“रामूची बायको! अय्या!” सोनी आश्चर्याने ओठावर बोट ठेवून हसून म्हणाली.

एके दिवशी सोनी बाहेर गेली होती. संपतरायांच्या वाड्यावरून जात होती. सोनीला हाक मारावी असे त्यांना वाटले. परंतु इतक्यात त्यांची पत्नी इंदुमती  त्यांच्याजवळ आली.

“काय बघता?” तिने प्रेमाने विचारले.

“त्या विणकराची मुलगी.” तो म्हणाला.

“बाकी त्या मनूबाबाची कमाल आहे हो. त्या पोरीचं तो सारं करतो. एवढीशी होती. तेव्हापासून त्यानं ती वाढविली. तिचं हगमूत काढलं. आजारीपणात जपलं. तिला भरवी, तिला खेळवी. तिच्याबरोबर नाचे, हसे. तिला लिहावाचायलासुद्धा शिकवितो. बायकासुद्धा करायला कंटाळतील. आयासुद्धा कंटाळतील. परंतु मनूबाबा सारं आनंदानं करतात. आणि मुलगीही आहे सुंदर. बघा ती कशी दिसते. ती काय पाहते आहे?”

“ती आपल्या बागेतील फुलांकडे बघत आहे.”

“केसांत घालायला हवी असतील.”

“चल, तिला आपण देऊ फुलं.”

“थांबा, मी गड्याला सांगते.”

परंतु इतक्यात सोनी तेथून पळाली. संपतरायांचा कोणी तरी नोकर तिच्यावर ओरडला. ती घाबरली. धापा टाकीत ती घरी आली. मनूबाबा स्वयंपाक करीत होते. सोनी रडत होती.

“काय झालं बेटा?” त्याने प्रेमाने विचारले.

सोनी बोलेना. तो तिच्याजवळ आला. त्याने तिच्या केसांवरून हात फिरविला. तिच्या पाठीवरून हात फिरविला. सोनीचे रडे थांबले.

“का रडत होतीस?” त्याने पुन्हा प्रश्न केला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel