सर्व जगानं मला दूर लोटलं. या माहात्म्यानं पोटाशी धरलं. त्यानं माझ्यावर विश्वास टाकला. 'तू वाईट नाहीस, चांगला आहेसं,' असं मला म्हटलं. त्याच्याकडे का चोरी करू? त्या साधूला काय वाटेल? त्याची ताई काय  म्हणेल? काही का म्हणत ना! म्हणशील, 'त्याला जरूर होती म्हणून त्या वस्तू त्यानं लांबवल्या.' नाही तर मी उद्यापासून जगायचं कसं हा प्रश्न आहे माझ्यासमोर! ही सदसद्विवेकबुध्दी कशाला कुरकुर करते? गप्प बस ग.' असे त्या पाहुण्याच्या मनात चालले होते. हो ना चालले होते. सदसद्वृत्तींचा झगडा चालला होता. शेवटी असदवृत्ती विजयी  झाली.

तो पाहुणा हळूच उठला. पाय न वाजवता मांजराप्रमाणे आत गेला. जरा थांबला. दोघांचे झोपेतील श्वासोच्छ्वास ऐकू येत होते. साधू शांतपणे झोपला होता. आत ताईही गाढ झोपेत होती. त्या पाहुण्यानं हळूच ते ताट व तो दिवा उचलून घेतला. तो बाहेर आला. सारे शांत होते. पांघरायला दिलेल्या शालीत त्या चांदीच्या वस्तू गुंडाळून तो बाहेर पडला. कोणीही बघत नव्हते. वरून तारे फक्त पाहात होते. कोणी कुत्री तेथे भुंकायला नव्हती, परंतु आत सदसद्विवेकबुध्दी ओरडत होती.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel