लिलीची आई हिंडत हिंडत एका शहरात आली. तेथे एक मोठा कारखाना होता. त्या कारखान्यात तिला नोकरी मिळाली. एका लहानशा खोलीत ती राहात असे. काटकसरीने वागत असे. आपल्या मुलीसाठी पैन् पै शिल्लक टाकीत असे.

या कारखान्याचा मालक फार उदार होता. त्याचा इतिहास मोठा विचित्र होता. तो या शहरात कधी, कोठून आला ते कोणास फारसे माहीत नव्हते. तो खूप श्रीमंत होता; परंतु त्याला मूलबाळ कोणी नव्हते. त्याला कोणीच नव्हते. तो एकटाच होता. एका मोठया बंगल्यात तो राहात असे. त्याने अनेक धर्मशाळा बांधल्या. अनेक सार्वजनिक विहिरी खणविल्या. त्याने मोफत दवाखाने घातले. अनाथालये उघडले. जिकडेतिकडे त्याची कीर्ती पसरली. सरकारी अधिकारी त्याला मान देत, जनता त्याच्यावर प्रेम करी.

तो त्या शहराच्या नगरपालिकेचा अध्यक्ष होता. नेहमी तो निवडून येई. निवडून येण्यासाठी त्याला खटपट करावी लागत नसे. सर्वांच्या हृदयात त्याला स्थान होते. अशा या उदार पुरुषाच्या कारखान्यात लिलीची आई कामाला जाई. काही दिवस गेले; परंतु पुढे निराळीच परिस्थिती उत्पन्न झाली. त्या कारखान्यात दोन भाग होते. एका भागात सारे पुरुष कामगार होते. दुसर्‍या भागात सार्‍या बाया होत्या. बायांवर देखरेख करणार्‍या बायाच होत्या.

बायकांचा स्वभाव मोठा जिज्ञासू असतो. त्यांना चौकश्या फार कराव्याशा वाटतात. ही नवीन आलेली बाई कुठली, कोण याची माहिती त्या काढू लागल्या; परंतु फार माहिती मिळेना.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel