धर्म ग्रंथांनुसार महर्षी वेदव्यास हे भगवान विष्णूंचा अवतार होते. त्यांचे पूर्ण नाव कृष्णद्वैपायन होते. त्यांनीच वेदांचे विभाग पाडले. त्यामुळेच त्यांचे नाव वेदव्यास पडले. महाभारत या सर्वश्रेष्ठ ग्रंथांपैकी एक असलेल्या ग्रंथाची रचना देखील महर्षी वेदव्यास यांनीच केली. महर्षी पराशर हे त्यांचे वडील होते तर सत्यवती ही त्यांची माता होती. पैल, जैमिन, वैशम्पायन, सुमन्तुमुनि, रोमहर्षण इत्यादी महर्षी वेदव्यास यांचे महान शिष्य होते.
महर्षी वेदव्यास यांच्या वरदानामुळे कौरवांचा जन्म झाला
एकदा महर्षी वेदव्यास हस्तिनापुरात गेले. तेव्हा गांधारीने त्यांची खूप सेवा केली. तिच्या सेवेने प्रसन्न होऊन वेदव्यास ऋषींनी तिला १०० पुत्रांची माता होण्याचे वरदान दिले. कालांतराने गांधारी गर्भवती झाली, परंतु तिच्या गर्भातून मांस पिंडाचा जन्म झाला. गांधारी त्याला नष्ट करणार होती. ही गोष्ट आपल्या दिव्य दृष्टीने वेदव्यास ऋषींच्या लक्षात आली. त्यांनी गांधारीला सांगितले की १०० कुडांची निर्मिती कर आणि त्यात तूप भर. नंतर महर्षींनी पिंडाचे १०० भाग केले आणि त्या कुंडात भरून कुंड बंद केली. कालांतराने त्यातून गांधारीच्या १०० पुत्रांनी जन्म घेतला.