अश्रुधारा डोळयांस तदा लागे ॥ ४॥
वडिल गेले गाडीस आणण्याते
माय बंधू सारेहि उभे होते।
येत गाडी दारात उभी राही
श्याम पोटाशी घट्ट धरी आई ॥ ५॥
पित्या वंदी साष्टांग श्याम भावे
पिता आशीर्वच देत मूक भावे ।
गाडिमध्ये सामान सर्व गेले
वियोगाचे पळ शेवटील आले ॥ ६॥
श्याम जप हो, तू धाड शीघ्र पत्र
वदे गहिवरुनी माय भरे नेत्र ।
बैल हाकी जोरात गाडिवान
कवाडीत उभे मायबाप दोन ॥ ७॥
मायबापांचा विरह तो नसावा
बहिणभावांचा विरह तो नसावा ।
परी विद्येचा भक्त बघे होऊ
त्यास कुठले ते मायबाप भाऊ ॥ ८॥

कविता म्हणता म्हणता माझा गळा दाटून येत होता. ऐकता ऐकता गोविंदाचे डोळेही भरुन आले.
आम्ही तिघे शांत बसलो होतो.

''किती साधी सरळी कविता,'' गोविंदा म्हणाला.

''मलासुध्दा समजली,'' बंडू म्हणाला.

''परंतु समजली असं दिसलं नाही,'' मी म्हटले.
''मी अर्थ सांगू?'' बंडून विचारले
''तुला रडू नाही आलं,'' मी म्हटले.

''गोंदूबाच्या डोळयांना लवकर पाणी येतं. माझ्या नाही येत,'' बंडू म्हणाला.
''सर्वाचे डोळे सारखेच नसतात,'' गोविंदा म्हणाला.

''सर्वांची हृदयंही सारखी नसतात,'' हृदयं हलल्याशिवाय डोळे भरत नाहीत. हृदयं पेटल्याशिवाय डोळे लाल होत नाहीत. सारं ह्वदयांवर आहे. सा-या जीवनाची किल्ली तिथे आहे,'' मी म्हटले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel