी घेऊन बैलगाडीसमोर नाचत,दोन तास तरी हा कार्यक्रम चाले,साधारण बारा वाजता बैलगाडी

उत्सवाच्या ठिकाणी निघून जाई...

संध्याकाळी आमच्या घरासमोरच्या रस्त्यावर बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम असे, दुपारी दोन वाजेपासूनच बैलगाड्या जमायला सुरुवात होई,बारा गाड्या ओढणारा भगत आमच्या घरा समोरील गल्लीत राही,त्याचे घर रस्त्यावरून दिसे,चार वाजेपासून त्याच्या घरासमोर हलगी -ताशे वाजायला सुरुवात होई,बहुतेक तो आत पूजा करीत असावा...

आतली पूजा आटोपली की तांबरलेल्या डोळ्यांचा भगत बाहेर येई ,रंगाने काळा असलेला भगत कमरेच्या वर उघडा असे,कमरेला तो काही तरी घागऱ्यासारखे रंगीबेरंगी वस्त्र घाले,त्यावर लिंबाचा पाला बांधलेला असायचा. त्याचे केस मानेपर्यंत वाढलेले होते,कपाळभर तो हळदीचा मळवट भरे,त्यावर मोठ्ठा कुंकवाचा गोल लावे.त्याच्या गळ्यात कसल्या-कसल्या कवड्या गोट्या च्या माळा असतं ..दोन अनुयायी त्याला हात धरून चालवत,त्याच्याअंगात कोणता देव येई,माहित नाही.. पण चालतांना त्याच्या झोकांड्या जात,बहुदा तो खूप दारू पिलेला असे...

बारा बैलगाड्या एकमेकींना जोडून उभ्या करत,गावंभरचे टवाळखोर,गुंड,मवाली, टगे तरुण पोरं गाड्यांवर चढून उभी राहत,त्या बाराही गाड्या टग्या पोरांनी खच्चून भरलेल्या असत,आयुष्यात जरा ठोकरा खाल्लेले

मधमवयीन भगताच्या मदतीला गाड्यांचे चाकं धरून उभे असत.म्हातारे-कोतारे रस्त्याच्या दुतर्फा बसत,त्यांचा मागे लहान मुले आणि बायका उभ्या राहत...

वाजत गाजत भगताला पहिल्या गाडीसमोर आणले जाई, त्याच्या हस्ते गाड्यांची पूजा होई,मग भगत गाड्यांना 3 प्रदक्षिणा मारे. पुढे हलगी ताशे वाले मागे भगताला धरून दोन अनुयायी चालत.कधी एकादी प्रदक्षिणा झाली की भगताचा उन्माद शिगेला पोहोचे,तो अनुयायांनी धरलेले हात झटकून पळत सुटे, त्याच्या मागे त्याचे अनुयायी पळत.हलगी ताशे वाले एका बाजूला थांबून घेत आणि हलग्या बडवत आता भगतापुढे पळत हलगी वाजविणे त्यांना शक्य नसे

दोन प्रदक्षिणा पळून मारल्या की भगताच्या तोंडाला फेस येई,त्याचे अनुयायी त्याला पकडत आणि बैलगाडी ला बांधत. कसला तरी इशारा होई आणि एकदम बैलगाड्या हलत, जमावाला समूह उन्माद चढे,गाड्यांवर उभे असलेले टगे पोरं जोरजोरात ओरडत,शिट्टया फुंकत, चाकाला धरून उभी असलेली मध्यमवयीन लोकं देवाचा जयघोष करत,दुतर्फा बसलेले म्हातारे माना डोलवत,लहान पोरं टाळया वाजवत आणि बायका हात जोडत. वेगानं५०-१००मीटर जावून गाड्या थांबत,भगताला गाडी पासून सोडविले जाई, परत वाजत गाजत घरी नेवून झोपवत..

इकडे सीन पालटलेला असे ,टग्या पोरांनी एकमेकांची खोडी काढलेली असे,त्यांच्यात भांडणे सुरु होत,आता भांडणारे मधे आणि जमाव वर्तुळ करून उभा राही,कधी भांडणाचे पर्यावसन हाणा मारीत होई,कधी जाणत्या लोकांच्या मधस्तीने भांडण मिटे तास दोन तास रेंगाळून गर्दी पांगे, आणि पाडवा संपे..

असे अनेक पाडवे साजरे होतांना पाहत आम्ही भावंडं लहानाचे मोठे झालो,गेली कीत्येक वर्षं माझा माहेरच्या गावाशी संबंध नाही ,माहेरचे कुणी आता तिथे राहत नाही, तिकडे आता असा पाडवा साजरा होणे बंद झालेय.

काहीच तथ्य नसलेल्या प्रथा,रूढी,परंपरा काळाच्या ओघात बंद होतायत,नविन बदल आपण स्वीकारलेत ,पण तथ्य नसले तरी त्या रूढी,परंपरा आपले जीवन संपन्न करत होत्या याची जाणीव मात्र प्रकर्षाने होते

तिथला पाडवा साजरा होणे बंद झाला असला तरीही माझ्या मनात आठवणींच्या रूपाने साजरा होत राहील

कायम ....

--कल्पना गोपीनाथ

Comments
Please login to comment. Click here.

It is quick and simple! Signing up will also enable you to write and publish your own books.