“हो. अलीकडे हाच विचार माझ्या मनात येत असतो. परंतु मी म्हातारा. कुठं जाऊ नवरा शोधायला? तुम्ही सांगता का एखादं स्थळ? तुमच्या आहे का माहितीत एखादा मुलगा.”

“तसा डोळ्यांसमोर नाही. आणि सोनीला चांगलंसं स्थळ पाहायला हवं. तिला गरिबाघरी थोडीच द्यायची आहे? तुमच्या मोहराही परत मिळाल्या आहेत. आता तुम्ही गरीब नाही. खर्च करू शकाल. सोनी सुस्थळी पडो. चार दागिने अंगावर पडोत. परंतु अशी स्थळं आम्हांला कुठं माहीत असणार? आम्ही गरीब माणसं, खरं ना मनूबाबा?” ती म्हणाली.

“हे पाहा साळूबाई, नवरा मुलगा चांगला असला म्हणजे झालं. माणसं चांगली असली म्हणजे झालं. गरीब का असेना घराणं. माणसं श्रीमंत मनाची हवीत. सोनीला मी प्रेमाने वाढविलं. जरा लडिवाळपणानं बोलते सवरते. तिचे कौतुक करणारी माणसं मिळाली म्हणजे झालं. पैसे काय चाटायचे आहेत? आणि सोनीला नाही हो दागदागिन्यांचा सोस. दोन फुले केसात घालायला असली म्हणजे झालं असं म्हणते. आहे का असं स्थळ माहीत? गरीब असलं तरी चालेल.”

“सांगेन, लक्षात ठेवीन.”

“आता नाही सांगता येणार?”

“आता एकदम कसं कोणतं सांगू, मनूबाबा?”

“डोळ्यांसमोर असेल ते सांगा.”

“तसं कसं सांगू?”

“साळूबाई, मीच तुम्हांला एक विचारू?”

“विचारा ना बाबा.”

“तुम्हीच माझ्या सोनीला सून करून घेता का? तुमच्या रामूला सोनी द्यावी असे माझ्या मनात आहे. परंतु एकदम विचारायला धैर्य झालं नाही. विचारीन विचारीन म्हणत होतो. परंतु आज केलं धाडस. बघा. सांगा काय ते.”

“काही तरीच बोलता तुम्ही.”

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel