अहा ! गे सृष्टीच्या वरतनु सुते ! निर्भयपणें
पहा अब्धीच्या या तरल लहरींचें उसळणें !---
मनोराज्यीं जैशा विविध ह्रदयीं क्लूप्ति उठती
तशा ना अब्धीच्या तरल लहरी या विलसती ?

मनोराज्याला या बघ जलधिच्या, फार विरळे !
कशाला हे तूतें फुकट म्हटलें मीं ? नच कळे !
स्वयें अब्धीला तूं बघत असतां पाहुनि, मुळीं,
’ सुता तूं सूष्टीची ’ मम ह्रदयीं ही मूर्ति ठसली.

निसर्गोद्यानींचे अमृतलतिके ! केंवि दिसतो ?
कशा या सिंधूच्या चपल लहरी गे उगवती ?---
जशा कांहीं जाडया अनवरत देहांत उडती
तशा ना सिंधूच्या चपल लहरी या उचलती ?

कसा गे अस्ताला द्युतिपति अहा ! हा उतरतो ?
कसा या दिग्भागीं सदरुणपणा हा पसरतो ?---
जणों, सोडोनीया धरणिवनिता ही, दिनमणी
विदेशाला जातो, प्रकट करितो राग म्हणुनी !

पहा आकाशीं गे सुभग तरुणी, या दिनकर ---
प्रभेच्या लालीने खुलत असती हे जलधर !
जसे क्रोडाशैल त्रिदशललनांचे तलपती !
जशीं केलिद्वीपें अमरमिथुनांचीं चमकती !

जिथें सौन्दर्याची तरुणि ! परमा कोटि विलसे,
जिथें आनन्दाची अनपकृत ती पूर्तिहि वसे,
अशा या आकाशोदधिमधिल या द्वोपनिचयीं
रहायाचें तूझ्या अभिमत असें काय ह्रदयीं ?

मलाही या पृथ्वीवरिल गमतें गे जड जिणें !
इथें या दुःखांचें सतत मनुजांला दडपणें !
इथें न्यायस्थानीं अनय उघडा स्वैर फिरतो !
नरालागीं येथें नरच चरणांहीं तुडवितो !

म्हणोनि, आकाशोदधिमधिल त्या द्वीपनिचया
निघाया, टाकूं या प्लुति अनलनौकेवरुनि या !---
शरीरें जीं दुःखप्रभव मग तीं जातिल जलीं !
सखे ! स्वात्मे द्वीपें चढतिल पहाया वर भलीं !

जरी दुःखाचें हें निवळ अवघें सर्व जगणें,
तरी या देहाचा सुखदचि असे त्याग करणें !
सुखासाठीं एका सतत झटतों आपण जरी,
तरी देहत्यागें सुख अनुभवुं आपण वरी !

अशुद्ध स्वार्थें जीं नयनसलिलें मानुष सदा,
शिवायाचीं देहा मग अपुलिया नाहिंत कदा !
जलस्था त्या देवी, फणिपतिसुता सुंदरमुखी,
स्वबाष्पें या देहांवरि हळूहळू ढाळितिल कीं !

प्रवालांच्या शय्ये निजवितिल त्या देवि अपणां,
प्रवालांला ज्या हा त्वदधरगडे ! जिंकिल पण;---
तशी मोत्यांची त्या पसरितिल गे चादर वरी,
सरी ज्या मोत्यांना न तव रदनांची अणुभरी !

शिराखालीं तुझ्या भुज मम गडे ! स्थापितिल हा,
तसा माझ्या कण्ठीं कर तव सखे ! सुन्दर अहा !
जलस्था त्या देवी चरण अपुले गुंतवितिल,
मुखें लाडानें त्या निकट अमुचीं स्पर्शवितिल !

अशा थाटानें त्या निजवितिल गे सारतलीं,
नसे याचेमध्यें नवल विमले ! जाण मुदलीं,
जरी या रीतीचें शयन अपुलें योग्य न इह ।
नरांच्या जिव्हां तें म्हणतिल जरी पाप अहह !---

पयःस्था त्या देवी, फणिपतिसुता पंकजपदी,
स्वयंभू सूष्टीचे नियमचि सदा मानीति सुधी.
स्वयंभू सृष्टीचे नियम सुधखं पाहत असे
नराच्या ऐसा या कवण दुसरा मुर्ख गवसे ?

पयोदेवी तूझा बघूनी कबरीपाश निखिल
स्ववेणीसंहासा धरतिवरतीं त्या करतिल;---
तुझी नेसायाची बघूनि सगळी मोहक कला
स्ववस्त्रप्रावारीं उचलतिल गे ती अविकला.

कदाचित्‍ त्या देवी, अणि, फणिमणींच्या पण मुली,
सजीव प्रेतें तीं करितिल गडे ! दिव्य अपुलीं !---
पयोदेवी तेव्हां विचरशिल तूं सागरतलीं ;
तुझे संगें मीहो विचरित पयोदेव कुशली !

प्रवालांची तेथें विलसित असे भूमि सुपिक,
पिकें त्या मोत्यांची विपुल निघती तेथ सुबक,
सुवर्णाचीं झाडें, वर लटकती सुन्दर फळें
फुलें हीं रत्नांचीं; बघुनि करमूं काळ कमळे !

समुद्राच्या पृष्ठीं सखि ! बघत बालार्कसुषमा
उषीं बैसूं, त्याच्या अनुभवित मंदौष्ण तिरमा
धरूं दोघे वस्त्रा, जवपवन कोंडूं अडवुनी,
शिडाच्यायोंगें त्या फडकत सरू सिंधुवरुनी !

कधीं लीलेनें तूं बसशिल चलद्देवझषकीं,
फवारे तो जेव्हां उडविल जलाचे मग सखी---
तघीं दावायाला तुजसि मघवा प्रेम अपुलें,
स्वचापाचें तुझेवरि घरिल गे तोरण भलें !

कधीं कोणी राष्ट्र प्रबल दुसर्‍याला बुडविण्या,
जहाजें मोठालीं करिल जरि गे सज्ज लढण्या;
तरी सांगोनीयां प्रवर वरुणाला, खवळवूं
समूद्रा तेणें त्या सकळ खलनौका चूथडवूं !

गुलामां आणाया गिघतिला कुणी दुष्ट नर ते,
तरी त्यांचीं फोडूं अचुक खडकीं तीं गलबतें !---
नरांलागीं त्या गे त्वरित अधमां ओढुनि करीं
समुद्राच्या खालीं दडपुनि भरूं नक्रविवरीं !

प्रकारें ऐशा या जरि वरुणराज्यांत कुशले !
वसूं आनंदानें समयगणति जेथ न चले;
तशीत्या आकाशोवधिमधिल त्या द्वीपनिचयीं

शिरीं त्या मेरूच्या विलसत असे नन्दनवन;
अधस्तात्‍ शोभे ती अमरनदि तद्‍बिम्ब धरुन;
वनीं त्या देवांच्या सह अमृत तें प्राशन करूं;
तशीं रम्भासंगें चल ! सुरनदीमाजि विहरूं !

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel